नागपूर: विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून पाहिल्या जात असलेल्या या मालिकेत भारताने आज पुन्हा एकदा आपला सर्वोत्तम खेळाचा नजराना पेश करीत पाहुण्या ऑस्ट्रेलियाला आठ गड्यांनी पराभूत करत पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. सामन्याचे हिरो ठरले ते कप्तान किंग कोहली व भारताचे गोलंदाज.
नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मागील काही सामन्यांपासून बॅट थंडावलेल्या रोहित शर्माला पॅट कमिन्सनं पहिल्याच षटकात शून्यावर माघारी धाडलं. नवव्या षटकात आउट-ऑफ-फॉर्म शिखर धवनलाही ग्लेन मॅक्सवेलने तंबूत परतावत भारताची अवस्था दोन बाद ३८ अशी केली.
भारतासाठी मग धाऊन आला तो कप्तान कोहली. ’रन-मशीन’ कोहलीने रायडू (१८) बाद झाल्यानंतर विजय शंकरच्या साथीने डावाची सूत्रे आपल्या हाथी घेतली. दुर्दैवी शंकर कोहलीच्या एका स्ट्रेट ड्राइव्हवर बाद झाला आणि एका चांगल्या खेळीचा अंत झाला. पण कोहलीने एका बाजूने आपला संयमी खेळ चालू ठेवत एकदिवसीय क्रिकेटमधले ४०वे शतक झळकावले. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारताने नागपूरच्या संथ खेळपट्टीवर २५० धावांचा पल्ला गाठला. ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सने रोहित, कोहलीसह भारताच्या चार गड्यांना तंबूत धाडीत सर्वाधिक बळी घेतले.
भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फिंच व उस्मान ख्वाजा यांनी संघाला जिंकून देण्याचा जणू विडाच उचलला होता. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८७ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी रचल्यानंतर ऑस्ट्रेलिया सामना सहजरीत्या जिंकेल असेच वाटत होते. कुलदीप यादवने फिंचला (३७) व केदार जाधवने ख्वाजाला (३८) वर पटापट बाद करीत भारताला पुन्हा सामन्यात आणले. जडेजाने शॉन मार्शला (१६) बाद करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. लगेचच कुलदीप यादवने मॅक्सवेलचा (४) त्रिफळा उडवीत पाहुण्यांची अवस्था २९व्या षटकात चार बाद १३२ अशी केली. पाचव्या गड्यासाठी हँड्सक्ब व मार्क स्टोयनीस यांनी ४९ धावांची भागीदारी केल्याने सामन्यात पुन्हा एकदा चुरस वाढली. जडेजाने हँड्सक्बला आपल्या जादुई फेकीने धावबाद करीत निम्मा ऑस्ट्रेलियाचा संघ तंबूत परतला.
भारताने डेथ ओव्हर्समध्ये टिच्चून गोलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाला सोपा वाटणारा विजय त्यांच्या हातातोंडातून काढला. ४८व्या षटकात जसप्रीत बुमराने केवळ एक धाव देत पाहुण्यांना चांगलेच रडवले. शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी ११ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाच्या सेट फलंदाज स्टोयनीसला सामना करायचा होता तो नवख्या विजय शंकरचा. शंकरने पहिल्याच चेंडूवर स्टोयनीसला पायचीत पकडत भारताचा विजय निश्चित केला. तिसऱ्या चेंडूवर ऍडम झम्पाला त्रिफळाचित करीत भारताने सामना आठ धावांनी जिंकला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे.
नागपूरही जिंकलं! विराट, गोलंदाजांच्या कामगिरीने भारताची मालिकेत आघाडी
किंग कोहलीचं शतक व गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हातातोंडाशी आलेला सामना गमवावा लागला.