तो दिवस १५ सप्टेंबर २०१८ दिवस होता. सांयकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास अचानक माझ्या मोबाईलवर फोन आला. दादा काळगाव फाट्यावर लवकर ये, मावशी गाडीवरून पडली आहे. मी घरी गौरी-गणपती असल्यामुळे झेंडूच्या फुलांचा हार करीत बसलो होतो. थोडा वेळ मला सुचेनासे झाले. मी पटकन मोटरसायकल काढली आणि तडक घटनास्थळी पोहचलो. त्यावेळी माझ्या आईस तळमावले येथील एका हॉस्पिटलकडे रवाना केले होते. मी तसाच मोटारसायकल भरधाव वेगात घेऊन तळमावले येथे आलो. त्यावेळी माझ्या आईला एका खाजगी गाडीतून नुकतेच उतरवण्यात येत होते. माझी आई बेशुद्ध अवस्थेत होती. तिला मी हळुवार उचलून घेऊन जवळच असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मात्र आईची अवस्था अत्यंत चिंताजनक होती. तेथील डॉक्टरांनी तात्काळ कराड शहरातील हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. याचवेळी आगोदरच फोन करून सूचना दिलेली रुग्णवाहिका तातडीने तेथे पोहचली. मी आणि माझा मावस भाऊ त्या रुग्णवाहिकेत आईसोबत कराड शहराकडे रवाना झालो. आईची अवस्था पाहून माझ्या शरीराचा थरकाप उडाला होता. अर्ध्या तासात आम्ही कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तातडीच्या सेवा विभागात आईला दाखल करण्यात आले. आणि येथूनच ईश्वराचे दुसरे रूप समजले जाणाऱ्या डॉक्टरांचे अथक प्रयत्न सुरू झाले. सर्व टेस्ट झाल्यानंतर डॉ. राहुल कुमार (मेंदू चिकित्सक तज्ज्ञ) यांनी आईच्या डोक्याला जबर मार लागल्याने मेंदूला खूप इजा पोहचली असल्याचे सांगितले. यावेळी माझ्यासोबत असलेले माझे मामा व इतर नातेवाईक आम्ही सर्वजण चिंताग्रस्त झालो. आमच्या अश्रूंना वाटा मोकळ्या झाल्या. मी आणि माझ्या मामांनी डॉक्टरांचे पाय धरले आणि आईचा फक्त जीव वाचवा ती आमच्यासाठी सर्वस्व आहे, अशी विनवणी केली. यावेळी डॉ. राहुल कुमार (मेंदू चिकित्सक तज्ज्ञ) यांनी आम्हाला धीर दिला आणि ते म्हणाले, मी तर मृत्यूला अडवून धरण्याचे पुरेपूर प्रयत्न करीन. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. आम्हाला डॉक्टरांच्या सकारात्मक बोलण्याने थोडासा धीर आला. मात्र मनामध्ये घुटमळ चालू होती. एव्हाना आईला ऑपरेशन थेटरकडे रवाना करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत डॉ. प्रसन्ना पाटणकर (मेंदू चिकित्सक तज्ज्ञ) सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राहुल कुमार (मेंदू चिकित्सक तज्ज्ञ) यांचे कसोशीने प्रयत्न चालू होते. आम्ही सर्वजण ऑपरेशन थेटरच्या बाहेर परमेश्वराकडे नतमस्तक झालो होतो. खरी तर ही लढाई डॉ. राहुल कुमार सर आणि मृत्यूदेवता यांच्यामध्ये चालू होती. अखेर ऑपरेशन झाले. आम्ही सर्वजण डॉ. राहुल कुमार सर यांच्या भोवती जमा झालो. यावेळी डॉक्टरांनी जीव वाचला असल्याचे सांगितले. मात्र पुढे शरीर किती प्रतिसाद देईल यावर सर्व अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र आम्हा सर्वांचा डॉक्टर व आईवर परिपूर्ण विश्वास होता. आईची प्रतिकार शक्ती खूप चांगली होती. आईचा माझ्यावर खूप जीव होता. काबाडकष्ट करून तिने मला हाताच्या फोडाप्रमाणे वाढविले होते. लेकराला पोरकं करून जाण्याचं आई कधीच धाडस करणार नाही हा माझा आणि माझ्या नातेवाईकांचा विश्वास ठाम होता. जवळ-जवळ २० दिवस आई मृत्यूशी झुंज देत होती. डॉ. राहुल कुमार सर यांचे देखील प्रत्येक दिवशी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन प्रामाणिक प्रयत्न चालू होते. त्यांनी माझे व माझ्या नातेवाईकांचे मनोबल कधी खचून दिले नाही. आणि सरतेशेवटी डॉ. राहुल कुमार यांना यमदेवतेला परत पाठविण्यात यश आले. हरियाणा राज्यामधील फरिदाबाद या शहरात जन्मलेले डॉ. राहुल कुमार हे एक मध्यम वर्गीय कुटुंबातून आहेत. त्यांच्या घरी आई, वडील आणि बहीण असा परिवार. आई उत्तम गृहिणी आणि वडील शासकीय निवृत्त शिक्षक असल्याने उत्तम शिक्षणाचे बालकडू त्यांना घरातूनच मिळाले. मुलाने जनसेवा करावी अशी वडिलांची
धारणा होती. त्या अनुषंगाने डॉ. राहुल कुमार यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचे ठरविले. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण फरिदाबाद येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण (वैद्यकीय शिक्षण) गुजरातमधील जामनेर आणि राजकोट येथे झाले. सध्या ते कराडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रसन्ना पाटणकर (मेंदू चिकित्सक तज्ज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यरत आहेत. येथील पेशंट व त्यांचे नातेवाईक यांच्याशी चांगला परिसंवाद व्हावा; यासाठी स्थानिक मराठी भाषा त्यांनी शिकून घेतली आहे. त्यांना भविष्यातील संकल्प विचारला असता, मायभूमीत परत जाऊन तेथे रुग्णसेवा करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपुलकीची वागणूक देणारे तसेच गोरगरीब रुग्णांसाठी कोगदोपत्री विविध योजनेतून सहकार्य करणारे डॉ राहुल कुमार(मेंदू चिकित्सक तज्ज्ञ) हे नाव आजही अगत्याने घेतले जाते. भविष्यात त्यांच्या हातून रुग्णांप्रति असेच सामाजिक सत्कार्य घडो हीच सदिच्छा!
शब्दांकन – संतोष कदम
संपर्क – ८४८४८३८२७३
]]>