कांगारूंना लोळवले, भारताचा विश्वचषकात दुसरा विजय

आघाडीच्या फलंदाजांची तुफान फलंदाजी व गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव केला.

लंडन: शिखर धवनचा गवसलेला फॉर्म, रोहित-कोहलीची अर्धशतके, बुमरा-भुवनेश्वर जोडीचा भेदक मारा व चहलची चाळपई. अश्या रंगतदार झालेल्या सामन्यात भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी पराभूत करीत विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात शानदार विजय संपादित केला. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर आज भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करीत ३५२ धावांचा डोंगर उभारला. प्रतिउत्तरादाखल, ऑस्ट्रेलियाने आपल्या ५० षटकांत सर्वबाद ३१६ धावाच केल्या.

ढगाळ वातावरणात सुरु झालेल्या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीने दमदार सलामी देत १३७ धावांची भरभक्कम भागीदारी रचित मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रोहित (५७) बाद झाल्यानंतर कोहलीने धवनसोबत ९३ धावांची भागीदारी करीत भारताला चांगल्या स्थितीत आणले. दरम्यान, धवनने आपले १७वे एकदिवसीय शतक झळकावत आपण आयसीसी सामान्यांचा मोठा खेळाडू का आहोत दे दाखवून दिले. धवन (११७) तंबूत परतल्यानंतर संघाने हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर बढती दिली. हार्दिकने ताबडतोब फलंदाजी करीत केवळ २७ चेंडूंचा सामना करीत चार चौकार व तीन षटकार खेचत ४८ धावांचं योगदान दिल. कोहलीनेही ८७ धावा करीत भारताला ३५२ धावांचा पल्ला गाठून दिला. विश्वचषकाच्या कोणत्याही सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३५० धावांचा पल्ला गाठण्याची हि पहिलीच वेळ होती.

ऑस्ट्रेलियाने धावांचा पाठलाग करताना सावधरित्या सुरुवात केली. ऍरॉन फिंच व डेव्हिड वॉर्नर यांनी ६१ धावांची भागीदारी करीत भारताच्या बरोबरीने चालण्याचा प्रयत्न केला. भारताकडे बुमरा, भुवनेश्वर यांच्या जोडीला कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल यांचा भरणा असल्यामुळे भारत नक्कीच या सामन्यात वरचढ असे चित्र होते. शिवाय, हार्दिक पांड्या व पार्ट-टायमर केदार जाधव हेही गोलंदाजीत तितकाच हातभार लावतात. अश्या परिस्थितीत कोहलीने वेळोवेळी गोलंदाजीत बदल करून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खेळते ठेवले. अधूनमधून ऑस्ट्रेलियाचे फलंदाज विकेट्स टाकत गेले आणि शेवटी रनरेट ११च्या वर जाऊन पोचला. याचाच फायदा भारताच्या प्रमुख अस्त्रांनी घेत ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद केले. वॉर्नर (५६), स्मिथ (६९), अलेक्स केरी (नाबाद ५५) यांनी केविलवाणा प्रयत्न केला खरा पण अनुभवाने परिपूर्ण असलेल्या भारतीय गोलंदाजांनी त्यांना डोकं वर काढू दिलं नाही. बुमरा, भुवनेश्वर यांनी प्रत्येकी तीन तर चहलने दोन गडी बाद करीत ऑस्ट्रेलियाला ऑलआउट केले.

संक्षिप्त धावफलक:

भारत: ३५२/५ (५०) – धवन ११७(१०९), कोहली ८२(७७), स्टोयनीस ७-०-६२-२, कमिन्स १०-०-५५-१

ऑस्ट्रेलिया: ३१६/१० (५०) – स्मिथ ६९(७०), वॉर्नर ५६(८४), भूवनेश्वर १०-०-५०-३, बुमरा १०-१-६१-३

भारत ३६ धावांनी विजयी

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *