कोहली आणि कंपनीची होणार खरी कसोटी

बहुचर्चित इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेस १ जुलै पासून सुरुवात होणार आहे. सर्वांची नजर असणार आहे ती कर्णधार कोहलीच्या कामगिरीवर. १२ डिसेंबर २०१६. स्थळ मुंबईचं वानखेडे मैदान. भारताने सामन्याच्या पाचव्या पहिल्याच सत्रात इंग्लंडला १९५ धावांत गारद करून पाच कसोटी सामान्यांच्या मालिकेतील चौथी कसोटी एक डाव व ३६ धावांनी जिंकली. सामन्याचा हिरो ठरला तो संघनायक विराट कोहली. २३५ धावा करीत त्याने भारताला मोठा विजय मिळवून दिला होता. रीतीप्रमाणे हरलेल्या संघाचा खेळाडू जेम्स अँडरसन पत्रकार परिषदेसाठी आला. पत्रकार म्हणून माझीही ती पहिलीच पत्रकार परिषद होती. अंडरसनला एका वरिष्ठ पत्रकाराने विराटच्या खेळीचा प्रश्न विचारला. अँडरसनचं उत्तर काहीसं असं होत, “विराट नक्कीच उत्तम खेळाडू आहे. पण भारताबाहेर त्याच्या धावा खूप कमी आहेत. इंग्लंडमध्ये तर त्याचा रेकॉर्ड फारच वाईट आहे. घराच्या मैदानावर तर कोणीही धावा जमवू शकतं. त्याने इंग्लंडमध्ये येऊन धावा कराव्या म्हणजे तो एक सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरू शकेल.” नंतर जिंकलेल्या कर्णधाराची बारी. पत्रकारांनी अँडरसनचं बोलणं विराटला सांगितलं आणि त्याची प्रतिक्रिया मागितली. विराट अगदी नम्रपणे बोलला, “हे त्याचं (अँडरसनचा) वैयक्तिक मत आहे. जेव्हा मी कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा मी एक परिपक्व खेळाडू नाही अशी टीका बऱ्याच जणांनी केली. हीच बाब मला एक फलंदाज म्हणून सुधारण्यासाठी महत्वपूर्ण ठरली.” जेव्हा त्याला काऊंटी क्रिकेट खेळणार का असं विचारलं तेव्हाही त्याच्या मनातली क्रिकेटची जिद्द दिसून येत होती. या प्रशाला विराटनं काही असं उत्तर दिलं, “माझा इंग्लंडमधील रेकॉर्ड पाहता मला इंग्लंड दौऱ्याआधी संधी मिळाली तर काऊंटी क्रिकेट खेळायला नक्कीच आवडेल. कारण तिथल्या वातावरणाशी समरस होणं काहीसं कठीणच असतं. अश्या परिस्थिती कसोटी मालिकेची पूर्वतयारी करण्यासाठी संधी मिळाल्यास मी नक्कीच खेळेन.” दुर्दैवाने विराट कोहलीची काऊंटी क्रिकेट खेळण्याची इच्छा दुखापतीमुळे पूर्ण होऊ शकली नाही. परंतु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहली पूर्णपणे तयार आहे हे त्याच्या तयारीवरून दिसताच आहे. जगातील तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजाची धावांची हि भूक कधीही न संपणारी आहे. इंग्लंडच्या त्या २०१४ च्या कसोटी मालिकेतील विराटचं प्रदर्शन त्याला आजही सतावतं. पाच सामान्यांच्या त्या कसोटी मालिकेत विराट कोहली केवळ १३४ धावाच करू शकला. तेही १३.४० च्या सरासरीने. खेळल्या दहा डावांत त्याला तब्बल नऊ वेळा वेगवान गोलंदाजांनी बाद केले. यात एकट्या अँडरसनने चार वेळा विराटचा शिकार केला. दहापैकी केवळ चारच डावांत विराटला दुहेरी आकडा गाठता आला. त्या कसोटी मालिकेनंतर विराटनं कसोटी क्रिकेटला खूपच मनावर घेतलं. त्याच वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर महेंद्रसिंग धोनीने मालिकेच्या अर्ध्यावरच कर्णधारपद सोडलं आणि विराटवर आणखी एक जबाबदारी सोपवली. विराटने तीही जबाबदारी चोख निभावत आपली फलंदाजीची उत्तमरीत्या पार पाडली. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यानंतर विराटनं आतापर्यंत खेळलेल्या ३९ कसोटींत ६१.६८ च्या सरासरीने ३७३२ एवढ्या धावा केल्या आहेत. मालिकेपूर्वी २७ कसोटींत त्याचे केवळ सहाच शतके होती. आता आहेत २१. म्हणजे या पट्ट्याने ती मालिका इतकी मनाला लावून घेतली कि आगामी मालिकेत फक्त आणि फक्त विजयच मिळवणार असा जणू निर्धारच त्याने केला आहे. या कसोटी मालिकेत खरा सामना सांगणार आहे तो कसोटी क्रिकेटमधील नंबर २ चा गोलंदाज जेम्स अँडरसन विरुद्ध नंबर २ चा फलंदाज विराट कोहली. मँचेस्टर येथील पहिल्या टी-२० सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीला वैयक्तिक कामगिरी विषयी विचारलेल्या प्रश्नाविषयी कोहलीने सांगितले होते कि स्वतःसाठी त्याने कोणतेही लक्ष्य ठेवलेले नाही. संघाची कामगिरी हे सर्वात मोठे लक्ष्य आहे असे त्याने म्हटले होते. पण कर्णधाराची मागच्या दौऱ्यातील कामगिरी पाहता त्याची धावांची भूक हेच पहिले लक्ष्य असू शकत यात मात्र शंका नाही. २०१४ च्या त्या ३-१ अश्या पराभवास आणखी एक कारण कारणीभूत ठरलं ते त्यावेळचं हवामान. त्यावेळेस तेथे टिपिकल इंग्लंडचा उन्हाळा होता जिथे चेंडू कधी उसळी घेत होता तर कधी स्विंग होत होता. परंतु या वेळेस मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. यावेळेस परिस्थिती भारतीयांशी समरस आहे. त्यामुळे यंदाच्या मालिकेत याचा फायदा भारताला नक्कीच होईल.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *