कोलकाता: कसोटी मालिकेतील पराभव, एकदिवसीय मालिकेतील पराभव बाजूला सारत नव्या जोमाने मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजला येथे पार पडलेल्या पहिल्या टी-१० सामन्यातही यजमान भारताकडून पाच गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. नेहमीप्रमाणे, मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळलेल्या विंडीजला भारताच्या गोलंदाजांनी १०९ धावांवर गुंडाळले. भारताने १३ चेंडू व ५ गडी राखत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताचा मुख्य कर्णधार विराट कोहलीने टी-२० मालिकेतून माघार घेतल्यानंतर भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्मावर होती. सप्टेंबर महिन्यात दुबई येथे पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताला जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहितने याही सामन्यात उत्तम नेतृत्व केले. त्याचा मुंबई इंडियन्सचा साथीदार कृणाल पंड्याला संघात स्थान देण्याचा त्याचा निर्णय अगदी अचूक ठरला. कृणालनेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थक ठरावीत पदार्पणाच्या सामन्यात आणखी एक मुंबई इंडियन्सचा साथीदार किएरॉन पोलार्डला बाद केले आणि भारताचा निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर मधल्या फळीत केवळ ९ चेंडूंचा सामना करीत नाबाद २१ धावा करीत संघाला विजयी करून दिलं. ११० धावांचं माफक आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात गडबडली. रोहित शर्मा (६) शिखर धवन (३) हि सलामी जोडी फोडण्यात विंडीजच्या थॉमसला यश आलं. चौथ्या क्रमांकावरील रिषभ पंतलाही विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने बाद करीत भारताची अवस्था सहाव्या षटकात तीन बाद ३५ अशी केली. के. एल. राहुल काहीसा सेट झाला असे दिसत असताना तोही ब्रेथवेटच्या गोलंदाजीचा शिकार ठरला आणि भारत चार बाद ४५ अश्या बिकट परिस्थितीत सापडला. सुरुवातीला चाचपडत खेळणारा दिनेश कार्तिकने संयम दाखवत शेवटपर्यंत किल्ला लढवला. त्याने ३४ चेंडूंत तीन चौकार व एका षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या. तत्पूर्वी, तब्बल पाच खेळाडू पदार्पण करणाऱ्या या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकत विंडीजला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. भारताच्या आघाडीच्या सर्वच गोलंदाजांनी सपाटून गोलंदाजी करीत विंडीजच्या फलंदाजांना एक-एक धाव घेण्यास शर्थीचे प्रयत्न करायला लावले. उमेश यादवने दिनेश रामदिनला बाद करीत भारताला पहिली सफलता मिळवून दिली. पुढच्याच षटकात शाई होप धावबाद होत विंडीजची सलामी जोडी भारताने स्वस्तात तंबूत परतवली. नंतर कुलदीप यादव आपल्या फिरकीची कमाल दाखवण्यास सुरुवात केली आणि विंडीजच्या फलंदाजांना अडचणीत आणले. डॅरेन ब्रावो (५), रोवमन पॉवेल (४), कार्लोस ब्रेथवेट (४) या मधल्या फळीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडत कुलदीपने विंडीजची अवस्था सात बाद ६३ अशी दयनीय केली. तळाचे फलंदाज फॅबियन अलेन (२७) व किमो पॉल (नाबाद १५) यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर विंडीज कसाबसा शंभरी गाठू शकला. भारतासाठी कुलदीपने सर्वाधिक ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने आपल्या चार षटकांत केवळ १३ धावा खर्च केल्या. तर उमेश यादव, खलील अहमद, जसप्रीत बुमरा, कृणाल पंड्या यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला. कुलदीपच्या सर्वोत्तम कामगिरीला सामानावीराचा पुरस्कार देण्यात आला.]]>