मुंबई:- दिनांक ०५ जून २०१९ रोजी मराठी साहित्यिकांसह मराठी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची “मराठी भाषा कायदा व प्राधिकरण” ह्या विषयावर आधारित बैठक मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे संपन्न झाली.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा साै. अरुणा ढेरे, मसाप चे अध्यक्ष श्री मिलिंद जोशी, पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, कालनिर्णयचे श्री. जयराज साळगावकर, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष श्री. दिपक पवार, मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा सौ. उषा तांबे, सादर बैठक व ही चळवळ ज्यांच्या पुढाकाराने सुरु झाली ते अ.भा. मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष व आयएएस अधिकारी श्री. लक्ष्मिकांत देशमुख हे या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
सर्व प्रमुख मान्यवरांनी वरील विषयांवर आपापली भूमिका मांडली. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या आणि साहित्य संस्थांशी निगडित असलेल्या काही पदाधिकारी तसेच मराठी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी चित्रपट महामंडळाच्या वतीने तसेच मी मराठी एकीकरण समिती च्या वतीने श्री मसुरकर यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले.
या बैठकीत मराठी शाळांचे सक्षमीकरण करणे. महाराष्ट्राच्या सर्व प्रकारच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता १२ वी पर्यंत मराठी विषय सक्तीचा असला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे. मुंबईत मराठी भवन झाले पाहिजे. आणि महत्वाचे म्हणजे मराठी कायदा व प्राधिकरण स्थापन झाले पाहिजे. या मागण्या सरकारकडे करण्याचे ठरले व त्यासाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचे नक्की करण्यात आले.
धरणे आंदोलनाला महाराष्ट्रभरातून साहित्यिक, प्राध्यापक व शिक्षक संघटना, चित्रपट व नाट्य संघटना, प्रकाशक, लेखक व मराठीसाठी लढणाऱ्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित राहणार असल्याचे श्री. लक्ष्मिकांत देशमुख यांनी सांगितले.
यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीचे अध्यक्ष म्हणून श्री. मधू मंगेश कर्णिक व कार्याध्यक्ष म्हणून श्री. लक्ष्मिकांत देशमुख यांना नेमण्यात आले आहे. कोषाध्यक्ष साै. रेखा नार्वेकर, कोमसाप यांना करण्यात आले असून उपाध्यक्ष म्हणून श्री. ढाले पाटील, मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष, श्री. श्रीपाद जोशी, माजी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व श्री. दिपक पवार- मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष असतील तर प्रमुख कार्यवाह म्हणून श्री. चंद्रशेखर गोखले, कोमसाप व कार्यवाह श्री प्रमोद मसुरकर, मी मराठी एकीकरण समिती असतील असे नक्की करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष श्री. मधू मंगेश कर्णिक यांनी या कार्यासाठी प्रत्येकाने कमीतकमी र. १०००/ – आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
या कृती समितीची बैठक बुधवार दि. १२ जून रोजी मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे होणार असून तदनंतर पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यावेळीच धरणे आंदोलनाचा दिवस जाहिर करण्यात येणार आहे.
या बैठकीला मी मराठी एकीकरण समिती तर्फे मंदार नार्वेकर, हेमंत सावंत, दिपेश नागलकर, धर्मेंद्र घाग, दिनेश शिंदे, प्रकाश शिंदे, तुषार देशमुख इत्यादी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
मी मराठी एकीकरण समिती
]]>