– स्वातंत्र्यवीर सावरकर(अभिनव भारत सांगता समारंभ भाषण, सिंधू सूक्त)
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
(संकलन:- हर्षल मिलिंद देव, नालासोपारा)
हा महाराष्ट्र सिंधू मुक्त केल्यावाचून राहणार नाही
१९५२ मध्ये अभिनव भारत सांगता समारंभाच्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, जिच्या काठावर आमच्या प्राचीनतम् वेदर्षींनी ऋचांची पहिली सामगायने गायली. जिच्या पुण्यसलिलाही आपल्या संध्यावंदनातील अर्घ्ये दिली आणि जिला अत्यादराने वेदांतील देवतांमध्ये स्थान देऊन तिच्यावर सुंदरातील सुंदर सूक्ते रचली त्या तुला, हे अंबितमे, नदीतमे, देवीतमे, ‘सिंधू, आम्ही कधीही विसरणार नाही. तुझ्या परिसरामध्ये आमच्या प्राचीनतम राजर्षींनी नी ब्रह्मर्षींनी केलेल्या यज्ञांच्या प्रदीप्त हुताशनात जेव्हा हवि समर्पिले तेव्हा अंतराळात उंच उंच दरवळत गेलेल्या त्यांच्या सुगंधानी ललायित होऊनइंद्र, वरुण, मरूतादिक देव त्यांचे त्यांचे हविभार्ग स्वीकारण्यास तुझ्या तीरी येत आणि सोमरसासमवेत तुझं सुमधुर सलिल पिऊन प्रसन्न होत! त्या तुला हे सुरसरिते सिंधू, आम्ही कधीही विसरणार नाही. त्यातही ह्या आमच्या महाराष्ट्रासच तरी पूर्वीपासून तुझी अवीट ओढ लागलेली आहे. पूर्वी एकदा जेव्हा तू आम्हास अशी अंतरली होतीस, तेव्हाही पारतंत्र्याच्या बंदिवासातून तुला मुक्त करण्यासाठी ह्या महाराष्ट्राचे चतुरंग सैन्य उत्तर दिशेवर चढून गेले. कारण दक्षिण दिग्विजय साधला, पण उत्तर दिग्विजय उरला असे हळहळत आमचा शिवाजी राजा मरण पावला होता. त्याची ती अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी नर्मदा ओलांडून बाजीरावाने चंबळ गाठली, पण नुसते चंबळचे पाणी पिऊन काही आमच्या विजयिष्णू घोड्यांची तहान भागलीनाही! म्हणून‘त्या मोगल बादशहाची दाढीच जाळून टाकतो’ असे गर्जत बाजीराव दिल्लीवर चालून गेला. आमचे जयिष्णु घोडे यमुनेचे पाणी प्यायले, गंगेचे पाणी प्यायले. पण त्यांची विजयतृष्णा भागेना. म्हणून ते पुढे घुसले. त्यांनी शतद्रु (सतलज) ओलांडली, वितस्ता (जेहलम) ओलांडली आणि म्लेंच्छांना पादाक्रांत करीत करीत त्यांनी जेव्हा अटकेवर भगवा जिरपटका उभारला आणि तुझे तीर गाठून तुझे पवित्र सलील आकंठ प्रशिले तेव्हाच काय ती त्यांची विजयतृष्णा क्षण भर भागली! त्या तुला इतर कोणीही जरी एक वेळ विसरले, तरी हे स्रोतस्विनी सिंधू, हा आमचा एकटा महाराष्ट्र उठून तुला पुन्हा मुक्त केल्यावाचून राहणार नाही!”