चलाख विराटसेनेपुढे विंडीजची शरणागती

विश्वचषक स्पर्धा २०१९: दुबळ्या विंडीजला पराभूत करीत भारताने आपली विजयी घोडदौड कायम राखली

मँचेस्टर (इंग्लंड): अफगाणिस्तानविरुद्ध हरताहरता जिंकलेल्या सामन्यातून चांगलाच धडा घेतलेल्या विराटच्या सेनेने वेस्ट इंडिजविरुद्ध आपला सर्वोत्तम खेळ दाखवत १२५ धावांनी विजय मिळवीत आपली विजयी मालिका अखंडित ठेवली. या विजयासह भारताने ११ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. विराट कोहली व महेंद्र सिंग धोनीची अर्धशतके, मोहम्मद शमीच्या चार बळी अशी अष्टपैलू कामगिरी करीत भारताने दिलेल्या २६९ धावांचं आव्हान पार करताना वेस्ट इंडिजचा संघ ३४.२ षटकांत केवळ १४३ धावाच करू शकला.

जखमी भुवनेश्वर कुमारच्या जागी वर्णी लागलेल्या शमीने मागच्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात आपली छाप सोडत पाचव्याच षटकात ख्रिस गेलला (६) तंबूत धाडीत भारताला चांगली सुरुवात करून दिली. शमीने आपल्या पुढच्याच षटकात शाई होपचा त्रिफळा उडवीत प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकले.

या विश्वचषक स्पर्धेत कोणता संघ कोणाला पराभूत करेल याचा नेम नाही. कालच्या (२६ जून) झालेल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करून चांगलाच धक्का दिला. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतावर थोडेसे दडपण होते. परंतु, कोणत्याही दडपणाला सामोरे जाण्याची जिद्द असलेल्या विराटच्या संघाने आजही ते सिद्ध केले. या स्पर्धेत एकही सामना न गमावलेल्या भारताने विंडीजच्या मधल्या फळीला चांगले खेळवीत सामन्यात डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. आंद्रे रसेलच्या जागी आलेला सुनील अम्बरीस (३१), निकोलस पुरण (२८) व शिमरॉन हेटमायर (१८) या मधल्या फळीच्या भरवशाच्या फलंदाजांना स्वस्तात निपटल्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी उरलेली कामगिरी फत्ते केली.चहलने विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला (६) बाद केल्यांनतर जसप्रीत बुमराने २७व्या षटकात कार्लोस ब्रेथवेट (१) व फॅबियन एलेन (०) यांना सलगच्या चेंडूवर बाद करीत भारताचा विजय पक्का केला. नऊ फलंदाज १२४ धावांत बाद झाल्यानंतर भारत विंडीजला लवकरच बाद करेल असे दिसत असताना शेवटच्या गड्यासाठी १९ धावा जमवत भारताचा विजय काहीसा लांबवला. परंतु परिपक्व आलेल्या भारताने या तळाच्या फलंदाजांना जास्त काळ टिकू न देता ३५व्या षटकात बाद करीत सामना जिंकला.

तत्पूर्वी, विराटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित-राहुल या जोडीने डावाची नेहमीप्रमाणे सावध सुरुवात केली. सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्मा (१८) विवादित बाद झाल्यानंतर कोहलीने राहुलच्या साथीने सूत्रे आपल्या हाती घेतली. या जोडीने मागील सामन्यातही अर्धशतकीय भागीदारी केल्यानंतर याही सामन्यात ती कामगिरी चालू ठेवली. दुसऱ्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी केल्यानंतर राहुल (४८) पुन्हा एकदा चुकीचा फटका मारून तंबूत परतला.

तीनशेच्या वर पल्ला गाठताना दिसणाऱ्या भारताच्या धावगातील विंडीजच्या गोलंदाजांनी ब्रेक लावला. विजय शंकर (१४) व केदार जाधव (७) हे पुन्हा एकदा धावा करण्यास फेल ठरले. परंतु अनुभवाने परिपक्व असलेल्या भारताने परिस्थिती चांगलीच हाताळली. धोनी (५६) व हार्दिक पांड्या (४६) यांनी सहाव्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी रचित भारताला समाधानकारक धावसंख्येवर आणले.

दरम्यान, कर्णधार विराट कोहलीने स्पर्धेतील आपले सलग चौथे अर्धशतक झळकावता भारताची मधल्या समस्या सोडवली. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधले आपले ५३वे अर्धशतक झळकावत सामनावीराचा किताबही फटकावला. कोहली-धोनीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आपल्या निर्धारित ५० षटकांत २६८ धावा उभारल्या. विंडीजच्या केमार रोचने सर्वाधिक तीन गडी बाद केले.

याच पराभवाबरोबर विंडीजच्या स्पर्धेतील आशा संपुष्ठात आल्या तर भारत एका विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

संक्षिप्त धावफलक

भारत: २६८/७ (५०) – कोहली ७२(८२), धोनी ५६(६१), रोच १०-०-३६-३

वेस्ट इंडिज: सुनील अम्बरीस ३१(४०), निकोलस पुरण २८(५०), मोहम्मद शमी ६.२-०-१६-४

भारत १२५ धावांनी विजयी

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *