बुमराच्या उपस्थितीतही मुंबई इंडियन्सला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. २२२ धावांचा पाठलाग करताना तिलक वर्मा व हार्दिक पांड्या यांनी दाखवलेली झुंज अखेर व्यर्थ ठरली.
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई जिंकणार कि आरसीबी. दोन्ही संघांच्या प्रेक्षकांना अगदी आठवड्यापासून लागलेली चिंता अखेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (आरसीबी) मुंबई इंडियन्सला त्यांच्या घराच्या मैदानावर पराभूत करत दूर केली. अगोदरच तीन सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्सला आणखी एका पराभवाला सामोरे जात यंदाच्या मोसमात चौथ्या पराभवाची नामुष्की ओढवावी लागली. आरसीबीने दिलेल्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने २०९ धावांपर्यंत मजल मारली.
नाणेफेक जिंकून पाठलाग करण्याचा निर्णय केकेआर विरुद्ध सही साबित झाल्यानंतर हार्दिक पांड्याने आजही तोच निर्णय घेतला. पण या आयपीएलमध्ये फॉर्ममध्ये असलेल्या आरसीबीने केकेआर सारखी चूक केली नाही. त्यांनी बुमरा वगळता मुंबईच्या सर्वच गोलंदाजांचा येथेछ समाचार घेतला.
आरसीबीची मधल्या फळीची भक्कम आघाडी
आरसीबीला यंदाच्या मोसमात तीनपैकी दोन सामने जिंकून देण्यात त्यांच्या मधल्या फळीने मोलाची कामगिरी बजावली आहे. कोहलीची सलामी इंनिंग चांगली झाल्यानंतर कर्णधार रजत पाटीदार, देवदत्त पडीक्कल व जितेश शर्मा यांच्या आताशी खेळीने आरसीबीला मोठी धावसंख्या बनवून दिली. जसप्रीत बुमराचे षटकाराने स्वागत करीत कोहलीने आपले मनसुबे स्पष्ट केले. त्याला सुरुवातीला पडीक्कलने ९१ धावांची तर पाटीदारने ४८ धावांची भागीदारी करीत उत्तम साथ दिली. कोहली (धा. ६७, चें. ४२) व पडीक्कल बाद झाल्यानंतर पाटीदारने (धा. ६४, चें. ३२) जितेश शर्मासोबत (धा. नाबाद ४०, चें. १९) पाचव्या गड्यासाठी केवळ २७ चेंडूंत ६९ धावांची भागीदारी करीत दोनशेच्या पल्ला गाठून दिला.
धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या मुंबई इंडियन्सची पावरप्लेमधेच तारांबळ उडाली. त्यांना मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भागीदारी किती महत्वाची असते हे कदाचित कळले नसावे. सलामीवीर रोहित शर्मा व रायन राकेलटन प्रत्येकी १७ धावा काढत चौथ्याच षटकात माघारी परतले. तर विल जॅकस व सूर्यकुमार यादव यांनाही मोठ्या खेळी करता आल्या नाही.
पाठलाग करण्यास लागलेल्या धावांची गती वाढली असता टिळक वर्मा (५६) व हार्दिक पांड्या (४२) यांनी केवळ ३४ चेंडूंत ८९ धावांची तुफानी भागीदारी केली खरी पण त्यांच्या या खेळीला पाहिजे तशी एंडिंग मिळाली नाही. परिणामी, मुंबई इंडियन्सला होता-तोंडाशी आलेला सामना गमवावा लागला.