निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताचे स्पिनर्स व आघाडीचे फलंदाज चमकले. श्रीलंकेचा शेवटच्या सामन्यात पराभव करीत यंदाच्या वर्षातली सहापैकी सहा एकदिवसीय मालिका जिंकण्याची किमया केली. विशाखापट्टणम: रोहित शर्माच्या नव्या जबाबदारीची भारतीय संघाने चांगलीच खातरजमा करीत यजमान श्रीलंकेचा सहज पराभव करीत २०१७ मधील शेवटच्या एकदिवसीय मालिकेचा शेवट गोड करीत भारतीय क्रिकेट शौकिनांना चांगलीच पर्वणी दिली. भारताच्या आजच्या सामन्याचे शिल्पकार ठरले ते भारताचे युवा स्पिनर्स आणि भारताची भक्कम आघाडीची फळी. दुसऱ्या सामन्यातील विश्वविक्रमी द्विशतकानंतर नवनिर्वाचित (हंगामी) कर्णधार रोहित शर्मा आजही श्रीलंकेने दिलेल्या २१६ धावांचे आव्हान अगदी सहजतेने पार करेल असे वाटत असताना १४ चेंडूंत एका षटकारासह केवळ ७ धावा करून धनंजयाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला आणि समस्त प्रेक्षकांना काही प्रमाणात निराश केले. नंतर युवा श्रेयस अय्यरने सेट झालेला सलामीवीर शिखर धवनच्या साथीने उरलेसुरलेली कसर पूर्ण करीत भारताला सहज विजय प्राप्त करून दिला. श्रेयस अय्यर आजही शतक ठोकेल असे दिसत असताना एक चुकीचा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने ६३ चेंडूंचा सामना करीत आठ चौकार व एक षटकार खेचत ६५ धावा केल्या. तर दुसरीकडे शिखर धवनने आपला आणखी एक नजराणा पेश करीत शतक ठोकत भारताला तब्बल १०७ चेंडू राखत विजय मालिका खिशात घातली. तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी भारताच्या वेगवान गोलंदाजांची धुलाई करीत संघाला एक आवश्यक व मजबूत सुरुवात करून दिली. दुसऱ्या गड्यासाठी उपुल थरांगा व समरविक्रमा यांनी ११३ चेंडूंत १२१ धावांची आघाडी करीत एका मोठ्या धावसंख्येकडे कूच केले. परंतु त्यांचा हा फॉर्म इतर फलंदाजांनी योग्य रीतीने पुढे कायम न ठेवता श्रीलंकेला समाधानकारक धावसंख्येपासून वंचित ठेवले. २३ व्या षटकात १३६ धावांवर दुसरा गडी बाद झाल्यानंतर श्रीलंका २१५ धावेवर बाद होईल असे वाटलेही नव्हते. भारताच्या या पुनरागमाचं श्रेय द्यावं लागेल ते चहल-कुलदीप या फिरकी जोडीला. कुलदीपने ४२ धावांत ३ तर चहलने ४३ धावांत ३ गडी टिपले. तर श्रीलंकेतर्फे उपुल थरांगाने सर्वाधिक ९२ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक: श्रीलंका २१५/१० (थरांगा ९२, समरविक्रमा ४२, कुलदीप ३-४२, चहल ३-४६) भारत २१९/२ (धवन १००*, श्रेयस ६५, परेरा १-२५, धनंजया १-५३) भारत ८ गडी व १०७ चेंडू राखत विजयी]]>