हैद्राबादला पराभूत करीत चेन्नईनं गाठलं आयपीएल फायनलचं तिकीट

क्वालिफायर १ च्या रोमांचक लढतीत चेन्नईच्या फॅफ डूप्लेसीसने एकाकी झुंज लढत चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळवून देत यंदाच्या आयपीएल फायनलचं तिकीट पक्के केले. टेबल टॉपर्स गडगडले आयपीएल फायनलचं थेट तिकीट मिळवण्यासाठी क्वालिफायर १ च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकत सनरायसर्स हैद्राबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मोठ्या खेळाडूंचा भरणा असलेल्या सनरायर्सला युवा दीपक चहरने पहिल्याच चेंडूवर मोठा हादरा देत चेन्नईला धमक्यात सुरुवात करून दिली. शिखर धवनला क्लीन बोल्ड करीत शून्यावरच तंबूचा रस्ता दाखविला. धोनीने आपली चलाखी दाखवीत लुंगी एनगिडीला दुसऱ्या बाजूने मारा करण्यास सांगितले. चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर एनगिडीने श्रीवत्स गोस्वामीला (९ चेंडू १२ धावा) स्वतःच्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल घेत सलामी जोडी चार षटकांच्या आतच तंबूत धाडली. तीन चेंडूंनंतर शार्दूल ठाकूरने स्पर्धेत सर्वाधिक धावा बनविणाऱ्या हैद्राबादचा कर्णधार केन विलियम्सनला (१५ चेंडू २४ धावा) धोनीकरवी झेलबाद करीत डावाला खिंडार पाडण्यास सुरुवात केली. पावरप्ले अखेरीस हैद्राबाद तीन बाद ४७ अश्या बिकट अवस्थेत सापडला होता. टी-२० क्रिकेटमध्ये मधल्या षटकांत भागीदारीला खूप महत्व असतं. आणि वानखेडेच्या मैदानावर जिथे उष्ण व दमट हवामानामुळे रात्रीच्या खेळात दवाचा परिणाम खूपच पडतो तिथे स्पिनर्ससोबतच वेगवान गोलंदाजांनाही गोलंदाजी करणे कठीण जाते. पण चेन्नईच्या गोलंदाजांनी परिस्थितीचा फायदा घेत मधल्या षटकांत हैद्राबादच्या फलंदाजांना जखडून ठेवले. षटक क्रमांक सात ते १५ या मधल्या नऊ षटकांत चेन्नईने केवळ ४१ धावा खर्च करीत शाकिब-अल-हसन (१० चेंडू १२ धावा), मनीष पांडे (१६ चेंडू ८ धावा) व युसूफ पठाण (२९ चेंडू २४ धावा) या तगड्या फलंदाजांना माघारी परतवत सामन्यावर पकड मजबूत केली. जडेजाने या वेळेस आपल्या चार षटकांत केवळ १३ धावा खर्च करीत एक गडी बाद केला. ब्रेथवेटचा लेट करंट हैद्राबाद १२० चा आकडाही पार करेल कि नाही असे एक वेळेस वाटत होते. संघासाठी या वेळेस धावून आला तो वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्रेथवेट. २९ चेंडूंत चार उत्तुंग षटकार खेचत त्याने नाबाद ४३ धावांचं मौल्यवान योगदान देत संघाला १३९ अशी समानधनकारक धावसंख्येची मजल मारण्यास मदत केली. त्याने शेवटच्या षटकात शार्दूल ठाकूरला तीन षटकार खेचत तब्बल २० धावा कुठल्या. चेन्नईकडून ब्रावोने २५ धावांत २, तर चहर, एनगिडी, शार्दूल ठाकूर यांनाही एक-एक गडी बाद करता आला. हैद्राबादचं जशास तसं उत्तर १४० धावांचं माफक आव्हान पार करण्यास मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सची अवस्था पहिला सहा षटकांत खूपच बिकट झाली. धोनीने शेन वॉटसन व फॅफ डुप्लेसिस यांना सलामीस पाठवतात रायडूला मागे ठेवले. पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने वॉटसनला शून्यावर बाद करीत एका मोठ्या जुगलबंदीचे संकेत दिले. पण तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सुरेश रैनाने दुसऱ्या षटकात संदीप शर्माला सलग तीन चौकार खेचत एका बाजूने दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. विलियम्सनने चौथ्या षटकात सिद्धार्थ कौलला चेंडू सोपवला आणि त्याने कमालीची गोलंदाजी करीत रैना व रायडू यांना सलगच्या चेंडूंवर त्रिफळाचित करीत चेन्नईची अवस्था तीन बाद २४ एवढी बिकट केली. पावरप्ले अखेरीस चेन्नईने कश्याबश्या ३३ धावा धावफलकावर लगावलया. धोनीच्या संघाला मंद खेळपट्टीवर एक-एक धाव जमण्यास हैद्राबादच्या गोलंदाजांनी अगदी रडवले. धोनी स्वतः आठव्या चेंडूवर खातं उघडण्यास यशस्वी ठरला. आठव्या षटकातील चौथा चेंडू इतका भारी होता कि धोनीसारखा नामवंत व अनुभवी फलंदाज रशीद खानच्या गुगलीत अडकला. धोनीला क्लीन बोल्ड करीत चेन्नईची अवस्था आठव्या षटकाच्या अखेरीस चार बाद ४० अशी बिकट केली. हैदराबादने खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत स्पिनर्स सोबतच वेगवान गोलंदाजांनीही आपली चतुराई दाखवली. ड्वेन ब्रावो (११ चेंडू ७ धावा), रवींद्र जडेजा (५ चेंडू ७ धावा), दीपक चहर (६ चेंडू १० धावा) या मधल्या फळीतील फलंदाज सपशेल फेल ठरले आणि संघाची अवस्था १५ षटकांच्या समाप्तीनंतर सात बाद ९२ अशी झाली. डूप्लेसीसने एकाकी झुंज १८ चेंडूंत ४३ धावांची गरज असताना संघ पराभूत होतो कि काय अशी दुविधा उपस्थित प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. विलियम्सनने १८ वे षटक ब्रेथवेटला सोपवले आणि डूप्लेसीसने तीन चौकार व एक षटकार खेचत तब्बल २० धावा कुटल्या. यात एक दुहेरी धाव घेण्याच्या नादात हरभजन सिंघला आपला विकेट गमवावा लागला. १९ व्या षटकात प्रभावी मारा करणाऱ्या सिद्धार्थ कौलला दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आलेल्या शार्दूल ठाकूरने तीन चौकार खेचत तब्बल १७ धावा ठोकल्या. चेन्नई सुपर किंग्सची तळाची फलंदाजीही आज त्यांच्या कामी आली. या दोन मोठ्या षटकांनंतर सामन्याचं समीकरण येऊन ठेपलं ते सहा चेंडूं सहा धावा. मग काय, सेट झालेल्या डूप्लेसीसने भुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या शतकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत फायनलचं तिकीट पक्कं केलं. दोन वर्षांच्या बंदीनंतर आलेल्या चेन्नई सुपर किंग्सने आपल्या कामगिरीत सातत्य दाखवीत आपण दादा आहोत हे सिद्ध केलं. संक्षिप्त धावफलक सनरायसर्स हैद्राबाद १३९/७ (२०) – ब्रेथवेट ४३(२९), विलियम्सन २४(१५), ब्रावो २-२५, जडेजा १-१३ चेन्नई सुपर किंग्स १४०/८ (१९.१) – डूप्लेसीस ६७*(४२), रैना २२(१३), रशीद खान २-११, संदीप शर्मा २-३० चेन्नई सुपर किंग्स २ गडी व ५ चेंडू राखून विजयी]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *