मुंबई इंडियन्सची शंभरी, चेन्नईचा पहिला पराभव

सूर्यकुमार यादव, पांड्या ब्रदर्स व गोलंदाजांच्या जोरावर मुंबईने आपला दुसरा विजय नोंदवला.

मुंबई: एकीकडे तीनपैकी केवळ विजय तर दुसरीकडे तीनपैकी तीन विजय. इंडियन प्रीमियर लीगमधील ‘ईल-क्लासिको’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात यजमान मुंबईने पुन्हा एकदा बाजी मारीत पाहुण्यांचा ३७ धावांनी पराभव करीत सत्रातील आपला दुसरा विजय नोंदवला. शिवाय आयपीएलमधील आपला शंभरावा विजय नोंदवत असा पराक्रम करणारा पहिला संघ ठरला.

चेन्नई सुपर किंग्सच्या महेंद्र सिंग धोनीने नाणेफेक जिंकत रोहितच्या मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवात गडबडीत झाल्यानंतर रोहित व सूर्यकुमार यादव यांनी सामन्याच्या चौथ्या व पाचव्या षटकात ३० धावा कुटत मुंबईकरांच्या चेहऱ्यावर हासू आणले. पहिल्या तीन षटकांत केवळ नऊ धावा व एक गडी गमावलेल्या मुंबईची गाडी रुळावर आली असे वाटत होते. पावरप्लेमध्ये दीपक चाहरला सलामीवीर क्विंटन डीकॉकला (४) बाद करण्यात यश आले.

वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना सामने जास्त वेळेस जिंकले गेले आहेत. हेच लक्षात घेऊन धोनीने कदाचित मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले असावे. परंतु खराब सुरुवात पाहता मुंबई १५०चा आकडाही पार करेल कि नाही असे चित्र दिसत होते. रोहित शर्मा (१३), युवराज सिंग (४) ही अनुभवी फळी स्वस्तात तंबूत परतल्यानंतर मदार आली ती युवा सूर्यकुमार यादव व इतर मधल्या फळीवर. सूर्यकुमारने एका बाजूने खेळपट्टीवर तह ठोकत आपल्या चिवट फलंदाजीचा नमुना पेश केला. त्याने ४३ चेंडूंचा सामना करीत ५९ धावांचा योगदान दिलं.

पहिल्या डावात मुंबईच्या फलंदाजीप्रमाणेच दाद द्यावी लागेल ती चेन्नईच्या गोलंदाजांना. अगदी टिच्चून मारा करीत मुंबईच्या फलंदाजांना एक-एक धाव घेण्यासही अक्षरशः रडवले. दीपक चाहर, रवींद्र जडेजा, इम्रान ताहीर यांनी अचूक टप्पा भेदत मुंबईच्या धावसंख्येवर मधल्या षटकांमध्ये अंकुश आणला. ताहीरने चार षटकांत केवळ २५ धावा देत एक तर जडेजाने दोन षटकांत १० धावा देत एक गडी टिपला. चाहरने आपल्या तीन षटकांत २१ धावा देत एका फलंदाजाला माघारी धाडले.

१८ षटकांच्या समाप्तीनंतर मुंबईच्या धावफलकावर केवळ १२५ धावा होत्या. मग किरॉन पोलार्ड व हार्दिक पांड्या यांनी आपल्या ‘बिग हिट्स’ च्या जोरावर उरलेल्या दोन षटकांत तब्बल ४५ धावा ठोकल्या आणि मुंबईला १७० अश्या समाधानकारक धावसंख्येवर आणले. यात कृणाल पांड्याच्या ४२ धावांचाही मोलाचा वाट होता. हार्दिक ८ चेंडूंत २५ तर पोलार्ड ७ चेंडूंत १७ धावा काढून नाबाद राहिले.

यंदाच्या मोसमातील सलग चौथा सामना जिंकण्यास उत्सुक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सची सुरुवातही अडखळत झाली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपले पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियन जेसन बेरेनड्रॉने आपल्या पहिल्याच षटकात रायडूला भोपळाही न फोडता तंबूत धाडीत मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. त्यात भर कि काय पुढच्याच षटकात मुंबईचा सर्वात अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाने शेन वॉटसन (५) याला पोलार्डकरवी एका अप्रतिम झेलबाद करीत पाहुण्यांची अवस्था दोन बाद सहा अशी केली. पाचव्या षटकात बेरेनड्रॉने सुरेश रैनाला बाद करीत चेन्नईच्या डावाला खिंडार पाडण्यास सुरुवात केली. यावेळचा झेल मात्र पोलार्डने अफलातून पकडीत वानखेडेवरील सर्व प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील सर्वात यशस्वी व अनुभवी संघ म्हणून गणल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सकडे मधल्या फळीत हुकुमी एक्के होते. शिवाय सुरुवात ठेपळल्यानंतरही संघाला कसे सावरायचे हे या खेळाडूंना अगदी चांगलेच माहित आहे. किंबहुना त्याच्याचसाठी हा संघ ओळखला जातो. परंतु आज मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी चित्र पालटले. आघाडीचे तीन खेळाडू स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार धोनीने केदार जाधवसह मोर्चा आपल्या हाती घेतला. दोघांनी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकीय भागीदारी रचित डावाला सावरले.

जोडी जमली असे दिसत असताना हार्दिक पांड्याने धोनीला (१२) बाद करीत मुंबईच्या विजयाचा पाया रोवला. लगेचच रवींद्र जडेजालाही (१) करीत सुपर किंग्सचा निम्मा संघ तंबूत धाडला. जाधवने एकीकडे डाव सांभाळत अर्धशतक झळकावले. त्याने ५४ चेंडूंचा सामना करीत आठ चौकार व एका षटकारासह ५८ धावा केल्या. मलिंगाने १८व्या षटकात जाधव व ड्वेन ब्रावो (८) बाद करीत मुंबईचा विजय निश्चित केला.

अखेरीस चेन्नई सुपर किंग्स आपल्या २० षटकांत आठ षटकांच्या मोबदल्यात १३३ धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सने सामना ३७ धावांनी जिंकत आयपीएलमधला आपला शंभरावा विजय साजरा केला. यंदाच्या सत्रातील चेन्नईचा हा पहिला पराभव ठरला.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *