जेसन रॉयची कमाल, दिल्लीचा दिलखुश विजय

मुंबई इंडियन्स आणि रंगत हे जणू समीकरणच बनलं आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेविल्सने मुंबई इंडियन्सचा सात गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सचा हा आयपीएलमधील सलग तिसरा पराभव झाला. मुंबई: पहिल्या दोन सामन्यांत अपेक्षेप्रमाणे सुरुवात न मिळाल्यामुळे रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने आज आपल्या सलामीच्या जोडीत बदल करीत इव्हिन लुईसच्या जोडीला सूर्यकुमार यादवला पाठवले. एरव्ही रोहित शर्मा ओपनिंग करताना दिसत असताना आज यादवकरवी सलामी करीत मुंबई इंडियन्सने एका प्रकारे आपली रणनीती काहीशी वेगळीच आखल्याचे दिसलं. या जोडीने मुंबईच्या सुमारे २१००० शालेय विद्यार्ध्यांसमोर स्फोटक सुरुवात करीत बच्चेकंपनीला जाम खुश केले. पावरप्लेच्या सहा षटकांत मुंबई इंडियन्सने सर्वच षटकांत दहापेक्षा जास्त धावा काढत तब्बल ८४ धावा जमवल्या. विशेष म्हणजे त्यांनी या वेळेस एकही गडी गमावला नाही. यात त्यांनी तब्बल ११ चौकार व ४ षटकार खेचले. तसेच आयपीएलच्या इतिहासात पावरप्लेची ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. धडाक्यात केलेल्या सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्स २२० चा पल्ला सहज गाठेल असे दिसत असताना दिल्ली डेअरडेविल्सच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करीत मुंबईच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले. विशेषतः शेवटच्या पाच षटकांत दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांनी केलेली चलाख गोलंदाजीने मुंबईला २०० चा पल्लाही गाठू दिला नाही. शेवटच्या पाच षटकांत मुंबई इंडियन्स केवळ ३६ धावाच जमवू शकला. आणि यात त्यांना पाच गडीही गमवावे लागले. लुईस (२८ चेंडूंत ४८ धावा) व सूर्यकुमार यादव (३२ चेंडूंत ५३ धावा) पाठोपाठ बाद झाल्याने जबाबदारी आली ती मुंबईच्या मधल्या फळीवर. ईशान किशनने सलामीचा धडाका पुढे चालू ठेवत केवळ २३ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार खेचत ४४ धावा केल्या. एक रिवर्स स्वीप मारण्याच्या नादात तो डॅनियल ख्रिस्तनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. याच षटकात बढती मिळालेल्या पोलार्डला भोपळाही फोडता आला आणि तोही ख्रिस्तनचा शिकार बनला. रोहित शर्मा आपली जबाबदारी पार पडेल असे वाटत असताना त्यालाही बोल्टने चालते केले. स्लोवर चेंडूवर मिड-ऑफला जेसन रॉयकरवी झेल देत तंबूत परतला. कृणाल पांड्या (११), हार्दिक पांड्या (२) या भावांनीही फारशी मदत न दिल्याने मुंबईला १९४ धावांवर समाधान मानावे लागले. दिल्लीकडून स्पिनर राहुल तेवटीया, ट्रेंट बोल्ट व डॅनियल ख्रिस्तन यांना प्रत्येकी दोन तर मोहम्मद शमीला एक गडी बाद करण्यात यश आलं. दिल्ली डेअरडेविल्सला मुंबई इंडियन्स प्रमाणेच आपले पहिले दोन सामने गमावल्यानंतर आजच्या सामन्यात विजयाची सुरुवात करणे आवश्यक होते. कॉलिन मुनरोच्या जागी या सामन्यात जेसन रॉयला संधी दिली होती. १९५ धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेल्या दिल्लीने काहीशी सावध पण चांगली सुरुवात केली. पहिल्या चार षटकांत २९ धावा झाल्यानंतर पुढच्या षटकात २१ धावा कुटत दिल्लीने आपणही लक्ष्य गाठण्यास सज्ज आहोत हे दाखवून दिले. सहाव्या षटकात गंभीर (१५) बाद झाल्यानंतर आलेल्या रिषभ पंतने (२५ चेंडूंत ४७ धावा) जेसन रॉयसह सूत्रे हाती घेतली. जिथे मुंबईचे स्पिनर्स पहिल्या दोन चमकदार कामगिरी करताना दिसले तिकडे आज त्यांची चमक काहीशी फिकी पडली असेच दिसले. अकिला धनंजया व मयांक मार्कंडेय यांनी आपल्या पहिल्या पाच षटकांत तब्बल ६३ धावा खर्च केल्या. दिल्लीच्या आजच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला तो त्यांनी केलेल्या भागीदारी. पहिल्या गड्यासाठी ५० धावा, दुसऱ्या गड्यासाठी रॉय व पंत यांनी ४० चेंडूंत केलेल्या ६९ धावा आणि चौथ्या गड्यासाठी रॉय व श्रेयस अय्यर यांनी ४० चेंडूंत केलेल्या नाबाद ६० धावा. या तीन महत्वपूर्ण भागिदाऱ्यांच्या जोरावर दिल्लीने सामना जिंकला. जेसन रॉयने ५३ चेंडूंत सहा चौकार व तितकेच षटकार खेचत नाबाद ९१ धावा केल्या. शेवटच्या षटकात ११ धावांची गरज असताना पहिल्या दोन चेंडूंवर १० धावा भेटल्या. नंतर मुस्ताफिझूर रहमानने सलग तीन चेंडू निर्धाव टाकत सामन्यात रंगात आणली. शेवटच्या चेंडूवर रॉयने एक धाव काढत दिल्लीला सात गड्यांनी सामना जिंकून दिला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *