बांगलादेशच्या २२२ धावांचा पाठलाग करताना भारताने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकत सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. दुबई: भारताला जिंकण्यासाठी २२३ धावांची गरज. कर्णधार रोहित शर्माची परफेक्ट इंनिंग. अधूनमधून गडी बाद होत गेले. ३७ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मुस्तफिझूर रहमानने धोनीला चकवले आणि भारताची अवस्था पाच बाद १६०. जिंकण्यासाठी अजूनही ८३ चेंडूंत ६३ धावांची गरज आणि पहिले पाच फलंदाज तंबूत. शेवटची भरवशाच्या फलंदाजांची जोडी मैदनात – केदार जाधव आणि रवींद्र जडेजा. तसं पाहिलं तर या आशिया चषक स्पर्धेत भारताला एका मोठ्या समस्येने त्रस्त केले होते ते मधली फळी. पाहिजे तश्या धावा मधल्या फळीकडून जमल्या नसल्यामुळे आता खरी मदार होती ती जाधव-जडेजा जोडीवर. काही चेंडू खेळल्यानंतर पुन्हा एकदा समस्या आली ती केदार जाधवची हार्मस्ट्रिंगची. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्स कडून मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना ज्या समस्येने भेडसावले होते तीच समस्या पुन्हा एकदा उद्भवली. आणि काहीच वेळेत जे नको हवं होतं तेच घडलं. जाधवला मैदानाबाहेर जावं लागलं. मग आलेल्या भुवनेश्वर कुमारने जडेजाच्या साथीने ४५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली आणि भारताला पुन्हा एकदा सामन्यात आणलं. रवींद्र जडेजा व भुवनेश्वर कुमार ४८ व ४९ व्या सलगाच्या षटकात बाद झाल्यावर पुन्हा एकदा मदार आली ती केदार जाधववर. एकेरी-दुहेरी धाव घेण्यास त्रास होत असतानाही शांत डोक्याने परिस्थिती हाताळत जाधवने आपला पुणेरी बाणा दाखवत शेवटच्या चेंडूवर भारताला सामना जिंकून देत सातव्यांदा आशिया करंडकावर आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत भारताला चांगली सुरुवात करून देणाऱ्या शिखर धवन व रोहित शर्मा जोडीने पाच षटकांत ३५ धावांची सलामी दिली खरी पण धवनला आपला फॉर्म फायनलमध्ये ठेवता आला नाही आणि भारताला पहिला धक्का बसला. रायडूही मोठी धावसंख्या उभारण्यास फेल ठरला आणि पुन्हा एकदा जबाबदारी आली ती मधल्या फळीवर. महेंद्र सिंग धोनी व दिनेश कार्तिक यांनी चौथ्या गड्यासाठी ८४ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी रचित भारताला सामन्यात ठेवले. मुख्य म्हणजे भारताच्या डावात हि एकमेव अर्धशतकीय भागीदारी ठरली. भुवनेश्वर कुमार व रवींद्र जडेजा यांच्या भागीदारीनेही भारताला विजयश्री मिळवण्यास मोठी मदत केली. तत्पूर्वी, रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आठवली तर असाच निर्णय कोहलीने घेतला होता आणि चांगलेच परिणाम भारताला भोगावे लागले होते. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ज्या प्रकारे फलंदाजीस दणक्यात सुरुवात केली, त्यावरून असेच काही दिसून येत होते. मेहेदी हसनला बांगलादेशने पहिल्यांदाच सलामीस पाठवत सर्वांना आश्चर्यचकित केले. लिंटन दासने हसनसोबत सलामीला येत पहिल्या गड्यासाठी १२० धावांची भागीदारी करीत भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवण करून दिली. मग इथे पुन्हा एकदा धावून आला तो केदार जाधव. मागील २७ एकदिवसीय सामन्यांतील पहिल्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ठ भागीदारी रचलेल्या बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडायला केदार जाधवने सुरुवात केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतही त्याने अश्याच प्रकारे गोलंदाजी करीत बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडले होते आणि इथेही त्याने अशीच गोलंदाजी करीत आपण संघात का आहोत हे सिद्ध करून दिले. १२० वर एकही गडी बाद नसताना जाधवने सुरु केलेली विकेटची सुरुवात इतर गोलंदाजांनीही चांगल्या प्रकारे पकडत बांगलादेशला २२२ धावांवर गुंडाळले. एकीकडे २५०-२७० धावा धावफलकावर लागतील असे दिसत असताना रोहित शर्माने आपले गोलंदाज सुरेखरित्या वापरत बांगलादेशला मोठ्या धावसंख्येपासून रोखले. लिंटन दास (१२१), मेहेदी हसन (३२), सौम्या सरकार (३३) यांचा अपवाद वगळता एकही बांगलादेश फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही आणि परिणामी संघाला २२२ धावांवर समाधान मानावे लागले. भारतातर्फे कुलदीप यादवने सर्वाधिक तीन गडी बाद केले तर केदारने दोन व बुमराह-चहल यांना प्रत्येकी एक-एक गडी बाद करता आला. लिंटन दासच्या शतकी खेळीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला तर ५ सामन्यांत २ शतकांसह सर्वाधिक ३४२ धावा करणाऱ्या शिखर धवनला सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.]]>