भारतीय महिलांची उत्तुंग भरारी, इंग्लंडला नमवित जिंकली मालिका

मुंबई: फॉर्मात असलेल्या भारतीय महिलांनी पुन्हा एकदा दणका दाखवीत इंग्लंडच्या महिलांना सात विकेट्सनी पराभूत करीत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी मिळवली आहे. येथील वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आपली जादू दाखवीत इंग्लंडच्या महिलांना केवळ १६१ धावांत गारद केले. इंग्लंडतर्फे नटालिया स्किवर (८५) हिने एकहाती किल्ला लढविला. तिला टॅमी बीमाउंट  (२०) व लॉरेन विनफिल्ड (२८) यांचा अपवाद वगळता एकही खेळाडूची योग्य साथ मिळाली नाही. भारतासाठी झुलन गोस्वामी (३० धावांत ४) व शिखा पांडे (१८ धावांत ४) या सलामीच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोखपणे निभावली. त्यांना पूनम यादव (२८ धावांत २) हिने उत्तम प्रकारे साथ दिली. १६२ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारताला पहिलाच धक्का बसला. मुंबईकर हेमा जेमायमा रॉड्रिग्स हिला भोपळाही फोडता आला नाही. दुसऱ्याच षटकात १० चेंडूंचा सामना करताना तिला अन्या श्रुबसोल हिने बाद केले. पण भारतासाठी वेळोवेळी धावून येणाऱ्या स्मृती मानधना हिची बॅट आज पुन्हा एकदा तळपली. तिने आपला जबरदस्त फॉर्म चालू ठेवत बाद होण्यापूर्वी ७४ चेंडूंत सात चौकार व एका षटकारासह ६३ धावा ठोकल्या. कर्णधार मिताली राजने नाबाद ४७ धावंच योगदान दिलं. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पूनम राऊतनेही ३२ धावांची खेळी केली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यातही भारतीय महिलांनी इंग्लंडचा डाव ४१ षटकात अवघ्या १३६ धावांत गुंडाळून, ६६ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारताने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी येथेच होणार असून त्यानंतर लगेच उभय संघांत तीन टी-२० सामान्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *