अँड्रयू टायचा तडाखा, मुंबईची घसरगुंडी नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले आणि आखलेल्या ‘प्लान’ मध्ये बरोबर अडखवले. जेपी डुमिनीच्या जागी आज पोलार्डला संधी देण्यात आली होती तर पंजाबने मयांक अग्रवाल व करुण नायरच्या जागी युवराज सिंग व मनोज तिवारी यांना अंतिम संघात स्थान दिले. डावाच्या तिसऱ्या षटकात अंकित राजपूतच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने दोन चौकार व दोन षटकार खेचत मुंबईने एकूण २१ धावा कुटल्या आणि चांगल्या सुरुवातीचा आगाज केला. पण मुंबईचा हा आनंद किंग्स XI पंजाबचा यंदाचा सर्वात सफल गोलंदाज अँड्रयू टायने जास्त काळ टिकून दिला नाही. चौथ्या षटकात एव्हीन लेविसला (७ चेंडू ९ धावा) क्लीन बोल्ड करीत पहिला धक्का दिला. पावरप्लेच्या शेवटच्या षटकात ईशान किशन (१२ चेंडू २० धावा) आणि सूर्यकुमार यादव (१५ चेंडू २७ धावा) यांना पाठोपाठ बाद करीत मुंबईची अवस्था सहा षटकांअखेरीस तीन बाद ६० अशी केली. पहिल्या दोन षटकांत २८ धावा खाल्ल्यानंतरही अश्विनने अंकित राजपूतला नवव्या षटकात पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केले. राजपूतने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवीत मुंबईला सर्वात मोठा धक्का दिला. धावांसाठी झगडणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला चकवले. रोहितचा फटका चुकला आणि मिड-ऑनला उभ्या असलेल्या युवराज सिंगकडे झेल देत तंबूत परतला. त्याला १० चेंडूंत केवळ सहा धावाच करता आल्या. दहा षटकांअखेरीस मुंबई इंडियन्सला कश्याबश्या ७९ धावा जमवता आल्या. त्याही चार गड्यांच्या मोबदल्यात. पोलार्ड-कृणालचा चिवटपणा मुंबई इंडियन्स चांगल्या सुरुवातीनंतर पुन्हा एकदा कोलमडते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आघडीचे चार फलंदाज पहिल्या दहा षटकांच्या आतच तंबूत परतल्यानंतर कृणाल पांड्याने आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या किरॉन पोलार्डसोबत एक महत्वपूर्ण भागीदारी रचली. ३६ चेंडूंत ६५ धावा पाचव्या गड्यासाठी जमवत मुंबईला एका समाधानकारक धावसंख्येकडे वळविले. स्टोयनीसने कृणाल पांड्याचा (२३ चेंडू ३२ धावा) अडथळा दूर केल्यानंतर पंजाबला पुन्हा एकदा सामन्यात आणले. दरम्यान, पोलार्डने आपल्या टीकाकारांना उत्तर देत २२ चेंडूंत अर्धशतक झळकावत सामन्याची रंजकता वाढवली. परंतु, टाइम आउट झाल्यानंतर अश्विनने पोलार्डला आपल्या कॅरमबॉलवर फसविले आणि लॉन्ग ऑफला उभ्या असलेल्या फिंचकडे झेल देण्यास भाग पाडले. पोलार्डने २३ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार खेचत ५० धावा केल्या. पंजाबचा प्रभावी गोलंदाज टायने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये आणखी दोन गडी बाद करीत मुंबईला १८६ धावांत रोखले. हार्दिक पांड्या (९), बेन कटिंग (४) हे स्वस्तात तंबूत परतल्यामुळे मुंबईला २०० चा आकडा गाठण्यात अपयश आले. टायने चाट षटकांत तब्बल १५ चेंडू निर्धाव टाकत मुंबईचे चार गडी टिपले. तर अश्विनला दोन व अंकित राजपूत, मार्क्स स्टोयनीस यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला. पंजाबचा सावध पवित्रा स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय हा आवश्यक होता. पहिल्या सहापैकी पाच सामने जिंकत डौलानं मान उंचावणाऱ्या किंग्स XI पंजाबला मागील सहा सामन्यांत मात्र पाचवेळेस हार पत्करावी लागली हेही तितकाच खरं. १८७ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या क्रिस गेल – केएल राहुल या जोडीने ३४ धावांची सलामी दिली. क्रिस गेल चौथ्या षटकात मिचेल मॅकक्लेनेघनच्या बाउन्सरवर बेन कटिंगकडे झेल देत तंबूत परतला. त्याने ११ चेंडूंचा सामना करताना दोन चौकार व एक षटकार खेचत १८ धावंच योगदान दिलं. पहिल्या धक्क्यानंतर राहुलने फिंचच्या साथीने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. मुंबईच्या गोलंदाजांचा सावध रीतीने सामना करीत धावसंख्या पुढे सरकवली. मधेच मिळालेले खराब चेंडू सीमारेषेपलीकडे धाडत धावफलक हलता ठेवला. राहुलची झुंज वाया १५ षटकांनंतर पंजाब एक गडी बाद १२७ धावांवर होता. रोहितने मग मयांक मार्कंडेकडे चेंडू सोपवला आणि १६ व्या षटकात तब्बल १८ धावा कुटून पंजाबने पुन्हा एकदा सामन्याची सूत्रे आपल्या बाजूने वळवली. आता समीकरण होतं ते २४ चेंडू आणि ४२ धावा. शतकीय भागीदारी केलेली राहुल-फिंच हि जोडी अजूनही मैदानात होती. अशी चांगली परिस्थिती असतानाही मुंबईच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी चतुर गोलंदाजी करीत सामना आपल्या बाजूने झुकवला. बुमराने १७ व्या षटकात केवळ ७ धावा देत फिंच (४६) व स्टोयनीस (१) यांना बाद केलं. १८ व्या षटकात राहुलने कटिंगला सलग तीन चौकार खेचत सामन्यात आणखी रंगात आणली. पुढच्या षटकात बुमराने राहुलला (६० चेंडू ९४ धावा) बाद करीत पंजाबच्या हातातून सामना खेचला. याच विजयाबरोबर मुंबईच्या प्लेऑफ मध्ये जाण्याच्या आशा आणखी मजबूत झाल्या आहेत. दिल्लीविरद्धचा शेवटचा सामना जिंकल्यास मुंबई इंडियन्स जवळपास अंतिम चारमध्ये प्रवेश करेल.]]>