फॅफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकत इंग्लंडला प्रथम फलंदाजीस आमत्रंतीत केले. पहिल्याच षटकात इम्रान ताहीरने विस्फोटक जॉनी बॅरिस्टोला शून्यावर बाद करीत पाहुण्यांना चांगलीच सुरुवात करून दिली. मात्र भक्कम फलंदाजी असलेल्या इंग्लडने डाव सावरत मोठी धावसंख्या उभारली. जेसन रॉय (५५), जो रूट (५१), कर्णधार मॉर्गन (५७) व बेन स्टोक्स (८९) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने आपल्या निर्धारित ५० षटकांत ३११ धावा उभारल्या. आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक तीन तर इम्रान ताहीर व रबाडा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
अनुभवी फलंदाजांची टोळी असलेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी हे लक्ष जरी मोठं असलं तरी अशक्य असं दिसत नव्हतं. मात्र आपल्या घराच्या मैदानावर खेळण्याचा दांडगा अनुभव असलेल्या इंग्लंडने आफ्रिकेला चांगलेच धारेवर धरले. युवा गोलंदाज जोफ्रा आर्चर (३ विकेट्स), लायं प्लंकेट (२ विकेट्स) व बेन स्टोक्स (२ विकेट्स) यांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. क्विंटन डी-कॉक (६८) व डसेन (५०) यांचा अपवाद वगळता एकही फलंदाजाला खेळपट्टीवर जास्त काळ तग धरता आला नाही.
४०व्या षटकात २०७ धावांवर बाद होत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला १०४ धावांनी नमवित आपणच या विश्वचषकाचे प्रबळ दावेदार का आहोत याचे संकेत दिले.
]]>