मंडळी सर्वात प्रथम तुम्हाला दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!
लक्ष्मी पूजन करताना लक्ष्मी दाराबाहेर का हकलता?
शीर्षक पाहून कदाचित तुम्ही म्हणाल की, मी हे काय लिहिले आहे. पण ही सत्यस्तिथी आहे. आपण श्रीलक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे पूजन तर दरवर्षी करतो, पण खऱ्या अर्थाने लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते का याचा गांभीर्याने विचार करायला हवा. आपण जास्तीत जास्त परदेशी गोष्टींकडे ओढलो जातो आणि आपल्या देशातील जास्तीत जास्त संपत्ती आपण परदेशात पाठवतो. ज्यामुळे आपल्याला या देशात काही प्रमाणात दारिद्र्याला तोंड द्यावे लागते. कितीतरी ठिकाणी लोकांना रहायची, खायची सोय नाही. कारण इथे मुलांना रोजगारच मिळत नाही. याचे कारण परदेशी कंपन्यांचा आपल्यावर असलेला प्रभाव. मान्य आहे की, प्रत्येक जण एकमेकांवर जसा अवलंबून असतो तसा एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून असतो. पण याचा अर्थ असा नव्हे की आपण अजूनही परकीयांचे आर्थिक गुलाम रहावे. मग उपयोग तरी काय अशा लक्ष्मी पूजनाचा?
जेवढं शक्य होईल तेवढे फक्त दिवाळी पुरता नव्हे तर नेहमी स्वदेशीचा वापर करा. आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्याचे उत्पादन कसे सुरू करू शकतो याचा विचार करा. तेव्हाच या लक्ष्मीपूजनाला खऱ्या अर्थाने महत्व प्राप्त होईल.
एक महान व्यती ज्याने असा एकही राष्ट्रीय विषय नाही, ज्यावर भाष्य केले नाही. पण भारतीयांनी त्यांच्या भाष्याकडे कधी गांभीर्याने लक्षच दिले नाही. आता वेळ आली आहे त्याकडे लक्ष देण्याची. त्या महात्म्याचे नाव आहे, “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर!”
सावरकरांनी याच विषयावर जे अतिशय प्रभावी काव्य रचले आहे ते देत आहे.
“लक्ष्मी पूजन”
लक्ष्मीपूजन करू घरोघर आम्ही जरि भावें
प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे
आणि इंग्रज पूजी जरि ना लक्ष्मीची मूर्ती
राबे ऋद्धीसिद्धी त्याच्या दाराशीं तरि ती
काय बंधूंनो, कारण? रुसली भारतलक्ष्मी कां ?
लाथाडुनि दे पूजा आमुची शतकांची देखा
कारण आम्ही सुमें अर्चितो परि न सुमनांनें
विनवू परि ना विष्णुसम तिला जिंकू विक्रमाने
लक्ष्मीपूजन करावया जै करितो स्नानाला
परका सबू परकी तेले लावू अंगाला
परदेशीचे रेशीम त्याचा मुकटा नेसोनी
देवघरी परदेशी रंगे रंगीत बैसोनी
विदेशातली साखर घालून नैवेद्या दावू
अशा पूजेने प्रसन्न होईल लक्ष्मी हे भाऊ
सबू नेई कोटी, कोटी तेल रुपाया ने
नेई लुटोनी विदेश कोटी अन्य उपायाने
विलायती जी साखर नैवेद्यासी लक्ष्मीच्या
आणीयली ती नेत विदेशा कोटी रुपयांच्या
अशा रीतीने लक्ष्मी दवडुनी दाराबाहेरी
लक्ष्मीपूजन करीत बसतो आम्ही देवघरी
आणि विदेशी नळे फटाके फुलबाजा अंती
उडवुनी डिंडिम पिटू आपल्या मौख्याचा जगती
अहो हिंदूंनो, कोटी कोटी रुपयांची या दिवशी
लक्ष्मी पुजावयासि लक्ष्मी धाडू विदेशासी
म्हणुनी आम्ही जरी पुजू घरोघर ही लक्ष्मी भावे
प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे
तरी हिंदूंनो, घरात आधी लक्ष्मी आणावी
विदेशीसी ना शिवू शक्यतो वृत्ती बाणावी
देशी तेले, देशी सबू, देशी वस्त्राने
देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शास्त्राने
स्वदेशलक्ष्मी पुजू साधुनी जरी मंगल वेळ
गजांत लक्ष्मी हिंदुहिंदूच्या दारी डोलेलं !
हे काव्य सावरकरांनी रत्नागिरीत असताना रचले आहे.
मंडळी यावर विचार करा आणि मग बघा परिस्थिती किती बदलेल.
पुन्हा एकदा सर्वांना शुभ दीपावली…!
हर्षल मिलिंद देव
७७५६८९००२०
विरार (वसई-पालघर)
]]>