जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीनचे उद्घाटन रुग्णालयात लवकरच एमआरआयची सोय उपलब्ध होणार – ना. गिरीष महाजन

जळगाव: सिटीस्कॅन मशीनमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांवर पुढील आवश्यक ते उपचार करण्यास मदत होणार आहे. शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन नसल्यामुळे रुग्णांना तपासणीसाठी बाहेर जावे लागत होते. आता या रुग्णांची परवड थांबण्यास मदत होणार असल्याची भावना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य रुग्णांची होणारी अडचण लक्षात घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बसविण्यात आले असून या मशीनचे उद्घाटन आज मंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर ललित कोल्हे, आमदार चंदूलाल पटेल, सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचेसह मान्यवर उपस्थित होते. जिल्हा शासकीय रुगणालयातील पूर्वीचे सिटीस्कॅन मशीनवर ३६ हजार सिटीस्कॅन करण्यात आल्याने ते कालबाह्य झाले होते. तसेच गेल्या ६ वर्षापासून ते मशीन बंद होते. त्यामुळे जिल्हाभरातून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची अडचण होत होती. त्यांना सिटीस्कॅनसाठी बाहेर इतरत्र जावे लागत असल्याने रुग्णांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. ही अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन बसविण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. या माध्यमातून रुगणालयात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असे मशीन बसविण्यात आले असून आज या मशीनचे उद्घाटन करण्यात आल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी जाहिर केले. या मशीनचा गरजू रुग्णांना प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना मंत्री श्री. महाजन यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिल्या. या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशीनमुळे सोनोग्राफी, एक्स रे आदि सुविधा एकाचठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर लवकरच या रुगणालयात एमआरआय ची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जिलहा शासकीय रुगणालय हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात दिल्याने याठिकाणी येत्या एप्रिलपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार असून या महाविद्यालयामुळे मोठया प्रमाणात प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, डॉ. मुंगल यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंत्रीमहोदयांच्या हस्ते फित कापून सिटीस्कॅन मशीनचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पितांबर पवार यांनी केले. कार्यक्रमास मच्छिंद्र पाटील, चंद्रकात पाटील, अरविंद देशमुख यांचेसह वैद्यकीय महाविद्यालयाचे व आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *