रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सहा गड्यांनी पराभव करीत केला नवा विक्रम.
बेंगळुरू (प्रतिनिधी): इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या सत्रात खेळताना आतापर्यंत केवळ एकदाच फायनल वारी गाठलेल्या दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या तोंडातला घास काढत एक आगळावेगळा विक्रम करीत आपली विजयी मालिका कायम ठेवली.
चिन्नस्वामीच्या वेगवान खेळपट्टीवर १६४ धावांचे माफक आव्हान पेलण्यास उतरलेल्या दिल्लीला बेंगळुरूच्या गोलंदाजांनी चांगलेच रडवले. नवव्या षटकात ५८ धावांवर चार फलंदाज माघारी परतले असताना भारताचा भरवश्याचा फलंदाज के एल राहुलने आपला ‘क्लास’ दाखवत नाबाद ९३ धावांची खेळी करीत बेंगुळुरु आपली कर्मभूमी आहे हे सिद्ध केले. त्याने ट्रिस्टन स्टब्सच्या (ना. ३८) साथीने पाचव्या गड्यासाठी नाबाद शतकीय भागीदारी रचत १८व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस आमंत्रित केलेल्या आरसीबीने विस्फोटक सुरुवात करत केवळ तीन षटकातच संघाला पन्नाशी गाठून दिली. फिल सॉल्ट व विराट कोहली या सलामी जोडीची हि सुरुवात पाहून बेंगळुरू २५० चा पल्ला गाठेल असेच दिसत होते. पण चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर या सलामीवीरांमध्ये ताळमेळ बिघडला आणि सॉल्टला धावबाद व्हावे लागले. त्यानंतर डावाला लागलेल्या गळतीला टीम डेव्हिडने काही अंशी सांभाळले. २० चेंडूंत चार षटकारांच्या साहाय्याने त्याने नाबाद ३७ धावांची खेळी करीत १६३ धावांपर्यंत मजल मारली.
या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच पहिले चार सामने जिंकण्याचा पराक्रम केला. शिवाय आपलीही विजयी मालिका सुरु ठेवत आठ गुणांसह दुसरे स्थान कायम ठेवले.