भारताचे सेमी फायनलचे तिकीट पक्के…

विश्वचषक स्पर्धा २०१९: बांगलादेशला २८ धावांनी पराभूत करीत भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा व एकूण सातव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला

बर्मिंघम: ‘गणपती बाप्पा मोरया…’, ‘जितेगा भाय जितेगा, हिंदुस्थान जितेगा…’ अश्या जय घोषणांनी येथील एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड गाजवत भारतीय प्रेक्षकांनी आज आपल्या संघाला आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना पाहिलं. भारतासाठी बाद फेरीत पोहोचण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात प्रत्येक स्तरावर चांगली कामगिरी करीत बांगलादेशचा २८ धावांनी पराभव करीत सेमी फायनलचे तिकीट पक्के केले. रोहित शर्माचे आणखी एक शतक व जसप्रीत बुमराच्या चार बाळी भारतीय विजयाच्या वैशिट्ये ठरले.

मागील सामन्यात यजमान इंग्लंडकडून ३१ धावांनी स्पर्धेतील पहिला पराभव स्वीकारलेल्या भारताने नाणेफेक जिंकत आपल्या संघात दोन बदल केले. इंग्लंडने मागील सामन्यात नाणेफेक जिंकत केलेली तुफानी फलंदाजी कोहलीच्या चांगलीच जिव्हारी लागली असावी. परिणामी, त्यानेही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केदारच्या जागी २००७ नंतर प्रथमच संधी मिळालेला दिनेश कार्तिक व कुलदीप यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला खेळवत कोहलीने आपला संघ उतरवला.

भारतीय फलंदाजांनी हा सामना चांगलाच मनावर घेत के. एल. राहुल व मुंबईकर रोहित शर्मा या सलामी जोडीने तुफानी फलंदाजी करीत बांग्लादेशच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतला. मश्रफी मोर्तुझा, मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिझूर रहमान या आघाडीच्या प्रमुख गोलंदाजांना चौकार-षटकार खेचत या जोडीने भारताला ५० चेंडूंत पन्नाशी गाठून दिली. मागील सामन्यात आपल्या शतकात एकही षटकार न खेचता आलेल्या रोहितने आज मात्र तो राग बांग्लादेशच्या गोलंदाजांवर काढला. रोहितने ४५ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावत आणखी तितकेच चेंडू खर्च करीत स्पर्धेतील चौथे शतक ठोकले. रोहितने आपल्या खेळीत पाच षटकार खेचले. विश्वचषकाच्या एका स्पर्धेत चार शतके ठोकणारा तो श्रीलंकेच्या कुमार संगकारा (२०१५) नंतर दुसराच खेळाडू ठरला.

दुसरा सलामीवीर राहुलनेही ५७ चेंडूंत आपले अर्धशतक लगावत रोहितला चांगली साथ दिली. या दोघांनी पहिल्या २५ षटकांत आपला आपली विकेट न देता स्पर्धेतील आणखी एक विक्रम केला. जोडीलाच, स्पर्धेतील सलामीची सर्वोत्तम भागीदारीही रचित भारताला मोठ्या धावसंख्येकडे वळविले. ३०व्या षटकात रोहित बाद झाल्यानंतर लगेचच २० चेंडूच्या अंतराने राहुलनेही (७७) तंबूचा रस्ता धरला. कोहली (२६) सेट झालेला दिसत असताना तोही मुस्तफिझूरचा आखूड टप्प्याचा चेंडू सीमारेषेपलीकडे धाडताना मिड-विकेटला झेल देत बाद झाला.

भारताच्या मधल्या फळीने संमिश्र फलंदाजी करीत भारताला तीनशे धावांचा पल्ला गाठून दिला. रिषभ पंत (४८), महेंद्र सिंग धोनी (३५) दिनेश कार्तिक (८) यांनी थोडीशी आक्रमक फलंदाजी करीत भारताला समाधानकारक धावसंख्येवर आणले. हार्दिक पांड्या मात्र आज भोपळाही न फोडता तंबूत परतला. अन्यथा भारताने ३५० चा आकडा नक्कीच गाठला असता. बांग्लादेशच्या मुस्तफिझूर रहमानने मधल्या षटकांत व नंतर डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करीत भारताच्या धावगतीवर अंकुश घातला. आपल्या दहा षटकांत ५९ धावा खर्च करीत त्याने भारताचा निम्मा संघ तंबूत धाडला.

प्रतिउत्तरादाखल उतरलेल्या बांगलादेशने सावध सुरुवात करीत भारतीय प्रमुख गोलंदाजांची षटके व्यवस्थितरीत्या हाताळली. तमीम इकबाल व सौम्या सरकारने एकेरी-दुहेरी धाव घेत धावफलक पुढे ढकलायचा प्रयत्न केला. परंतु कसलेल्या भारतीय गोलंदाजांनी आपल्या जाळ्यात अडकवत दहाव्या षटकात बांगलादेशला पहिला धक्का दिला. मोहम्मद शमीचा आखूड टप्याच्या चेंडू तटवण्याच्या नादात तमीमच्या (२२) बॅटचा कडा घेत थेट स्टॅम्प्सवर आदळला. सौम्या सरकारही (३३) थोड्या वेळाने हार्दिक पांड्यांच्या गोलंदाजीवर कव्हर्सला उभ्या असलेल्या कोहलीकडे झेल देत माघारी परतला.

बांगलादेशला वेळोवेळो संकटातून बाहेर काढणारी जोडीने आता मैदानाचा ताबा घेतला होता. संघातील दोन अनुभवी फलंदाज शाकिब-अल-हसन व मुशफिकूर रहीम यांनी तिसऱ्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी रचली खरी, परंतु चहलला स्वीप मारण्याच्या नादात शमीकडे झेल देत तोही तंबूत परतला आणि संघाला अडचणीत टाकले.

बांगलादेशला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला पराभूत करणे गरजेचे होते. त्याच अनुषंगाने त्यांनी शेवटच्या दहा षटकांत गोलंदाजी करीत भारताला मोठ्या धावसंख्येपासून रोखले. या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ३२२ धावांचं लक्षही पार केलं होतं. शाकिबने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत अगदी शांततेने पाठलाग सुरु ठेवला. त्याने एकहाती भारतीय गोलंदाजांना खेळून काढत धावफलक धावत ठेवला. पहिल्या दहा षटकांत जिथे बांगलादेशाच्या ४० धावा होत्या, त्याच २० षटकांअखेरीस १०३ झाल्या होत्या. थोडक्यात, शाकिबने आपला अनुभव पणाला लावत संघाची जबाबदारी घेतली.

जसजशी षटके संपत होती तसतशी प्रेक्षकांची धुकधुकही वाढत होती. भारताला सामन्यात आणण्यात विकेट्सची गरज होती. नेमके हेच लक्षात घेत भारताच्या गोलंदाजांनी लिंटन दास (२२), मोसाद्देकी हुसेन (३) व सेट झालेला शाकिब (६६) यांना एकामागोमाग एक बाद करीत भारताला विजयाच्या जवळ आणले. बांगलादेशाच्या सब्बीर रहमान (३६) व मोहम्मद सैफुद्दीन (नाबाद ५१) यांनी सातव्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी करीत भारताचा विजय आणखी लांबवला. बुमराने आपल्या शेवटच्या संघाच्या ४८व्या षटकात रुबेला हुसेन (९) व मुस्तफिझूर रहमान (०) यांना सलग त्रिफळाचित करीत भारतचा सेमी फायनाचा मार्ग पक्का केला. बुमराने सर्वाधिक चार तर हार्दिक पांड्याने तीन गडी बॅड करीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक

भारत: ३१४/९ (५०) – रोहित शर्मा १०४ (९२), के. एल. राहुल ७७ (९२), मुस्तफिझूर रहमान १०-१-५९-५

बांगलादेश: २८६/१० (४८) – शाकिब-अल-हसन ६६ (७४), मोहम्मद सैफुद्दीन ५१* (३८), जसप्रीत बुमरा १०-१-५५-४

भारत २८ धावांनी विजयी

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *