मुंबई इंडियन्ससाठी धावांचा पाठलाग अगदी सोपा गेला. १३४ धावांचं माफक आव्हान पेलण्यास उतरलेल्या रोहित शर्मा – क्विंटन डीकॉक या जोडीने सावध सुरुवात देत पावरप्लेच्या अखेरीस बिनबाद ४६ धावांची सलामी दिली. फलंदाजीत भोपळा फोडलेल्या रसेलला मुंबईच्या सलामी जोडीने गोलंदाजीतही धुतले. डावाच्या चौथ्या षटकात शर्मा-डीकॉक जोडीने दोन चौकार व दोन षटकार ठोकत तब्बल २१ धावा केल्या. पावरप्ले संपताच मोठा फटका मारण्याच्या नादात डीकॉक (३०) प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कार्तिकने फाईन-लेगला मागे धावत जात एक अप्रतिम झेल टिपला.
दुसऱ्या गड्यासाठी सूर्यकुमार यादव व रोहित शर्मा या अस्सल मुंबईकर जोडीने डीकॉक बाद झाल्यानंतर उरलेली कामगिरी फत्ते केली. कोलकाताच्या सर्वच गोलंदाजांचा पुरेपूर समाचार घेत सामना एक बाजूनेच झुकवला. सामना जिंकण्यासाठी लागणारी झलक, जोश, उत्साह कोलकाताच्या खेळाडूंकडे अजिबात दिसत नव्हता. रसेल, सुनील नरेन, संदीप वॉरियर या सर्वच गोलंदाजांना यादव-शर्मा जोडीने आपल्या शैलीने खेळून काढत मुंबईला पहिल्या स्थानावर आणले.
रोहित शर्माने ४८ चेंडूंचा सामना करीत आठ चौकारांसह नाबाद ५५ धावा करीत सत्रातील आपले दुसरे अर्धशतक झळकावले. तर सूर्यकुमारने त्याला उत्तम साथ देत २७ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकार खेचत नाबाद ४६ धावा केल्या. १७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यादवने रसेलला फाईन-लेगला षटकार खेचत तब्बल २३ चेंडू व नऊ गडी राखत विजय संपादन केला. मुंबईने १८ गुणांसह अव्वल स्थान गुणतालिकेत अव्वल स्थान फटकावले. तर कोलकाताच्या हातातली संधी घालवत सनरायजर्स हैद्राबादला मार्ग मोकळा केला.
तत्पूर्वी, इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत पाहुण्या कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजीस आमंत्रित केले. कोलकातासाठी करो व मरो अश्या लढतीत सलामीच्या फलंदाजांसोबतच आंद्रे रसेलची तुफान फटकेबाजी पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांची मात्र कोलकाताच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. युवा फलंदाज शुभमन गिल व क्रिस लिन यांनी पावरप्लेच्या सहा षटकांत बऱ्यापैकी फलंदाजी केल्यानंतर कोलकाताच्या डावाला मधल्या षटकांत उतरती कळा आली. पावरप्लेपर्यंत बिनबाद ४९ अशी चांगली सुरुवात केल्यानंतरही दहाव्या षटकाअखेरीस पाहुण्यांची अवस्था दोन बाद ६१ अशी झाली. गिल (९) व लिन (४१) हे सलामीवीर तंबूत धाडण्यात हार्दिक पंड्याला यश आलं.
प्लेऑफ मध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या मॅचमध्ये कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक रसेलला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर पाठवेल अशी आशा प्रेक्षकांना होती. मात्र चौथ्या क्रमांकावर खुद्द कार्तिक येत रसेलची चौफेर फलंदाजी पाहण्यास प्रेक्षकांना वाट पाहावी लागली. तिसऱ्या गड्यासाठी कार्तिक व रॉबिन उथप्पा यांनी दबावात खेळात २६ चेंडूंत केवळ १६ धावा जमवल्या. आणि कदाचित हाच दबाव रसेलवर आला. १३व्या षटकात मुंबईचा सर्वात यशस्वी व अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाने पहिल्यांदा कार्तिकला व पुढच्याच चेंडूवर रसेलला ‘गोल्डन डक’ वर बाद करीत कोलकाताच्या डावाची कंबर मोडली.
रॉबिन उथप्पाने काही काळ संघर्ष करीत ४७ चेंडूंत एक चौकार व तीन षटकार खेचत कश्याबश्या ४० धावा केल्या. नितीश राणा (२६), रिंकू सिंग (४) हेही लवकर माघारी परतल्याने कोलकाता २० षटकांत केवळ १३३ धावाच जमवू शकला. मलिंगाने तीन तर बुमराने दोन गडी बाद करीत मोलाची कामगिरी बजावली. डेथ ओव्हर्समध्ये जिथे इतर संघ १२-१५ च्या सरासरीने धावा जमवतात तिथे कोलकाताने केवळ सातच्या सरासरीने २८ धावा केल्या. त्याही तीन गड्यांच्या मोबदल्यात.
]]>