इंडियन सुपर लीगच्या पाचव्या सत्रात मुंबई सिटी एफसीने आपल्या मागील सहा सामन्यांत तब्बल पाच विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. मुंबई: जवळपास साडेतीन हजार प्रेक्षक, मागच्या सामन्यात दिल्लीला ०-२ अश्या पिछाडीवरून ४-२ असा विजय, या सामान्याआधी पाचपैकी चार विजय. अश्या भलत्याच फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई सिटी एफसीने आणखी एक दमदार विजय साजरा करीत दोन वेळेचा इंडियन सुपर लीग (आयएसएल) विजेत्या चेन्नयांन एफसीला २-० ने पराभूत करीत आपली विजयाची मालिका राखत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली. रेनियर फर्नांडिस (२७’) व मोदू सौगू (५५) यांनी लागलेल्या गोळीच्या जोरावर मुंबईने हा विजय संपादित केला. दोन वेळच्या विजेत्या चेन्नयान एफसीचा मुकाबला भलत्याच फॉर्मात असलेल्या मुंबई सिटी एफसीबरोबर होता. प्रेक्षकांनी पाठ फिरवलेल्या अंधेरी क्रीडा संकुलातील मुंबई फुटबॉल अरेनावर घराच्या मैदानावर प्रदर्शन करणे मुंबईसाठी जिकरीचे होऊन बसले होते. कारण घराच्या मैदानावर म्हणावी तशी कामगिरी न झाल्यामुळे, शिवाय मागच्या सामन्यात एटीके विरुद्ध सुमार कामगिरी झाल्यामुळे आजच्या सामन्यात चांगला खेळ करणे त्यांच्यासाठी आवश्यक होते. दोन्ही संघ आज विजयासाठी उत्सुक दिसत होते. अंकतालिकेचा विचार केला तर मुंबई चौथ्या तर चेन्नई आठव्या स्थानी होती. विजयासह या टेबलमध्ये मोठे बदल होणार होते. त्या अनुषंगाने दोन्ही संघानी सुरुवातीस काहीसा नरम पवित्रा आजमावत पहिल्या हाफच्या उत्तरार्धात आपली चपळाई दाखवण्यास सुरुवात केली. मुंबई सिटी एफसीला सहाव्या मिनिटाला एक कॉर्नर भेटला खरा पण पॉलो मचाडोच्या पासवर लुसियन गोयनने किक केलेला चेंडू गोलपोस्टच्या खूपच वर गेला. गोलसाठी आतुर झालेल्या दोन्ही संघाच्या खेळाडूंची आक्रमकता आता आणखीच वाढत गेली. त्यांच्यासाठी विजय मिळवण्यासाठी पहिल्या हाफमध्ये गोल करून आघाडी घेणे अत्यंत आवश्यक होते. आणि त्याच प्रयत्नात चेन्नईच्या खेळाडूंनी मुंबईच्या चुकांचा फायदा घेत हल्ला चढवला. पण इकडे आपल्या सक्षम बचावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईने प्रतिस्पर्ध्यांना एकही संधी दिली नाही. उलट त्यांच्यावरच प्रतिहल्ला चढवत दवाब टाकला. परिणामी, २७व्या मिनिटाला मुंबईच्या रॅनियर फर्नांडिसने राफेल बस्टोसच्या पासवर अचूक संधी साधत यजमानांना पहिला गोल करून दिला आणि एकच जल्लोष झाला. उपस्थित मोजक्याच प्रेक्षकांनी मुंबईच्या या आघाडीचा भरपूर आनंद घेत घराच्या टीमला आणखी प्रोत्साहित केले. ४५ मिनिटांच्या वेळेनंतर मिळालेल्या दोन मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत, मुंबईच्या लुसियान गोयनने गोलसाठी पुरेपूर प्रयत्न केला. त्याने लागलेली एक किक गोलपोस्टच्या वरच्या खांबाला जाऊन लागली. अन्यथा मुंबईला आणखी गोल मिळाला असता. आकडेवारीचा विचार केला तर, मुंबई व चेन्नई या दोन्ही संघानी चेंडूवर ताबा मिळवण्यास अगदी बरोबरी साधली. गोल करण्याच्या प्रयत्नातही दोन्ही संघ जवळपास बरोबरीतच होते. पण मुंबईने त्यातली एक संधीचे सोने करीत आघाडी घेतली. पूर्वार्धाअखेरीस, मुंबई सिटी एफसी १-० अशी आघाडी घेत सामन्यात वरचढ होती. मुंबईसाठी या विजयाबरोबर दुसऱ्या स्थानी झेप घेणे खूपच सोपे होणार होते. आणि नेमकी हीच गोष्ट त्यांनी लक्षात ठेवत चेन्नईच्या खेळाडूंना सामन्यात डोकं वर काढू दिलं नाही. पहिल्या हाफच्या आघाडीला आणखी कशी वाढवता येईल याचा विचार बहुदा त्यांनी मधल्या वेळेत केला असावा. चेन्नईसाठी उत्तरार्धात एक संधीही आली होती. ५२व्या मिनिटाला आयझॅक व राफेल ऑगस्टो यांच्या चपळाईने आयती संधी चेन्नईला भेटली खरी पण गोलपोस्टच्या खूपच बाहेरून चेंडू पास झाला आणि चेन्नईच्या खेळाडूंबरोबरच चाहत्यांचीही निराशा झाली. मुंबईने मात्र आपली संधी अचूक साधत ५५व्या मिनिटाला मोदू सौगूने गोल करीत यजमानांना २-० अशी अभेद्य आघाडी मिळवून दिली. चेन्नईच्या बचाव फळीला अगदी तरबेजपणे भेदत मोदूने हा गोल केला आणि उपस्थित प्रेक्षकांनी एकाच ताल धरला. सामन्याच्या उत्तरार्धात चेन्नईने आपले आक्रमण अधिकच मजबूत केले. पण मुंबईनेही तितक्याच कडाडीने जबाब देत हे आक्रमण भेदून काढले. मुंबईने आपली आघाडी कायम राखण्यावर भर दिला तर दुसरीकडे चेन्नईने गोल करून सामन्यात परत कसे येत येईल यावर भर दिला. दुसऱ्या हाफमध्ये मुंबईने तब्बल चार बदल करीत प्रतिस्पर्ध्यांवर याही प्रकारे दबाव टाकला. ९०व्या मिनिटाला चेन्नईसाठी एक गोल झालाही पण पंचांनी ऑफसाईड देत तो गोल फेटाळला. आज खेळाबरोबरच चेन्नईचं नशीबही त्यांना साथ देत नव्हतं. मुंबईने २-० अशी आघाडी शेवटची शिट्टी वाजेपर्यंत कायम राखत इंडियन सुपर लीगच्या पाचव्या सत्रात दहापैकी सहा सामन्यांत विजय मिळवला. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी यातले पाच विजय मागील सहा सामन्यांत मिळवले आहेत.]]>