भारताचा फादर्स डे साजरा, पाकिस्तानला केलं सातव्यांदा पराभूत

मँचेस्टर: जाहीरबाजी, आजी-माजी खेळाडूंचे सल्ले, दोन्ही देशांच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा. विश्व क्रिकेटमधला सर्वात मोठा व हाय-वोल्टेज भारत-पाकिस्तान सामना भारताने एका हाती जिंकत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सातच्या सात सामने जिंकत आपली विजयाची परंपरा कायम राखली. रोहीत शर्माचे शतक, राहुल-कोहलीचे अर्धशतक, गोलंदाजांची अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने स्पर्धेतील आपला तिसरा सामना जिंकत दोन महत्वपूर्ण गुण मिळवले.

आपली विजयी मालिका अखंडित राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या कोहलीने नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीस उतरला. जखमी शिखर धवनच्या जागी विजय शंकरला संधी मिळाल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा केएल राहुलने रोहित शर्मासोबत सलामी केली. पाकिस्तानविरुद्ध विश्वकरंडक स्पर्धेत आपला सलग सातवा विजय नोंदवण्यासाठी उतरलेल्या राहुल-रोहित जोडीने पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांना चांगले खेळून काढत संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. सहाच्या सरासरीने धावा काढणाऱ्या या सलामी जोडीने १०५ चेंडूंत शतकी भागीदारी रचली. हि जोडी आणखी टिकेल असे वाटत असताना वहाब रियाझच्या एका स्लोवर चेंडूंवर बाबर आझमकडे झेल देत राहुल (५७) बाद झाला.

पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक, आणि आज पाकिस्तानविरुद्धही तितकीच दणकी खेळी. आपल्या खेळात नेहमीच सातत्य दाखवणाऱ्या रोहित शर्माने कारकिर्दीतील २४वे शतक झळकावत आपली योग्यता सिद्ध केली. केवळ ८५ चेंडूंत रोहितने शतक झळकावत मँचेस्टरच्या मैदानावरील उपस्थित भारतीय प्रेक्षकांना खुश केले. विश्वचषक स्पर्धांत पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा रोहित शर्मा हा कोहलीनंतर दुसराच फलंदाज ठरला. दुसरीकडे राहुल तंबूत परतल्यानंतर कोहलीनेही सुरुवातीस सावध पवित्रा घेत नंतर आपला खेळ आक्रमक केला. रोहितने ११३ चेंडूंत १४ चौकार व तीन षटकार खेचत १४० धावा केल्या तर कर्णधार कोहलीने ६५ चेंडूंत सात चौकारांसह ७७ धावांचं योगदान दिलं. महत्वाचं म्हणजे भारतीय डावात पहिल्या दोन गड्यांसाठी चांगल्या भागीदारी जमल्या. पहिल्या गड्यासाठी १३६ तर दुसऱ्या गड्यासाठी रोहित-कोहलीने ९८ धावा केल्या. शिवाय चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या पांड्यानेही (२६) कोहलीसोबत चौथ्या गड्यासाठी ताबडतोब ५१ धावांची भागीदारी केली. भारताच्या या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर संघाने पाच बाद ३३६ पर्यंत मजल मारली. पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला किफायती गोलंदाजी करता आली नाही. आमिरने आपल्या दहा षटकांत ४७ धावांत तीन भारतीय फलंदाजांना तंबूत धाडले. तर हसन अली, वहाब रियाझ यांना प्रत्येकी एक-एक गडी बाद करता आला.

सामन्याआधीच जाहिरातबाजीने फेमस झालेल्या या हाय-वोल्टेज सामन्यात दोन्ही संघांवर दडपण होतेच. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी भारताकडे होती. ३३७ धावांचं लक्ष्य दिल्यानंतर सामन्याची मदार भारतीय गोलंदाजांवर होती. बुमरा-भुवी या अनुभवी जोडीसमोर पाकिस्तानच्या युवा व अनुभवी अश्या संमिश्र फलंदाजीचं आव्हान होतं. पाचव्या षटकाचा चौथा चेंडू टाकल्यानंतर भुवनेश्वर कुमार जखमी झाला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. भारताच्या अडचणीत आणखी भर पडली. स्पर्धेतील आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या विजय शंकरने भुवीचे पाचवे षटक पूर्ण करण्यास सुरुवात केली आणि आपल्या पहिल्याच चेंडूवर इमाम-अल-हक (७) याला बाद करीत पाकिस्तानला पहिला धक्का दिला.

पाकिस्तानसाठी नेहमीच धावून येणाऱ्या फकर झमान व बाबर आझम या जोडीने डावाची पुढील सूत्रे आपल्या हाती घेतली. या जोडीने जवळजवळ सर्वच भारतीय गोलंदाजांना खेळून काढत बघताबघता ५० धावांची भागीदारी रचली. एकेरी-दुहेरी धाव घेत या जोडीने मिळणाऱ्या कमकुवत चेंडूंना सीमारेषेच्या रस्ताही दाखवला. दोघांनी शतकीय भागीदारी रचित धावफलक धावत ठेवला. घातक वाटणारी ही जोडी फोडण्यास कुलदीप यादवला यश आलं. २४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कट करण्याच्या नादात बाबर (४८) त्रिफळाचित झाला. लगेचच फकरही (६२) कुलदीपला मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद होत पाकिस्तान संकटात आला. हार्दिक पांड्याने एकाच षटकात मोहम्मद हाफिज (९) व शोएब मलिक (०) यांना तंबूत धाडीत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. सर्फराज अहमद (१२) शंकरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित होत पाकिस्तानची अवस्था सहा बाद १६५ अशी झाली.

सर्फराज बाद झाल्यानंतर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. परिणामी, जवळपास ५० मिनिटांच्या व्यत्ययामुळे पाकिस्तानला ४० षटकांत ३०२ धावांचं अशक्य लक्ष्य देण्यात आलं.

डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार भारतीय विजयाची केवळ औपचारिकता राहिली असताना पाकिस्तानच्या शादाब खा (२०) व इमाद वासिम (४६) यांनी मिळालेल्या पाच षटकांत चांगली फलंदाजी केली. दोघांनी सातव्या गड्यासाठी नाबाद ४७ धावांची भागीदारी केली. भारताने हा सामना ८९ धावांनी जिंकत आपली विजयाची घोडदौड कायम ठेवली.

संक्षिप्त धावफलक

भारत ३३६/५ (५०) – रोहित १४० (११३), कोहली ७७ (६५), अमीर ३-४७ (१०)

पाकिस्तान २१२/६ (४०) – फकर ६२ (७५), बाबर ४८ (५७), शंकर २-२२ (५.२), कुलदीप २-३२ (९)

भारत ८९ धावांनी विजयी (डीएलएस)

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *