क्रिकेट विश्वचषकाची मजा एका आगळ्यावेगळ्या स्वरूपात

सध्या जगभरात क्रिकेट विश्वचषकाची चांगलीच धुमाकूळ आहे. क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक देशांत तुम्हाला चर्चा दिसेल ती फक्त आणि फक्त क्रिकेटची. हा संघ जिंकला तर हा संघ बाहेर जाईल, हा संघ हरला तर या संघाला फायदा होईल वगैरे वैगरे. पण याच धुमाळीत मोठी चर्चा आहे ती दोन अश्या अवलियांची जे हा विश्वचषक आपल्या ‘स्टाईल’ मध्ये करतात. हो मी अवलिया यासाठी म्हटलं आहे कि हे दोन व्यक्तिमत्व जरी क्रिकेट पत्रकारितेतील जगप्रसिद्ध असले तरी ते एखादी गोष्ट आपल्याच शैलीत करतात. त्यांची लिखाणाची स्टाईल म्हणा, एखाद्या गोष्टीचा आकलन म्हणा ते त्यांच्या स्टायलमध्येच करतात. आणि संपूर्ण क्रिकेट विश्व त्यांच्या लेखनाला, त्यांच्या वार्तांकनाला सलामच करतो. आज क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर या दोघांना भेटण्याचा योग्य आला. त्यांच्यासोबत मनमुराद गप्पा मारण्याचा आनंद घेतला.

मूळचा ठाण्याचा असलेला गौरव जोशी व भारतातील एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकात दहा वर्षांहून अधिक काळ वृत्तांकन केलेले भारत सुंदरेसन यांनी हे विश्वचषक आपल्या अनोख्या पद्धतीने कव्हर करतात. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये वास्तवास असलेले हे दोघे ‘जय-वीरू’ मोटरहोम व्हॅनमधून संपूर्ण इंग्लंड पिंजून काढत हा वर्ल्डकप कव्हर करतात.

२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळेस पहिल्यांदा दोघांच्या डोक्यात काहीतरी वेगळं करायची आयडिया आली होती. भरतने २०११ साली भारतात झालेला विश्वचषक केला होता. त्यामुळे मोठी स्पर्धा कव्हर करण्याचा त्याच्याकडे अनुभव होताच. शिवाय सर्वसाधारण रिपोर्टींग व्यतिरिक्त अजून काहीतरी नवी करायचं हे तेव्हा दोघांनी ठरवलं होते. अगदी तेव्हापासूनच दोघांनी प्लॅनिंग करायला सुरुवात केली. गौरव लहानाचा मोठा ऑस्ट्रेलियाला झाल्यामुळे स्वतःची कामे स्वतः कशी करायची हे त्याला माहित आहे. तर भरतही ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाल्यामुळे तोही या गोष्टी शिकला. आपल्या भारताप्रमाणे ऑस्ट्रलियामध्ये कामवाली बाई हा मुळात प्रकारच नसतो हेही मला या दोघांकडून पहिल्यांदा समजलं. त्यामुळे ‘स्वावलंबन’ या गोष्टीचा खरा अर्धा काय असतो हे या दोघांकडून समजतं.

आपल्या मुंबईत आणि इंग्लंडमध्ये काही गोष्टींत साम्य आहेत ती म्हणजे इथले रस्ते, इथले ट्रॅफिक. तसं इकडे आपल्यासारखी इतकी ट्रॅफिक नसते पण जेव्हा लागते तेव्हा खरंच लागते. भरतला मुंबईतल्या घाटकोपरसारख्या भागात गाडी चालवण्याचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांची सर्वात मोठी समस्या इथेच संपली. शिवाय ऑस्ट्रेलियामध्ये राहत असल्यामुळे स्वतःची कामे कामे दोघेही अगदी व्यवस्थित करतात. इंग्लंड तसं पहिला तर मोठा देश नाही. त्यामुळे एक शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करणे तितके त्रासदायक नसते. दळणवळणाची पुरेशी साधने असल्यामुळे येथील जनजीवन सुरळीत चालतं.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे एकूण १७ सामने हे दोघे कव्हर करत आहेत. म्हणजेच दर दोन-दिवसाला त्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करावा लागतो. आणि मोठी गाडी असल्यामुळे त्यांना पार्किंगसाठीही जागेचा प्रश्न उद्भवतो. पण त्यावरही तोडगा काढत हे दोघे संपूर्ण इंग्लंड फिरत आहेत आणि विश्वचषकाचे ताजे-ताजे अपडेट आपल्या युट्यूब चैनलद्वारे (वर्ल्ड कप ऑन व्हील्स World Cup On Wheels) तमाम क्रिकेटप्रेमींना देत आहेत. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कार्याची दखल आजी-माजी क्रिकेटपटूंनीही घेतली असून साऱ्या क्रिकेट विश्वातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज मॅथ्यू हेडन यांना जेव्हा ही आयडिया समजली तेव्हा त्यांनी त्यांचं कौतुक करीत पुढील प्रवासास शुभेच्छाही दिल्या. आज (दि. २५ जून) लॉर्ड्सला जेव्हा लिटल मास्टर सुनील गावस्कर यांना या दोघांनी माहिती दिली तेव्हा गावस्करही भलतेच खुश झाले.

फस्ट इम्प्रेशन इज नॉट युअर लास्ट इम्प्रेशन

२०१२ च्या इंडियन प्रीमियर लीगदरम्यान यांची पहिल्यांदा भेट झाली. तेव्हा इतकी खास ओळख नव्हती. ऑस्ट्रेलियात लहानाचा मोठा झालेल्या गौरवचा उच्चार भरतला इतका आवडत नसे. त्यानंतर २०१३ च्या महिला विश्वचषका दरम्यान मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोघे एकमेकांचे मित्र झाले. त्यानंतर २०१४ सालच्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यास जाण्यास भरतला संधी मिळाली आणि इथूनच घट्ट मैत्रीची सुरुवात झाली. दोघांचा स्वभाव जवळपास सारखा असल्यामुळे एकमेकांना समजून घेण्यास जास्त वेळ गेला नाही. नेहमी हसरा चेहरा, सर्वाशी हसत खेळत राहणं, एखाद्याची टिंगल करणं (हसत हसत) अश्या बऱ्याच गोष्टी या दोघांमध्ये सारख्या आहेत. वानखेडे स्टेडियममधील पत्रकारांनी त्या अनुभवल्याही आहेत. क्रिकेटची चांगली समज असल्यामुळे तोही फायदा त्यांना झाला.

गौरवने इंग्लंडमध्ये २०१३ व २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी कव्हर केली होती तर भरतने २०१७ ची. हा अनुभव घेऊन घेऊन इंग्लंडमधल्या वातावरणाशी समरस होण्यास त्यांनी सुरुवात केली आणि हा वेगळा प्रकल्प हाती घेतला. केवळ विश्वचषकाशी निगडित नाही तर जुन्या क्रिकेटपटूंना भेटणं, सध्याच्या क्रिकेटपटूंचे कोच, वडील, मित्र परिवार, वरिष्ठ पत्रकार यांना भेटून आपल्या शोमध्ये सामील करून घेतले आहे.

क्रिकेटचं काय, कोणत्याही क्रीडा प्रकारात अश्या प्रकारचा शो बहुदा जगात पहिल्यांदाच झाला असावा. युरोपात या गोष्टी शक्य असल्याने आगामी काळात क्रिकेटप्रमाणे इतरही खेळात असा शो कोणीतरी करावा अशी त्यांची इच्छा आहे. अश्यांना आपल्याकडून योग्य मार्गदर्शन देण्यास तयार असल्याचं या दोघांनी म्हटलं आहे.

येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला आणखी गौरव व भरत पाहायला मिळतील यात शंका नाही. कदाचित गौरव-भरत होणं तितकं सोपं नाही पण असा प्रयत्न पाहायला नक्कीच मिळेल.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *