आरसीबीची भन्नाट सुरुवात, नाईट रायडर्सना केले पहिल्या सामन्यात पराभूत

Virat Kohli against KKR in 2025 IPL opening game

कृणाल पांड्याच्या फिरकीसमोर नतमस्तक झालेल्या कोलकात्याला कोहली, सॉल्टने चांगलेच चोपत नोंदवला पहिला विजय.

कोलकाता (प्रतिनिधी): आपल्या १८व्या सत्राची धमाकेदार सुरुवात करीत इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) २००८ सालच्या सामन्याच्या आठवणींना उजाला देत कोलकाताच्या एडन गार्डनवर आणखी एक जबरदस्त सामना अनुभवाला. पण आज मात्र निकाल यजमानांच्या विरुद्ध लागला. 

किंग खान शाहरुख व सह कलाकारांच्या रंगारंग कार्यक्रमानंतर हाऊसफुल एडन गार्डनवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या नवखा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकत गतविजेत्यांना फलंदाजीस आमंत्रित केले. राहाणेच्या कोलकाता नाईट रायडर्सने अपेक्षेप्रमाणे धडाकेबाज सुरुवात करीत आरसीबीच्या फॅन्सच्या तोंडचे पाणी पळविले. पण कृणाल पांड्याने आपल्या फिरकीची जादू दाखवत यजमानांना मोठ्या धावसंख्येपासून रोखले. दहाव्या षटकात शंभरी गाठल्यानंतर रसिख सलामने सुनील नरेनला बाद करीत अजिंक्य राहाणेसोबतची शंभर धावांची भागीदारी मोडली. पुढे कृणालने डावाला खिंडार पाडत केकेआरला १७४ धावांत रोखले.

आजपर्यंतच्या लढतींत वरचढ असलेल्या केकेआरचा वचपा काढण्याच्या इराद्याने उतरलेल्या आरसीबीने एकामागून एक सरस षटके खेळून काढत ९५ धावांची सलामी भागीदारी दिली. मागील सत्रात केकेआरच्या विजयी घोडदौडीत महत्वाची कामगिरी निभावणाऱ्या फिल सॉल्टने आज आरसीबीसाठी तोच जोश दाखवला. २५ चेंडूंत अर्धशतक झळकावल्यानंतर पुढची सूत्रे विराट कोहलीने चोख निभावली. कोहली जरी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी आपणच या खेळाचे बादशाह आहोत हे आजच्या खेळीतून दाखवून दिले. त्याने केवळ ३० चेंडूंत अर्धशतक लगावत संघाला तब्बल २२ चेंडू राखत विजयी केले. कर्णधार पाटीदारनेही १६ चेंडूंत ३४ धावांची आग ओकणारी खेळी करीत विजयात मोलाचा वाटा दिला.