मोहाली: स्मिथ, वॉर्नर यांच्या बंदीमुळे कमकुवत पडलेली ऑस्ट्रेलिया आणि त्यात भर म्हणजे, मिचेल स्टार्क, जेस हेझलवूड यांना दिलेली विश्रांती. अश्या अवस्थेतही ‘नवाख्या’ ऑस्ट्रेलियाने विराट कोहलीच्या दादा संघाला चारीमुंड्या चिट करीत येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताला चार गडी व १३ चेंडू राखत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील धावांचा पाठलाग करताना आपला सर्वात मोठा विजय संपादित केला. शिवाय, अष्टोन टर्नरच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला नवा ‘मॅच-फिनिशर’ मिळाला.
जखमी मार्कस स्टोयनीसच्या जागी वर्णी लागलेला टर्नरने आपण का ‘टर्नर’ आहोत हे दाखवून दिले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात चांगली गोलंदाजी मानल्या जाणाऱ्या भारतीय गोलंदाजीची चांगलीच पिसे काढत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं. भारतीयांनी दिलेल्या ३५९ धावांचा पाठलाग जिथे अशक्य दिसत होता तो ऑस्ट्रेलियाने चार गादी व तब्बल १३ चेंडू राखत आरामात पार केला. कर्णधार ऍरॉन फिंच (०) व शॉन मार्श (६) हे लवकर बाद झाल्यानंतर उस्मान ख्वाजा (९१) व पीटर हॅंड्सकोम्ब (११७) यांनी तिसऱ्या गड्यासाठी १९२ धावांची भागीदारी रचित पाहुण्यांच्या विजयाचा पाय रोवला. हंसकोम्बने १०५ चेंडूंचा सामना करीत ८ चौकार व ३ षटकार खेचत एकदिवसीय क्रिकेटमधले आपले पहिले शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाला १०च्या सरासरीने धावसंख्या पाहिजे असताना आपला दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या टर्नरने भारताच्या सर्वच गोलंदाजांचा पुरेपूर समाचार घेत केवळ ४३ चेंडूंत चार चौकार व अर्धा डझन षटकार खेचत नाबाद ८४ धावा केल्या.
उत्तर भारतात दवामुळे दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करणे काहीसे मुश्किल होऊन जाते. असे असतानाही विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील काही सामन्यांपासून सलामीची चिंता सतावणाऱ्या सलामीवीरांनी आज मात्र आपली सारी भडास ऑस्ट्रलियाच्या गोलंदाजांवर काढली. रोहित शर्मा (९५) व शिखर धवन (१४३) यांनी पहिल्या गड्यासाठी १९३ धावांची मजबूत भागीदारी केल्यानंतर भारत ३८० धावा सहज करेल असे वाटत होते. मात्र, पॅट कमिन्सच्या चलाख गोलंदाजीसमोर भारताच्या मधल्या फळीने लोटांगण घातले आणि भारताला ३५८ धावांवर समाधान मानावे लागले. कमिन्सने आपल्या १० षटकांत ७० धावा देत सर्वाधिक पाच गडी बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या केएल राहुलने २६, रिषभ पंत (३६), विजय शंकर (२६), केदार जाधव (१०) या मधल्या फळीच्या सुमार कामगिरीमुळे भारत पाहिजे तितक्या धावसंख्येवर मजल मारू शकला नाही. कदाचित याचाच फायदा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला झाला असावा.
]]>