भारताचा कांगारूंवर 'विराट' विजय, महेंद्रसिंग धोनी ठरला मॅच-फिनिशर

सिडनी एकदिवसीय सामन्यातील निसटत्या पराभवानंतर विराट कोहलीच्या भारतीय संघाने येथील मालिकेतील दुसऱ्या सामन्यात चांगलंच पुनरागमन करीत यजमानांना सहा गडी व चार चेंडू राखत पराभूत केलं. कोहलीची कप्तानी खेळी व महेंद्रसिंग धोनीचा गवसलेला सूर यांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाच्या २९९ धावांचा पाठलाग शेवटच्या षटकात पार केला. कोहलीने एकदिवसीय सामन्यातील आपले ३९वे शतक झळकावले तर धोनीने बऱ्याच दिवसांनी एक अर्धशतकीय खेळी करीत प्रेक्षकांची माने जिंकली.
नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने पुन्हा एकदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाजांनी आघाडीची फळी स्वस्तात तंबूत धाडल्यानंतर मदार आली ती मधल्या फळीवर. शॉन मार्शने आपला अनुभव पुरेपूर पणाला लावत दमदार शतक झळकावलं. चालू असलेल्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाकडून हे पहिलेच शतक ठरलं. तसेच मागील दहा सामन्यांत त्याचे हे तब्बल चौथे शतक ठरले. त्याच्या जोडीला ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नऊ बाद २९८ धावा उभारल्या. भारताकडून मोहम्मद शमीने चार तर भुवनेश्वर कुमारने तीन गडी बाद केले.
प्रतिउत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करीत आपण सहाच्या सरासरीने पाहिजे असलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यास सक्षम आहोत हे दाखवून दिले. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या शिखर धवनने २८ चेंडूंत पाच चौकारांसह ३२ धावा केल्या तर रोहित शर्माने ५२ चेंडूंत दोन चौकार व तितकेच षटकार खेचत ४३ धावांचं योगदान दिलं.
खरी कमल केली ती भारताच्या आजी-माजी कर्णधारांनाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये किंग असलेल्या कोहलीने पहिल्या सामन्यातील अपयशाला मागे झटकत आणखी एक शतक लगावलं. त्याने ११२ चेंडूंचा सामना करीत पाच चौकार व दोन षटकारांसह १०४ धावा केल्या. त्याला उत्तम साथ दिली ती महेंद्र सिंग धोनीने. पहिल्या सामन्यात ९६ चेंडूंत ५१ धावा करत टीकाकारांचे लक्ष्य झालेला धोनी आज वेगळ्याच मूडमध्ये होता. सुरुवातीला सावध पवित्रा घेतल्यानंतर कोहलीच्या तंबूत परतल्यानंतर धोनीने आपली स्टाईल दाखवली. ५४ चेंडूंत दोन षटकारांसह नाबाद ५५ धावा करीत धोनीने भारतासाठी कामगिरी फत्ते केली. धोनी स्टाईलने शेवटच्या षटकात षटकार खेचत धोनीने प्रेक्षकांना जुन्या धोनीची आठवण करून दिली.
कोहलीची मकर संक्रात ठरतेय लकी
भारताचा कर्णधार विराट कोहली मकर संक्रांत म्हणजेच १५ जानेवारीला शतक ठोकतोयच. २०१७, २०१८ व आता २०१९ ला कोहलीने सलग तीन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *