बाद फेरीच्यादृष्टिने गोव्यासाठी महत्त्वाची लढत

बेंगळुरू: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी गोव्याची शुक्रवारी बेंगळुरू एफसीविरुद्ध लढत होत आहे. बेंगळुरूचे बाद फेरीतील स्थान जवळपास नक्की झाले आहे, पण गोव्यासाठी ही लढत महत्त्वाची आहे. बेंगळुरूने आधीच्या लढतीत चेन्नईयीन एफसीला हरविले. त्यांच्यासाठी हा विजय महत्त्वाचा ठरला. गोव्याला मात्र आणखी प्रयत्नांची गरज आहे. सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ सध्या 20 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावरील चेन्नईपेक्षा त्यांचे तीनच गुण कमी आहेत. गोव्यासाठी जमेची बाजू म्हणजे त्यांचा एक सामना कमी आहे. त्यामुळे श्री कांतिरवा स्टेडियमवर जिंकल्यास गोवा बाद फेरीसाठी भक्कम दावेदार बनेल. अर्थात बेंगळुरूविरुद्ध कांतिरवा स्टेडियमवर खेळणे सोपे कधीच नसते. अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा बेंगळुरू दुसऱ्या क्रमांकावरील एफसी पुणे सिटीपेक्षा पाच गुणांनी पुढे आहे. बेंगळुरूने सलग चार विजयांची मालिका गुंफली आहे. गेल्या महिन्यात दिल्ली डायनॅमोजविरुद्धच्या निराशाजनक पराभवातून सावरत बेंगळुरूने सनसनाटी कामगिरी सुरु केली. गोव्याचे सहाय्यक प्रशिक्षक डेरीक परेरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आमच्या संघाने पुढील सामन्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. या घडीला आम्हाला फार पुढचा विचार करायचा नाही. गोव्याला गेल्या दोन सामन्यांतील प्रतिकुल निकालांचा फटका बसला. ते मुंबई सिटी एफसीविरुद्ध पराभूत झाले, तर नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध बरोबरी साधावी लागली. गोव्यासाठी बचाव फळी समस्या ठरली आहे, पण हा त्यांच्या खेळाचा एक भाग असल्याचे परेरा यांना वाटते. त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही संघ म्हणून खेळतो आणि एका विशिष्ट कल्पनेचा अवलंब करतो. आम्ही याविषयी ठाम राहू आणि यात बदल करणार नाही. मोसमाच्या प्रारंभी गोव्यात उभय संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी सात गोल झालेल्या थरारक लढतीत गोव्याने बेंगळुरूला हरविले होते. ही गोव्यासाठी जमेची बाजू असेल. दुसरीकडे बेंगळुरू या पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरेल. रोका यांनी सांगितले की, त्या लढतीत आम्हाला संधी मिळाली होती, पण आम्हाला फायदा उठविता आला नाही. फार चांगल्या संघाविरुद्ध लढत असल्याची आम्हाला कल्पना होती. उद्या आम्ही अशा संघाविरुद्ध खेळू जो पहिल्या चार जणांत स्थान मिळवेल असे मला वाटते. गोव्याचा संघ चांगला आहे आणि त्यांचे खेळाडू चांगले आहेत. लीगचे वेळापत्रक भरगच्च असल्यामुळे काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचे सुतोवाच रोका यांनी केले. एएफसी करंडक स्पर्धेचा सामना जवळ आला आहे. त्यामुळे काही बदल करावे लागतील, असे त्यांनी नमूद केले.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *