दिल्लीचेही तख्त राखतो…

Mumbai Indians celebrating after thrilling victory

थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सने सलग तीन गडी धावबाद करीत दिल्ली कॅपिटल्सची विजयी मालिका खंडित केली. 

दिल्ली (प्रतिनिधी): हाऊसफुल अरुण जेटली स्टेडियम. मुंबई इंडियन्सचा २०० धावांचा पल्ला. दिल्लीची कॅपिटल्सची विस्फोटक सुरुवात. ३७ चेंडूंत केवळ ५६ धावांची गरज. दिल्ली सामना आरामात जिंकेल असे स्पष्ट चित्र. पण कसलेल्या मुंबईने टिच्चून गोलदांजी करीत अटीतटीच्या सामन्यात तब्बल सलग धावबाद करीत १२ धावांनी जिंकत दिल्लीला घराच्या मैदानावर यंदाचा मोसमातील पहिल्या पराभवाची चव चाखली.

आजच्या सामन्यातील वैशिष्ट्य म्हणजे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ खरा इम्पॅक्ट. सामन्याच्या उत्तरार्धात मुंबई इंडियन्सतर्फे कर्ण शर्मा तर दिल्ली कॅपिटल्ससाठी करून नायर. या दोन खेळाडूंनी आपापल्या संघासाठी योग्य प्रभाव पाडत सामन्याचे पारडे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकवले. सात वर्षांत पहिल्यांदाच अर्धशतकीय खेळी करणाऱ्या करून नायरने बुमराहसह सर्वच गोलंदाजांना चांगलेच चोपून काढले. त्याने केवळ ४० चेंडूंत पाच षटकार व डझनभर चौकार ठोकत ८९ धावांची अतुलनीय खेळी केली. पहिल्याच चेंडूंवर त्याचा साथीदार जेक फ्रेसर-मॅकगर्ग गमावल्यानंतर अभिषेक पोरेल समवेत मोर्चा सांभाळून शतकीय भागीदारी करीत दिल्लीला सामना एकहाती जिंकून देण्याचा बेत स्पष्ट केला. 

कर्ण शर्माने मुंबईसाठी मोक्याच्या वेळी गडी बाद करीत सामना दिल्लीच्या बरोबरीने चालवला. शेवटच्या दोन षटकांत २३ धावांची गरज असताना आशुतोष शर्माने बुमराला दोन चौकार ठोकत दिल्लीच्या आशा पुन्हा जिवंत केल्या. पण शेवटच्या चेंडूंपर्यंत हार मानणार नाही तो मुंबईचा संघ कसला. पुढील तीन चेंडूंवर सलग तीन धावबाद करीत मुंबईने अशक्य असा सामना एक षटक राखत थरारक पद्धतीने जिंकला. 

तत्पूर्वी, अक्षर पटेलने नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी पाचारण केले. खराब फॉर्ममधून जात असलेल्या रोहित शर्माच्या पदरी आजही निराशाच आली. दोन चौकार व एक षटकार मारत टच मध्ये दिसत असताना विप्राज निगमला स्लॉग स्वीप मारण्याच्या नादात पायचीत झाला. रोहित बाद झाल्यानंतर मधल्या फळीने रायन रिकलटनने सूर्यकुमार यादवसोबत काही काळ खेळपट्टीवर तग धरत अर्धशतक पूर्ण केले. तोही बाद झाल्यानंतर सूर्याने तिलक वर्मासोबत अर्धशतकीय भागीदारी करीत मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. हार्दिक पांड्या बाद झाल्यांनतर तिलकने नमन धीरसोबत पुन्हा एकदा अर्धशतकीय भागीदारी करीत दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला.