कर्जतमध्ये भव्य पदयात्रा; २५ हजार समर्थक एकवटले
कर्जत (प्रतिनिधी गौतम मोरे):- कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दिनांक २५ रोजी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत येथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त कर्जत येथे घारे यांनी भव्य पदयात्रा काढत विराट शक्तिप्रदर्शन केले.
या पदयात्रेला सुमारे २० ते २५ हजार समर्थक यावेळी उपस्थित होते. यावेळी कर्जत पोलिस ग्राऊंड येथील जाहीर सभेत बोलताना सुधाकर घारे यांनी कर्जत खालापूरातील जनतेला उद्देशून म्हणाले की, माझा पक्ष तुम्ही आहात, माझे उमेदवार तुम्ही आहात.”
सुधाकर घारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने त्यांनी काढलेल्या पदयात्रेला माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, अशोक भोपतराव, भरत भगत, अंकित साखरे, सुरेखा खेडकर, संतोष बैलमारे, भगवान भोईर, भगवान चंचे, मनीष यादव, वैशाली जाधव, रंजना धुळे, ऍडव्होकेट स्वप्नील पालकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. सुधाकर घारे यांनी भाषणात आपल्यासोबत अनेक पक्ष येणार, तसेच अनेक अदृष्य शक्ती आपल्यासोबत असल्याचे सांगितले.
मला तिकीट कोठून मिळेल असे अनेकांना वाटत होते. मात्र मला तिकीटाची आवश्यकता नाही. जनता माझ्या सोबत आहे. असे घारे म्हणाले.