मुंबई सिटीविरुद्ध ब्लास्टर्सची दारूण हार

मुंबई: मुंबई सिटी एफसीने हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमातील धडाका कायम राखत रविवारी घरच्या मैदानावर केरळा ब्लास्टर्सवर 6-1 असा दणदणीत विजय संपादन केला. सेनेगलच्या मोडोऊ सौगौ याच्या हॅट््ट्रीकसह चार गोलांनी मुंबई फुटबॉल एरीना दणाणून सोडले. रफाएल बॅस्तोस व मॅटीयस मीराबाजे यांनीही प्रत्येकी एक गोल केला.

मुंबईने दारुण हार पत्करण्यास भाग पाडल्यामुळे ब्लास्टर्सच्या प्ले-ऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. ब्लास्टर्सच्या झकीर मुंडाम्पारा याला दोन यलो कार्डमुळे पुर्वार्धातच मैदान सोडावे लागले. यामुळे हा निकाल त्यांच्यासाठी आणखी धक्कादायक ठरला

लिगला भारताच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ब्रेक मिळण्यापूर्वी हा अखेरचा सामना होता. नववर्षात पुढील टप्पा सुरु होईल तेव्हा ब्लास्टर्सच्या आशा संपुष्टात आलेल्या असतील. मुंबई सिटीने 12 सामन्यांत सातवा विजय मिळविला असून तीन बरोबरी व दोन पराभव अशा कामगरीसह त्यांचे 24 गुण झाले. त्यांचे दुसरे स्थान आणखी थोडे भक्कम झाले.

बेंगळुरू एफसी 11 सामन्यांतून 27 गुणांसह आघाडीवर आहे. एफसी गोवा 11 सामन्यांतून 20, तर नॉर्थइस्ट युनायटेड एफसी 12 सामन्यांतून 20 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. गोव्याचा गोलफरक तब्बल 10 (27-17), तर नॉर्थइस्टचा केवळ 2 (16-14) आहे. ब्लास्टर्सला 12 सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला असून एक विजय व सहा बरोबरींसह त्यांचे नऊ गुण व आठवा क्रमांक कायम राहिला.

35व्या मिनिटाला झकीरला अरनॉल्ड इसोकोने सहज चकविले. त्यामुळे संतापलेल्या झकीरने इसोकोला मागून टाचेवर धक्का देत रोखले. त्यामुळे पंच उमेश बोरा यांनी झकीरला यलो कार्ड दाखविले. मग पुर्वार्धातील अखेरच्या मिनिटाला झकीरने बॅस्तोसला पाडले. त्यामुळे त्याला दुसऱ्या यलो कार्डला सामोरे जावे लागले. याचे रेड कार्डमध्ये रुपांतर होऊन झकीरला मैदान सोडावे लागले.

वास्तविक ब्लास्टर्सचीच नव्हे तर मुंबईचीही सुरवात डळमळीत झाली होती. चेंडूवर मुंबईचे जास्त वर्चस्व होते, पण त्यांना अर्थपूर्ण चाल रचता येत नव्हती. 11व्या मिनिटाला पाऊलो मॅचादो याने पहिला प्रयत्न लांबून केला, पण चेंडू ब्लॉक होऊन रेनीयर फर्नांडीस याच्या दिशेने गेला. त्याने मारलेला फटका क्रॉसबारवरून गेला.

मोडोऊने पुढच्याच मिनिटाला पहिला गोल केला. प्रतीआक्रमणावर चाल रचत रफाएल बॅस्तोसने डावीकडे मॅचादोला पास दिला. त्यातून चेंडू बॉक्समध्ये मोडोऊकडे गेला. त्याने उजव्या पायाने अप्रतिम फटका मारत ब्लास्टर्सचा गोलरक्षक धीरज सिंगला चकविले.

मोडोऊचा आणि मुंबईचा दुसरा गोल ब्लास्टर्सच्या ढिसाळ खेळामुळे झाला.यास धीरज कारणीभूत ठरला. त्याचा पास अंदाज चुकून रेनीयरकडे गेला. रेनीयरने मैदानावर घसरत चेंडू मोडोऊकडे घालविला. मग मोडोऊने सुंदर फटका मारत नेटच्या उजव्या भागात वरील बाजूला चेंडू घालवित लक्ष्य साधले.

चार मिनिटांनी मुंबईची संधी थोडक्यात हुकली. मॅचादोने ब्लास्टर्सच्या क्षेत्रात चेंडू वरून मारला. ही चाल हेरत अरनॉल्ड इसोको याने धाव घेतली. धीरज जागचा हलल्यामुळे त्याने त्याच्या डोक्यावरून चेंडू मारायचा प्रयत्न केला, पण चेंडू थोडक्यात बाजूने बाहेर गेला.

ब्लास्टर्सचा पहिला प्रयत्न 22व्या मिनिटाला झाला. लालरुथ्थाराने डावीकडून आगेकूच करीत नेटसमोर मैदानालगक फटका मारला. हा चेंडू पलिकडील बाजूस येताच हालीचरण नर्झारीने नियंत्रण मिळवित फटका मारला, पण मुंबईचा बचावपटू शुभाशिष बोस याने चेंडू ब्लॉक केला.

पाच मिनिटांनी ब्लास्टर्सने खाते उघडले. मध्यरक्षक साहल अब्दुल समदने आगेकूच करीत मुंबईच्या पेनल्टी क्षेत्रात प्रवेश केला. त्याला मुंबईच्या ल्युचीयन गोऐन याने रोखले, त्यातून चेंडू मुंबईच्या सौविक चक्रवर्तीला लागून डुंगलच्या दिशेने गेला. डुंगलने संतुलन साधत बॉक्सच्या उजव्या बाजूला प्रयत्नपूर्वक अचूक फटका मारला. त्यावेळी मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंग झेप टाकूनही चेंडू अडवू शकला नाही.

तीन मिनिटांनी मुंबईचा तिसरा गोल मोडोऊ यानेच केला. डावीकडून शुभाशिषने त्याला अचूक पास दिला. मग मोडोऊने हेडिंगवर अचूक फटका मारला. त्यावेळी झेप घेऊनही धीरज चेंडू अडवू शकला नाही.

उत्तरार्धात 70व्या मिनिटाला बॅस्तोसने सनसनाटी गोल केला. इसोकोला उजवीकडून आगेकूच करताना लालरुथ्थाराने फाऊल केले, पण त्याचवेळी चेंडूवर लक्ष ठेवत बॅस्तोसने संधी साधली. त्याने नियंत्रण मिळवित परिस्थितीचा अंदाज घेतला आणि बॉक्सबाहेरून नेटच्या डाव्या कोपऱ्यात फटका मारत धीरजला चकविले.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *