पंढरपूर, (श्रीकृष्ण देशपांडे) :- झाडे लावाही आणि ते जगवा. कारण झाडे लावणे सोपे आहे. पण ते जगवणे, त्याचे संवर्धन करणे कष्टाचे आहे. त्यामुळे झाडांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.
सामाजिक वनीकरण विभाग आणि सोलापूर सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथे आज रोपवाटिका, रोप लावणे आणि संवर्धन याबाबत कार्यशाळा झाली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी गावचे सरपंच कुलदीप कौलगे, सौ. स्मिता सुभाष देशमुख, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, राजकुमार पाटील, विद्याधर गावडे, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, मोहन अनपट आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, सोलापूर दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण जास्तीत जास्त झाडे लावून ही परिस्थिती बदलली जाऊ शकते. त्यासाठी झाडे लावली पाहिजे, त्यांचे संवर्धन करायला हवे.
मोहन अनपट यांनी पुढे असे सांगितले की, चिंचणी गावात विविध प्रकारच्या झाडांचे यशस्वीरित्या संवर्धन करण्यात आले आहे. यामुळे चिंचणीत पर्यावरण चांगले आहे. चिंचणी प्रमाणे अनेक गावात झाडांचे संवर्धन होण्याची गरज आहे,
सौ. माने यांनी रोपांची निर्मिती, रोप लावणे, तसेच त्याची जपणूक या सर्व बाबी शास्त्रीय पद्धतीने करायला हवे, असे सांगितले.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत १५३ जणांनी सहभाग नोंदवला होता. रोप लावण्याबरोबरच रोपांचे संवर्धन, जपणूक कशी करावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
]]>