अलविदा 'युनिव्हर्स बॉस'

लीड्स: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या ४२व्या सामन्यात आज अफगाणिस्तान व वेस्ट इंडिज यांच्यात येथील यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंडवर लढत झाली. तळाला असलेल्या दोन्ही संघातील लढतीत वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल आपल्या संघासाठी शेवटचा सामना खेळाला. विंडीजसाठी विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळण्याचा पराक्रम करणारा गेल आज मात्र काही खास करू शकला नाही. सहाव्या षटकातच अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज दवलत झरदानला मोठा फटका मारण्याच्या नादात किपर इक्राम अलिखीलकडे झेल देत बाद झाला आणि स्टेडियमवर उपस्थित सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत गेलला अभिवादन केलं. भारताविरुद्ध मँचेस्टरच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत गेलने आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. विश्वचषकानंतर भारताचा होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात गेल आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळेल.

विश्वचषक सामन्यांत गेलने वेस्ट इंडीजसाठी सर्वाधिक ३५ सामन्यांत ३५.९३ च्या सरासरीने ११८६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या दोन शतकांचा व सहा अर्धशतकांचा समावेश आहे. ब्रायन लाराच्या १२२५ धावांचा विक्रम मोडण्यात गेल थोडासा कमी पडला. २०१५ च्या स्पर्धेत गेलने झिम्बाबेविरुद्ध २१५ धावा ठोकल्या होत्या, ज्या विंडीजसाठी एका सामन्यात सर्वाधिक तर विश्वचषकाच्या इतिहासातील केवळ दुसरे द्विशतक ठरले आहे. याच सामन्यात मार्लन सॅम्युएल्ससोबत दुसऱ्या गड्यासाठी केली ३७२ धावांची भागीदारी ही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम भागीदारी आहे.

३९ वर्षीय ख्रिस गेलने २००३, २००७, २०११, २०१५ व येथे चालू असलेल्या २०१९ अश्या पाच विश्वचषक स्पर्धांत वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या बॅटिंगसह खास शैलीसाठीही प्रसिद्ध गेलची जादू आता प्रेक्षकांना यापुढे विश्वचषकात दिसणार नाही.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *