बदली खेळाडू प्रांजलने कोचीविरुद्ध मुंबईला तारले

कोची: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी केरळा ब्लास्टर्स एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात १-१ अशी बरोबरी झाली. घरच्या मैदानवर विजयाकडे घोदडौड करणाऱ्या ब्लास्टर्सविरुद्ध मुंबईला बदली खेळाडू प्रांजल भूमिजने तारले. त्याने पाच मिनिटांच्या भरपाई वेळेतील तिसऱ्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे हालीचरण नर्झारीमुळे पुर्वार्धात खाते उघडलेल्या ब्लास्टर्सला घरच्या मैदानावरही विजयी सलामी देता आली नाही. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ३१ हजार १६६ प्रेक्षकांच्या साक्षीने ब्लास्टर्सने अपेक्षेप्रमाणे जोरदार सुरवात केली. सुरवातीपासून चाली रचत त्यांनी मुंबईच्या बचाव फळीला स्थिरावू दिले नाही. २४व्या मिनिटाला ब्लास्टर्सला फळ मिळाले. सैमीनलेन डुंगलच्या सुंदर पासमुळे स्लासिवास स्टोजानोविच याने उजवीकडू पेनल्टी क्षेत्रात प्रवेश केला. दुसऱ्या बाजूला नर्झारीच्या स्थितीचा अंदाज घेत त्याने चेंडू मारला. नर्झारीने या संधीचे सोने करीत मुंबईचा गोलरक्षक अमरिंदरला चकविले. प्रांजल ७०व्या मिनिटाला रेनीयर फर्नांडिस याच्याऐवजी मैदानावर उतरला होता. त्याने ३५ यार्डावरून जवळपास कोणी नसल्याचे हेरत अफलातून फटका मारला. त्यामुळे ब्लास्टर्सचा गोलरक्षक धीरज सिंह निरुत्तर झाला. मुंबईवर सुरवातीपासून दडपण होते. तिसऱ्याच मिनिटाला अमरिंदरला सक्रिय व्हावे लागले. महंमद रकिपने उजवीकडून नर्झारीला क्रॉस पास दिला. नर्झारीने डाव्या पायाने डुंगलकडे चेंडू सोपविला, पण अमरिंदरने वेळीच सरसावत चेंडू अडविला. पुढच्याच मिनिटाला ब्लास्टर्सच्या नेमांजा लॅकिच-पेसिच याला यलो कार्ड दाखविण्यात आले. त्याने मुंबईच्या रफाईल बॅस्तोसला अकारण पाडले. १४व्या मिनिटाला ब्लास्टर्सने आणखी एक प्रयत्न केला. मॅटेज पॉप्लॅटनिक याने सुंदर पास दिल्यावर स्टोजोनोविचने डाव्या पायाने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईच्या ल्यूचियन गोऐन याने मैदानावर घसरत चेंडू ब्लॉक केला. चेंडू बाहेर गेल्याने मिळालेल्या कॉर्नरवर काही घडले नाही. १८व्या मिनिटाला ब्लास्टर्सच्या लालरुथ्थाने मुंबईच्या अरनॉल्ड इसोकोला पाडले. अरनॉल्डने टचलाईनजवळ हे घडल्याने फाऊलचा दावा केला, पण ब्लास्टर्सचे प्रशिक्षक डेव्हिड जेम्स यांना हे पसंत पडले नाही. त्यावरून अरनॉल्ड व त्यांच्यात शाब्दिक चकमक झडली. २१व्या मिनिटाला मुंबईने प्रयत्न केला. उजवीकडून पाउलो मॅचादोने फ्री किकवर पलीकडील बाजूला ल्यूचियनच्या दिशेने चेंडू मारला, पण ल्युचियनचे हेडिंग स्वैर होते. त्यावेळी फारसे मार्किंग नसूनही ल्युचियनला संधीचा फायदा उठविता आला नाही. ३३व्या मिनिटाला मॅचादोने पास दिल्यावर अरनॉल्डने प्रयत्न केला, पण त्यास साथ मिळू शकली नाही. मध्यंतराच्या पिछाडीनंतर मुंबईला ६४व्या मिनिटाला संधी मिळाली होती. रेनीयर फर्नांडिसने पास दिल्यानंतर नेटसमोर पुरेपूर वाव असूनही अरनॉल्डने स्वैर फटका मारला. ७९व्या मिनिटाला बॅस्तोसने अरनॉल्डला पास दिला, पण ब्लास्टर्सचा कर्णधार संदेश झिंगन याने बरोबरीने धाव घेत चेंडू ब्लॉक केला. अँतिम टप्यात मुंबईचा बदली खेळाडू मॅटियस मिराबाजे याचा फटका धीरजने चपळाईने थोपविला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *