रोहितच्या शतकीय खेळीने भारत विजयी, आयसीसी क्रमवारीत भारत पुन्हा अग्रस्थानी

गोलंदाजांची सुरेख कामगिरी व सलामीवीरांच्या कामगिरीतील सातत्य यांच्या जोरावर भारताने केला ऑस्ट्रेलियाचा ७ गडी व ४३ चेंडू राखून पराभव. रोहित शर्माने लगावले कारकिर्दीतील १४ वे एकदिवसीय शतक. नागपूर: चौथ्या सामन्यात हातातोंडाशी आलेला विजय कोहलीच्या चांगल्याच जिव्हारी लागल्याचे दिसून आले आणि आजच्या सामन्यात संघाचे अगदी पद्धतशीर नेतृत्व करीत फक्त सामनाच जिंकून दिला नाही तर आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारताला पुन्हा अव्वल स्थानी पोहोचवले. आजच्या सामन्याचा हिरो ठरला तो मुंबईकर रोहित शर्मा. सुरुवातीला काहीसा चाचपडत खेळत आलेला रोहित शर्मा लगेच स्थिरावला आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची अगदी मनमुराद धुलाई करीत भारताला एकहाती सामना जिंकून दिला. येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील मैदानावर मालिकेतील अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २४३ धावंच माफक आव्हान दिलं. फॉर्मात असलेली मुंबईकर सलामी जोडी अजिंक्य राहणे व रोहित शर्माने परंपरेनुसार डावाची चांगली सुरुवात केली. अनुभवाची कमी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना या दोन मुंबईकरांनी अगदी सहजरित्या खेळून काढत आणखी एक शतकी भागीदारी रचली. रहाणे (६१) कुल्टर-नाइलला फ्लिक मारण्याच्या नादात २३ व्या षटकात पायचीत बाद झाला आणि भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्माने एकीकडे आपला दमदार खेळ चालू ठेवत कमकुवत चेंडूंचा चांगल्या प्रकारे समाचार घेतला. कोहलीसोबत तिसऱ्या गड्यासाठी ९९ धावांची आणखी एक भक्कम भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. १०० चेंडूंत झालेल्या या ९९ धावांच्या भागीदारीत रोहितचा वाटा होता तो तब्बल ६२ धावांचा. दरम्यान रोहितने ३५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिड-विकेट खणखणीत षटकार खेचत आपले १४ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. जिंकण्यासाठी काहीच धावा शिल्लक असताना रोहित व कोहली बाद झाले. उर्वरित खेळ केदार जाधव व मनीष पांडे यांनी सहजतेने पूर्ण केला. भारताने पाहुण्यांचे आव्हान ४३ व्या षटकातच पूर्ण करीत मालिका ४-१ अश्या फरकाने जिंकली. स्मिथने आज पुन्हा एकदा नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऍरॉन फिंचच्या संघातील पुनरागमनाने सलामी भक्कम झाल्याचे चित्र मागच्या दोन सामान्यांतून दिसून आले. त्याचीच प्रचिती आजच्या सामन्यातही दिसली. डेव्हिड वॉर्नरच्या साथीने चांगली सुरुवात करून दिल्यानंतर पांड्याने फिंचला माघारी धाडले. मधल्या फळीच्या संमिश्र कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया ३०० धावांचा पल्ला गाठू शकेल असे दिसत असताना भारताच्या फिरकी गोलंदाजांनी पुन्हा एकदा मधल्या षटकांत आपली सिद्धता दाखवून दिली. पहिल्या दहा षटकांत बिनबाद ६० अशी चांगली अवस्था असतानाही ऑस्ट्रेलिया आपल्या निर्धारित ५० षटकांत नऊ बाद २४२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. अक्षर पटेलने केलेली टिच्चून गोलंदाजी हेही आजच्या सामन्यातील एक वैशिष्ट्य ठरले. अक्षराने दहा षटकांची गोलंदाजी करीत ३८ धावा देत डेव्हिड वॉर्नर, पीटर हॅन्ड्सकोंब, ट्रेव्हिस हेड यांना तंबूचा रस्ता दाखवला. बुमरानेही शेवटच्या षटकांत सुरेख प्रदर्शन करीत दोन गादी टिपले. रोहितच्या शतकीय खेळीला सामानावीराचा तर संपूर्ण मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांडयाला मालिकावीराचा किताब देण्यात आला. संक्षिप्त धावफलक ऑस्ट्रेलिया २४२/९ (वॉर्नर ५३, स्टोयनीस ४६, अक्षर पटेल ३-३८, बुमरा २-५१) भारत २४३/३ (रोहित १२५, रहाणे ६१, झम्पा २-५९, कुल्टर-नाईल १-४२) भारत ७ गडी व ४३ चेंडू राखून विजयी]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *