फातोर्डा (गोवा): हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गोव्यातील सामन्यात पु्न्हा गोलांचा पाऊस पडला. यजमान एफसी गोवा संघाचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने वैयक्तिक तसेच स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक नोंदविली. त्यामुळे गोव्याने केरळा ब्लास्टर्सचा बचाव 5-2 असा भेदत दणदणीत विजय मिळविला. स्पेनच्या कोरोमीनासने उत्तरार्धात सात मिनिटांच्या अंतराने तीन गोलांचा धडाका लावत ब्लास्टर्सचे आव्हान परतावून लावले. यात ब्लास्टर्सला गोलरक्षक पॉल रॅचुब्का याची ढिलाई भोवली. त्याचवेळी कोरोमीनासच्या धुर्त आणि दक्ष खेळालाही दाद द्यावी लागेल. कोरोमीनासने यापूर्वी याच मैदानावर बेंगळुरू एफसीविरुद्ध स्पर्धेतील पहिली हॅट्रीक नोंदविली होती. त्या सामन्यातही सात गोल झाले होते. त्यात गोव्याने 4-3 अशी बाजी मारली होती. गोव्याने चार सामन्यांत तिसरा विजय मिळविला. बेंगळुरू एफसी, चेन्नईयीन एफसी यांच्याप्रमाणेच गोव्याचे नऊ गुण झाले. यात गोव्याचे सर्वाधिक 13 गोल आहेत. बेंगळुरूचे 10, तर चेन्नईयीनचे नऊ गोल झाले आहेत. जास्त गोलमुळे गोव्याने गुणतक्त्यात आघाडी घेतली. नेहरू स्टेडियमवर पूर्वार्धात 2-2 अशी बरोबरी होती. सामन्याची सुरवात जोरदार झाली. ब्लास्टर्सने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. जॅकीचंद सिंगने उजव्या बाजूने क्रॉस पास देत ही चाल रचली. मार्क सिफ्नेऑसने डाव्या पायाने चेंडूवर नियंत्रण मिळविले आणि मोठ्या कौशल्याने उजव्या पायाने ताकदवान फटका मारला. यजमान गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी त्यावर चकला. गोव्याने खचून न जाता खेळाचा वेग कायम राखला. एडू बेडीया आणि नारायण दास यांनी रचलेल्या चालीचे मॅन्यूएल लँझारोटे यने सोने केले. ब्लास्टर्सचा गोलरक्षक पॉल रॅचुब्का याला पुरेशी दक्षता आणि चपळाई दाखविता आली नाही. गोव्याचा दुसरा गोल होण्यास रॅचुब्काची घोडचूक कारणीभूत ठरली. त्याने नेटसमोर प्रतिस्पर्धी सज्ज दिसत असूनही हलगर्जीपणे किक मारली. चेंडू थेट फेरॅन कोरोमीनास याच्या पायापाशी गेला. त्याने तो अलगद लँझारोटेकडे सोपविला. लँझारोटेने ब्लास्टर्सच्या इझुमी अराटा आणि संदेश झिंगन यांना धुर्तपणे चकवित रॅचुब्काला चुकीची किंमत मोजायला लावली. त्याने नेटच्या कोपऱ्यात मैदानालगत फटका मारत अप्रतिम गोल केला. ब्लास्टर्सने 13 मिनिटांनी बरोबरी साधली. जॅकीचंदने मिलान सिंगच्या साथीत चाल रचली. मिलानकडून चेंडू परत मिळताच त्याने महंमद अली, अहमद जाहौह आणि नारायण दास अशा तिघांना चकवित चेंडू नेटमध्ये मारला. उत्तरार्धाचा मानकरी कोरोमीनास ठरला. त्याने 48व्या मिनिटाला गोव्याला आघाडी मिळवून दिली. जाहौहने त्याला पास दिला. त्यानंतर तीन मिनिटांनी त्याने ब्रँडन फर्नांडीसचा पास सत्कारणी लावला. मग लँझारोटेच्या पासच्या जोरावर त्याने हॅट्रीक साजरी केली. निकाल एफसी गोवा: 5 (मॅन्युएल लँझारोटे 9, 18, फेरॅन कोरोमीनास 48, 51, 55) विजयी विरुद्ध केरळा ब्लास्टर्स: 2 (मार्क सिफ्नेऑस 7, जॅकीचंद सिंग 31)]]>