शिवरायांच्या व्यवस्थापनामुळे दुष्काळाच्या झळा कमी

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अशक्य वाटणारे जगातील पहिल्या लोकशाहीवादी, लोककल्याणकारी स्वतंत्र  राष्ट्राची निर्मिती केली. शिवरायांनी उत्कृष्ट व्यवस्थापनातून शेतीला चालना दिली. जलसाठे तयार केले, वनसंपत्तीचे संवर्धन केले. त्यामुळे स्वराज्यातील रयतेला भीषण दुष्काळी परिस्थितीतही सुख मिळाले. शिवाजी महाराजांनी केलेल्या उपाययोजनांच्या खुणा आजही राजगड, तोरणागड परिसरात दिसतात.
शिवरायांनी भूमिपुत्रांची परकियांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तता केली. रयतेच्या संरक्षणासाठी  हाती तलवार घेतली तर रयतेच्या कल्याणासाठी उत्कृष्ट शेती व जलनिती तयार करून शेतकर्‍यांचे कल्याण केले. वनसंपत्तीच्या संवर्धनातून राष्ट्रीय संपत्तीत वाढ केली. छत्रपती शिवरायांच्या या आदर्श वनसंपत्ती संवर्धन, जलव्यवस्थापन, शेती विकासाचा मोठा ठेवा राजगड, तोरणा, पानशेत खोर्‍यासह स्वराज्यात ठिकठिकाणी आहे.  सिंहगडाच्या पायथ्याशी खेड शिवापूरजवळ त्यांनी छोटे धरण बांधले. मोसे, गुंजण, कानंद आदी मावळ खोर्‍यात नदी, ओढे नाल्यावर बांध घालून पाणीसाठे तयार केले. सिंहगड, राजगड, तोरणा अशा असंख्य गडकोटांवर छत्रपती शिवरायांनी खोदलेल्या तळ्यात ऐन उन्हाळ्यातही मुबलक पाणी आहे. शिवरायांनी राबविलेल्या लोककल्याणकारी कामांची मांडणी अतिशय कल्पकतेने व सुधारणेतून केली आहे.  वनसंपत्तीच्या संवर्धनासाठी शिवरायांनी लोकभावना जपत त्यांना वनांच्या रक्षणासाठी एकरूप केले. फळझाडांच्या बागा, देवराई, रायवळ देशी झाडांची जंगले निर्माण करून त्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी चालना दिली. राजगडाच्या पायथ्याला पाल खुर्द येथे शिवरायांनी तयार केलेल्या आंबा, फणस आदी फळझाडांच्या बागेचे अवशेष पाहवयास मिळत आहेत. पानशेत धरण भागातील रायगड जिल्ह्या लगतच्या चांदर, माणगाव, दापसरे, शिरकोली आदी ठिकाणी सह्याद्रीच्या डोंगरदर्‍यात घनदाट देवराई, वनराईची शिवकालीन जंगलातून शिवरायांच्या आदर्श वनसंपत्ती संवर्धनाची साक्ष मिळत आहे.
शिवरायांच्या उपायांचे आजही फायदे 
स्वातंत्र्यानंतर जंगले मोठ्या प्रमाणात वणवे, वृक्षतोड, बांधकाम, धरणे आदींमुळे नष्ट झाली आहेत. असे असले तरी शिवकाळातील देवराई, जंगले, पाणी साठवण तळी, टाके यांचे येथील रहिवाशांना, प्राण्यांना सहाय्य होत आहे.
संकलन:- राजेंद्र निकम , मुंबई,

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *