महिलांच्या आयपीएलसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाला महिलांच्या प्रदर्शनीय सामान्यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. मुंबई: ऑस्ट्रेलियाच्या महिला बिग बॅश लीगच्या धर्तीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अल्पावधीत आयोजित केलेल्या महिला टी-२० चॅलेंज सामन्याला प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि एका प्रकारे बीसीसीआयला चपराकच लगावली. १५ मे रोजी या सामान्याची घोषणा करण्यात आली, १७ मे ला दोन्ही संघ घोषित झाले. प्रेक्षकांचा विचार केला तर आयपीएलचा क्वालिफायर १ च्या सामनाच्या तिकिटावर प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला होता. त्यातही भाराभर अटी. भारतीय महिला क्रिकेटचा विचार केला तर मागील काही वर्षांपासून भारतीय महिलांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताचे प्रेक्षक महिला सामान्यांकडे वळू लागले आहेत. शिवाय बीसीसीआयने उचलेल्या काही ठोस पावलांमुळे घरबसल्या प्रेक्षकही महिला क्रिकेटचा आनंद मागील काही महिन्यांपासून घेत आहेत. मागील वर्षी झालेल्या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने अंतिम फेरी गाठत केवळ भारतभरातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून वाहवाह मिळवली होती. मिथाली राजच्या भारतीय महिलांनी विश्वचषक स्पर्धेत मिळवलेल्या यशानंतर सगळीकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला होता. अशातच एका कार्यक्रमात महिला आयपीएल बद्दल प्रश्न विचारला होता आणि तिने बीसीसीआयला महिलांच्या खेळात सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता. याच सल्ल्याचा सकारात्मक विचार करीत बीसीसीआयने महिला क्रिकेटचे अगदी चोखपणे आयोजन करीत भारतीय महिला क्रिकेटचा दर्जा सुधारण्यावर भर दिला. स्मृती मंदना, हरमनप्रीत कौर, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स यांसारख्या युवा महिला क्रिकेटपटू आपल्या कामगिरीत सातत्य दाखवू लागल्या. भारताने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या तगड्या संघांना मात देत महिला क्रिकेटविश्वात एक वेगळीच झोप सोडली. वानखेडेवर खेळवल्या गेलेल्या प्रदर्शनीय सामन्याचा विचार केला तर भारतीय क्रिकेट बोर्ड या सामान्याचं आयोजन खूप पद्धतशीर रित्या करू शकला असता. १५ मे ला आयपीएलचे चेयरमन राजीव शुक्ल यांनी महिला टी-२० चॅलेंज सामन्याची घोषणा केली. बीसीसीआयने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये याची माहिती माध्यमांना देण्यात आली. सर्वच माध्यमांनी महिला टी-२० चॅलेंज सामान्याचं जोरदार स्वागत करीत या सामन्याला प्रकाशझोतात आणण्याचं काम सुरु केलं. दोन दिवसांनी लगेचच दोन्ही संघाची घोषणा बीसीसीआयने केली. स्मृती मंदनाचा संघ ‘ट्रेलब्लेझर’ हरमनप्रीत कौरचा संघ ‘सुपरनोवास’. राजीव शुक्लांनी प्रेस रिलीजमध्ये म्हटल्याप्रमाणे या सामन्यासाठी अगोदरच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड बोर्डाकडे बोलणी केली होती आणि त्यास सकारात्मक प्रतिसादही मिळाला होता. न्यूझीलंडची कर्णधार सुझी बेट्स, सोफिया डिवाईन, ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू एलिसा पेरी, एलिसा हिली, मेगन स्कट, बेथ मुनी, मेग लॅनिंग तर इंग्लंडकडून डॅनी वायट व डॅनियल हेझल अश्या बड्या महिला क्रिकेटपटूंना भारतीय बोर्डाने आमंत्रीत केले होते. आता प्रश्न पडतो तो सर्वात श्रीमंत क्रिकेटबोर्ड म्हणून तोरा मिरवणाऱ्या भारतीय बोर्डाने आयोजित या सामान्याकडे प्रेक्षकांनी पाठ का फिरवली? उत्तर सोपं आहे. सामन्याची तयारी करण्यास मिळालेला अवधी. सामान्यच आयोजन मुंबईच्या ऎतिहासिक वानखेडे मैदानावर दुपारी २ वाजता करण्यात आलं होतं जिथे आयपीएलचा क्यालिफायर एक चा सामना चेन्नई सुपर किंग्स व सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सायंकाळी ७ वाजता खेळवला जाणार होता. ज्या महिला क्रिकेट रसिकांना या सामन्याचा आस्वाद घ्यायचा होता त्यांना तिकिटे उपलब्ध नव्हती. सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे सोमवार दिनांक २१ मे रोजी बीसीसीआयने जारी केलेल्या प्रेस रिलिसमध्ये असे स्पष्ट केले कि ज्या प्रेक्षकांनी क्यालिफायर १ ची तिकिटे खरेदी केली आहेत त्यांनाच या सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. तसेच एकदा मैदानात गेल्यानंतर त्या प्रेक्षकांना हे तिकीट बाहेर येऊन दुसऱ्या पुरुषांच्या सामन्यासाठी दुसऱ्या कोणाला देता येणार नाही. म्हणजे भर उन्हात प्रेक्षकांना १-२ वाजल्यापासून सामना पाहावा लागणार. शिवाय याची पूर्वसूचनाही वेळेत देण्यात आली नाही. आणि त्यात भर म्हणजे ऑफिसमध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांना इच्छा असूनही सामन्याची मजा लुटता आली नाही. थोडक्यात, बीसीसीआयने जर या सामन्याचं आयोजन अगदी निजायनबद्ध केले असते तर महिला क्रिकेटवेड्या रसिकांना या सामन्यास हजेरी लावता आली असती. पहिल्या डावात जेमतेम शे-दोनशे तर दुसरा डाव संपण्याच्या वेळेस ४००-५०० प्रेक्षक या सामन्यास उपस्थित होते. यावरून बीसीसीआयचा ठिसाळपण स्पष्ट होतो. एकीकडे महिला क्रिकेट सशक्तीकरणीसाठी कटिबद्ध असणाऱ्या बोर्डाचं असं निजायन एकप्रकारे चपराकच आहे असा म्हणण्यात काहीच वावगळ ठरणार नाही.]]>