ओगबेचे याच्या गोलमुळे नॉर्थईस्टची चेन्नईयीनवर मात

गुवाहाटी: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने गतविजेत्या चेन्नईयीन एफसीवर एकमेव गोलने मात केली. येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर नायजेरियाचा स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याने तीन मिनीटे बाकी असताना केलेला गोल निर्णायक ठरला.
प्ले-ऑफच्या शर्यतीत नॉर्थईस्टने या विजयासह महत्त्वाचा निकाल नोंदविला. गुणतक्त्यात तळात असलेल्या चेन्नईयीनच्या फॉर्म हरपलेल्या संघाविरुद्ध नॉर्थईस्टला अनेक चाली रचूनही निराश व्हावे लागले होते. ओगबेचे आणि फेडेरीको गॅलेग यांचे अनेक प्रयत्न वाया गेले होते. अखेरीस ओगबेचे यानेच गोल केला.
नॉर्थईस्टने १३ सामन्यांत सहावा विजय मिळविला असून पाच बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे २३ गुण झाले. त्यांनी एफसी गोवा संघाला (११ सामन्यांतून २०) मागे टाकत तिसरे स्थान मिळविले. बेंगळुरू एफसी ११ सामन्यांतून २७ गुणांसह आघाडीवर आहे, तर मुंबई सिटी एफसी १२ सामन्यांतून २४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईयीनला १३ सामन्यांत दहावा पराभव पत्करावा लागला. एकमेव विजय व दोन बरोबरींसह हा संघ पाच गुण मिळवून शेवटच्या दहाव्या स्थानावर आहे.
दोन्ही संघांना स्थिरावण्यास वेळ लागला. चेंडूवर ताबा ठेवत प्रामुख्याने बचाव क्षेत्रात राहण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सहाव्याच मिनिटाला चेन्नईयीनच्या अँड्रीया ओरलँडी याला यलो कार्ड दाखविण्यात आले. त्याने नॉर्थईस्टचा मध्यरक्षक रेडीम ट्लांग याला पाडले. ओरलँडी हा सुद्धा मध्यरक्षक असून त्याला यंदा प्रथमच अशा कारवाईला सामोरे जावे लागले. १२व्या मिनिटाला नॉर्थईस्टच्या मिस्लाव कोमोर्स्की याच्यावर यलो कार्डची कारवाई झाली. त्याने चेन्नईयीनच्या सी. के. विनीतला पाडले.
पहिली चांगली चाल १६व्या मिनिटाला चेन्नईयीनकडून रचली गेली. उजवीकडून बॉक्समध्ये क्रॉस पास देण्यात आला. त्यानंतर चुरस होऊन चेंडू ओरलँडीपाशी गेला, पण तो पुरेशी चपळाई दाखवू शकला नाही. त्यामुळे त्याने मारलेला चेंडू हवेतून स्टँडमध्ये गेला.
नॉर्थईस्टचा हुकमी स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याला २२व्या मिनिटाला बॉक्सच्या डावीकडे बॉक्सबाहेर चेंडू मिळाला. त्याने थेट फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेन्नईयीनचा मध्यरक्षक एली साबिया याने ब्लॉकिंग केले.
नॉर्थईस्टकडून २४व्या मिनिटाला सुवर्णसंधी हुकली. शॉर्ट कॉर्नरवर लाल्थाथांगा खॉल्हरिंग याने गॅलेगोला उत्तम पास दिला, पण फिनिशिंगअभावी ही संधी हुकली. क्रॉसबारला लागून चेंडू कॉर्नरसाठी बाहेर गेला. त्यानंतर नॉर्थईस्टने तीन मिनिटांनी आणखी एक चाल रचली. लाल्थाथांगा याने उजवीकडून त्या बाजूच्या पोस्टपाशी चेंडू हवेतून मारला, पण रॉलीन बोर्जेस हेडिंग करू शकला नाही. तेव्हा त्याला फार चांगली संधी होती.
३२व्या मिनिटाला चुरस वाढली. आधी लाल्थाथांगा याने उजवीकडून बॉक्समध्ये चेंडू मारला, पण चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग याने पुढे सरसावत चपळाईने बचाव केला. नॉर्थईस्टने आणखी एक प्रयत्न लगेच केला. डावीकडून ओगबेचेला चेंडू मिळाला, पण तो संधी साधू शकला नाही. 36व्या मिनिटाला ओगबेचेला दिर्घ पास मिळाला. त्याने बोर्जेसला बॉक्समध्ये पास दिला. मग चेंडू रेडीमकडे गेला, पण त्याने डाव्या पायाने मारलेला चेंडू गोलपोस्टवरून बाहेर गेला.
पुर्वार्ध संपण्यास एक मिनिट बाकी असताना बोर्जेसने घोडदौड करीत रचलेल्या चालीसही फिनिशिंगची जोड मिळू शकली नाही.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *