गुवाहाटी: हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात नॉर्थइस्ट युनायटेड आणि एफसी गोवा यांच्यातील वेगवान खेळामुळे रंगतदार ठरलेल्या लढतीत २-२ अशी बरोबरी झाली. गेल्या मोसमात आक्रमक खेळाचा धडाका लावलेल्या गोव्याविरुद्ध नॉर्थइस्टने घरच्या मैदानावर एक गुण मिळवित आपल्या मोहिमेला समाधानकारक प्रारंभ केला. येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर गोव्याने मध्यंतरास २-१ अशी आघाडी घेतली होती. दोन्ही गोल कोरोमीनासने केले होते. फेडेरिको गॅलेगोमुळे नॉर्थइस्टने आठव्याच मिनिटाला खाते उघडण्यात यश मिळविले होते. यजमान संघाने उत्तरार्धात आठव्या आणि एकूण ५३व्या मिनिटाला बरोबरी साधली. बार्थोलोम्यू ओगबेचे याने हा गोल केला. त्यानंतर दोन्ही संघांनी निर्णायक गोलसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरू शकले नाहीत. स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यासाठी कोरोची कामगिरी बहुमोल ठरली. गत मोसमात सर्वाधिक १८ गोल केलेल्या कोरोने यंदा पहिल्याच लढतीत दोन गोलांची भर घातली. खाते उघडण्याची शर्यत यजमान नॉर्थइस्टने जिंकली. गोव्याचा नवा गोलरक्षक महंमद नवाझने ऑफसाईड समजून चेंडूवर हातात घेतला, पण ऑफसाईड नसल्यामुळे फ्री-किक नॉर्थइस्टला मिळाली. त्यावर फेडेरिको गॅलेगोने घोडदौड करीत अफलातून फटका मारत चेंडू नेटमध्ये घालविला. गोव्याने सहा मिनिटांत बरोबरी साधली. १४व्या मिनिटाला कोरोने हा गोल केला. त्याने आधी जॅकीचंद सिंगला पास दिला. उजवीकडून जॅकीचंदने आगेकूच केली. तोपर्यंत कोरोने वेगाने पेनल्टी क्षेत्र गाठले. जॅकीचंदने मारलेल्या चेंडूवर ह्युगो बौमौसने हेडिंगचा प्रयत्न केला, पण तो चुकला. नॉर्थइस्टचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेशने चेंडू पंच करायचा प्रयत्न केला, पण हा चेंडू कोरोपाशी पडला आणि मग त्याने अचूक संतुलन साधत गोल केला. गोव्याने मध्यंतरास सहा मिनिटे बाकी असताना दुसरा गोल केला. कोरोने बौमौसची चाल सत्कारणी लावली. सामन्याची सुरवात वेगवान झाली. दुसऱ्या मिनिटाला जॅकीचंदने उजवीकडे चेंडूवर ताबा मिळविला. त्याने डावीकडे वळून फटका मारला, पण तो स्वैर होता. पाचव्या मिनिटाला सामन्यातील पहिला कॉर्नर गोव्याने मिळविला. त्यावर मध्यरक्षक बौमौसने चेंडू प्रमाणाबाहेर ताकद लावून मारला. त्यामुळे ही संधी वाया गेली. पुढच्याच मिनिटाला गोव्याला आणखी एक कॉर्नर मिळाला. त्यार कर्णधार मंदार राव देसाई याने बॉक्समध्ये मारलेला चेंडू रेहेनेश याने पुढे सरसावत अडविला. रेहेनेश तोल जाऊन पडला आणि त्याला थोडे लागले. १९व्या मिनिटाला मंदारने डावीकडे चेंडू मिळविला, पण त्याचा फटका नॉर्थइस्टचा किगन परेराने अडविला. त्यानंतर गोव्याने लागोपाठ दोन कॉर्नर मिळविले, पण रेहेनेशने हे आक्रमण थोपविले. या लढतीत जमशेदपूरने कोल्हापूरच्या निखील कदम याला संधी दिली. त्याने उत्तरार्धात दोन प्रयत्न केले. ६७व्या मिनिटाला त्याचा फटका नवाझने थोपविला.]]>