मागील तीन वर्षांत भारतीय फुटबॉल संघाने झकास कामगिरी करूनही ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांमध्ये भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या नाकर्त्यापणामुळे स्पर्धेस मुकावे लागणार आहे. तीन वर्षांत फिफा रँकिंगमध्ये १७३ वरून ९७ स्थानावर झेप घेत भारतीय संघ आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. शनिवारी मी आणि माझा मित्र सुट्टीचा आनंद घेऊन परतीच्या मार्गावर होतो. तोही क्रीडा क्षेत्रात मागील काही वर्षांपासून सक्रिय असल्यामुळे भारतीय क्रीडा विश्वातील बरीच माहिती विविध ठिकाणांहून त्याला मिळते. त्याला एक मेसेज आला कि आशियाई खेळांमध्ये कदाचित भारतीय फुटबॉल संघाला भारतीय ऑलिम्पिक महासंघ पाठवणार नाही. जवळपास ८०० खेळाडूंची यादी असलेल्यांपैकी ज्यांच्याकडून पदकांची अपेक्षा आहे अश्या ६०० खेळाडूंनाच स्पर्धेसाठी पाठवावे असा काहीसा मजकूर त्या मेसेजमध्ये होता. आमची काही वेळ या विषयावर चर्चाही झाली. रविवारी दुपारी सुमारे साडे तीनच्या आसपास भारतीय फुटबॉल महासंघाचा एक प्रेस रिलीज आला. त्याचा विषय असा होता – “भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे भारतीय फुटबॉल संघाला नाकारला आशियाई खेळांमध्ये प्रवेश” समजत नव्हतं या इमेलला प्रतिक्रिया द्यायची ती काय. कारण क्रिकेटचा जबरा फॅन असलेला मीही मागील काही वर्षांपासून भारतीय फुटबॉल खूप फॉलो करायला लागलोय. इंडियन सुपर लीग, भारतीय संघाचे सामने असे बरेच सामने मी मैदानात जाऊन कव्हर केलेत. आणि तीन वर्षांपूर्वीचा भारत फुटबॉल संघ आणि आजच्या तारखेचा भारतीय फुटबॉल संघ, खूप खूप तफावत जाणवते. आजच्या तारखेला भारतीय फुटबॉल संघाला सुगीचे दिवस आले असतानाही भारतीय ऑलिम्पिक संघ इतका नकारात्मक विचार करूच कसा शकतो? प्रश्नाचं उत्तर माझ्याही समजण्यापलीकडचं होतं. आपल्या भारतात एखाद्या चांगल्या गोष्टीला विरोध करणे काही नवीन नाही. कारण जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून टेंबा मिरवणाऱ्या भारतात सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकच जास्त चर्चेत असतात. असो. फुटबॉल खेळ हा काही भारतीयांसाठी नवीन नाही. १९५० सालच्या फिफा विश्वचषकास पात्र ठरवूनही भारतीय संघ शुल्लक कारणांस्तव खेळू शकला नाही. पण भारतात फुटबॉल खेळाचे फॅन्स काही कमी नाहीत. युरोपियन लीग, स्पॅनिश लीग अश्या जगभरातील बऱ्याच लीग भारतीयांच्या तोंडपाठ आहेत. शिवाय मागील दोन-तीन वर्षांपासून भारतीय फुटबॉल संघाची झालेली चमकदार कामगिरीही भारतीय फॅन्स आवर्जून फॉलो करतात. मागच्याच महिन्यात भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या १०० व्या सामन्यास त्याने केलेल्या आव्हानानंतर दिलेली दाद नक्कीच इतिहासात लिहिली जाईल. मग एवढं सगळं चांगलं चाललं असतानाही भारतीय ऑलिम्पिक संघ इतक्या खालच्या पातळीचा निर्णय कसा घेऊ शकतो? हा प्रश्न मलाच नाही तर संपूर्ण भारतीय क्रीडा रसिकांना पडला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या त्या प्रेस रिलीजनुसार, फुटबॉल सारख्या जगातील सर्वात लोकप्रिय खेळाला भारतात जिथे आजच्या परिस्थिती खूप महत्व दिले जाते, आणि मागील काही वर्षांपासून भारतीय फुटबॉल संघाची उंचावलेली कामगिरी, २०१९ च्या आशियाई चषक स्पर्धेसाठी झालेली पात्रता व २०१७ चा अंडर-१७ विश्वचषकाचे केलेले यशस्वी आयोजन असतानाही भारतीय ऑलिम्पिक महासंघाने भारतीय फुटबॉल संघाला जकार्ता येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धेत पाठवण्यास नकार दिला. फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष नारिंदर बत्रा यांना फुटबॉल संघाच्या यशस्वी कामगिरीची माहिती वारंवार देऊनही ऑलिम्पिक महासंघ आपल्या निर्णयावर ठाम राहिला. ऑलिम्पिक महासंघाच्या नियमावलीनुसार, जे संघ १ ते ८ या क्रमवारीत येतात त्यांनाच स्पर्धेसाठी पाठविले जाईल. शिवाय ज्या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा नसेल त्यांनाही यादीतून वगळण्यात येईल. सध्या चालू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत आशियामधील टॉप ५ संघच पात्र ठरलेत. मग अश्यात भारतीय फुटबॉल संघाकडून पदकाची अपेक्षा काय असेल? कदाचित असा विचार ऑलिम्पिक महासंघाने केला असेल. पण खेळात कुठला संघ कधी कोणावर भारी ठरेल हे कोणीच भाकीत करू शकत नाही. उदाहरणच घ्या ना. चालू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत मागच्या वेळचा विजेता जर्मनीला साखळी फेरीतच आपला काशा गुंडाळावा लागला. तर मेस्सीची अर्जेंटिना व रोनाल्डोच्या पोर्तुगाललाही उपांत्यपूर्व फेरीमध्येही प्रवेश करता आला नाही. भारतीय संघ नक्कीच आपल्या ‘प्राईम फॉर्म’ मध्ये आहे. मागील तीन वर्षांत १७३ हुन ९७ इतकी मोठी रँकिंगमध्ये घेतलेली हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. शिवाय तब्बल आठ वर्षांनी संघ एएफसी आशियाई फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. शिवाय आयएसएल, आय-लीग सारख्या स्पर्धेतून उंचावलेला खेळाचा दर्जा, रिलायन्ससारख्या संस्थांनी शाळांपासून केलेला फुटबॉलचा विकास नक्कीच प्रशंसनीय आहे. असे असतानाही ऑलिम्पिक महासंघाचा हा नकारात्मक दृष्टिकोन भारतीय फुटबॉलसाठीच नव्हे तर संपूर्ण क्रीडा क्षेत्रासाठी घातक आहे.]]>