मेरी कोमचा 'गोल्डन' पंच

विश्व अजिंक्यपद बॉक्सिंगचे सहाव्यांदा विक्रमी जेतेपद जिंकत भारताच्या मेरी कोमने रचला नवा विश्वविक्रम नवी दिल्ली: २००१ सालापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली झोप सोडणाऱ्या मेरी कोमने येथे झालेल्या महिलांच्या दहाव्या विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदाला गवसणी घालत जागतिक स्तरावर नव्या विक्रमाची नोंद केली. लंडन २०१२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या मेरी कोमने आपल्या तोऱ्यात आणखी एक शिरपेच रोवला. युक्रेनच्या हाना ओखटा हिला ५-० अश्या एकतर्फी मुकाबल्यात पराभूत करीत मेरीने हि कामगिरी केली. वय वर्ष ३५ असलेल्या मेरी कोमने याआधी हि स्पर्धा पाहिलांदा २००२ साली म्हणजेच १६ वर्षांपूर्वी जिंकली होती. त्यानंतर २००५, २००६, २००८, २०१० व या वर्षी म्हणजेच २०१८ साली हि स्पर्धा जिंकून तब्बल आठ वेळेस हा खिताब जिंकण्याचा पराक्रम केला. मूळची मणिपूरची रहिवाशी असलेली मेरी कोम सध्या तीन बालकांची आईही आहे हे विशेष. २०१६ साली राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झालेल्या मेरी कोमने आतापर्यंत भारतासाठी बऱ्याच स्पर्धांत जेतेपद मिळवून दिले आहे. यात २०१२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विशेष आहे. मेरीच्या अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी युक्रेनची २२ वर्षीय हाना ओखटा हिने सुरुवातीला मेरीवर आक्रमण करीत तगडी स्पर्धा देण्याचे संकेत दिले. पण अनुभवाने परिपक्व असलेल्या मेरीने पहिल्या फेरीत शांत डोक्याने खेळत ओखटाला वेळ दिला. नंतर, मेरीने आपला पंच दाखवत ओखटाला सळो कि पळो करून सोडले. तिसऱ्या फेरीत तर मेरी कोमने एकहाती वर्चस्व गाजवत ओखटाला अक्षरशः हादरून सोडले आणि सहाव्यांदा जेतेपद फटकावले. “माझ्यासाठी हा विजय खूपच महत्वाचा आहे. कारण या विजयाने २०२० साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मला थेट स्थान मिळणार आहे. त्यामुळे हा विजय माझ्यासाठी मोलाचा ठरला आहे. आतापर्यंत मला बऱ्याच जणांनी पाठिंबा दिला, त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते.” विजयांनंतर अत्यंत नम्र पणाने मेरी कोमने आपली प्रतिक्रिया दिली.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *