सिडनी: अमीर खानच्या लगान चित्रपटातील एक डायलॉग आठवला. जेव्हा ब्रिटिश भारत सोडून जातात तेव्हा एक फेमस डायलॉग म्हटलं गेलं होतं, “उम्मीद नहीं थी की ये दिन देख पाऊंगा”. खरंच ७ जानेवारी २०१९ हा दिवस केवळ भारतीय क्रिकेट रसिकांच्याच नव्हे तर संपूर्ण भारतवासीयांसाठी एक सणापेक्षा कमी नाही. गेली ७१ वर्षांपासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा आपण सर्व करत होतो ती आज पूर्ण झाली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली आहे. खरंच अजूनही यावर विश्वास बसत नाही.
जेव्हा भारतीय संघाने २०१४-१५ साली ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळली होती तेव्हा महेंद्र सिंग धोनीच्या अनुपस्थितीत कोहलीने कप्तानी सांभाळली होती. आताचे भारताचे कोच शास्त्री तेव्हाचे संघाचे व्यवस्थापक होते. ऑस्ट्रेलियात पॉल टाकण्यापूर्वी त्यांनी जिंकण्याचा आत्मविश्वास प्रकट केला होता. त्यावेळस त्यांनी ते शक्य झालं नाही. त्यांच्यावर टीकाही झाली. पण या वेळेस मात्र कोहली-शास्त्री जोडीने अचूक रणनीती रचित जे केलं ते नक्कीच प्रशंसनीय आहे.
आता या मालिकेकडे वळतो.
स्टीव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थित जरी ऑस्ट्रेलिया संघ कमजोर असला तरी कोणत्याही पाहुण्या संघाला यजमानांना तोडीस तोड उत्तर देणं तेही कसोटो क्रिकेटमध्ये नेहमीच आव्हानात्मक ठरलंय. इतिहासही तसाच सांगतोय. पण कोहलीने टीम पेनच्या संघाला स्वस्तात न घेता आपला सर्वोत्तम खेळ दाखवीत चार सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. पहिल्या कसोटीतील अटीतटीचा विजय, दुसऱ्या कसोटीला निसटता पराभव आणि तिसऱ्या कसोटीत मिळवलेला सोपा विजय – मालिका भारताने इथेच जिंकली होती. जरी चौथी कसोटी भारत हरला असता तरी ट्रॉफी भारताकडे राहिली असती. पण कोहलीने याही कसोटीत आपला सर्वोत्तम संघ उतरवला आणि यजमानांना चांगलेच धारेवर धरले. पहिल्या डावात ६२२ धावांचा विशाल डोंगर रचून दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाची हवा काढली. मग भारताच्या एक्स-फॅक्टर कुलदीप यादवने, जो या मालीकेतील आपला पहिलाच सामना खेळत होता, त्याने पाच खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवीत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. पण वरून राजाच्या कृपेने ऑस्ट्रेलियाला हा सामना अनिर्णित राखण्यात यश आलं.
संपूर्ण मालिकेचा विचार केला तर या मालिकेत कोहलीच्या बरोबरीने इतर फलंदाजांनीही आपली कामगिरी चोख बजावली. मागील दोन परदेशी दौऱ्यांत (दक्षिण आफ्रिका व इंग्लंड) कोहली वगळता एकही भारतीय फलंदाजाला धावा काढता आल्या नाही. पण इथे मात्र चेतेश्वर पुजाराने एक-दोन नव्हे तर तब्बल तीन शतके ठोकत ५२१ धावा कुठल्या. तुवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनेही ३५० धावा केल्या. गोलंदाजीचा विचार केला तर भारताने ऑस्ट्रेलियाच्या पूर्ण झालेल्या सातही डावांत ऑल आउट करण्यात यश प्राप्त केले. दक्ष आफ्रिका व इंग्लंड दौऱ्यात जी कामगिरी गोलंदाजांनी केली होती ती इथेही त्यांनी फत्ते केली. जसप्रीत बुमरा (२१ विकेट), मोहम्मद शमी (१६ विकेट), इशांत शर्मा (११ विकेट ३ सामन्यांत) या तिकडीने चांगलीच कामगिरी केली. शिवाय मयांक अगरवालच्या रूपाने भारताला एक नवा सलामी फलंदाजही मिळाला ज्याने खेळलेल्या दोन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावली.
थोडक्यात, भारताने आपला अष्टपैलू खेळ दाखवीत हा पराक्रम फत्ते केला. जर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही असाच खेळ खेळू शकला तर तिथेही कसोटी मालिका जिंकताना पाहायला फार वेळ लागणार नाही.
]]>