डेविड वॉर्नरच्या शंभराव्या एकदिवसीय सामन्यातील शतकाच्या जोरावर पाहुण्यांनी केला विराट कोहली व कंपनीचा २१ धावांनी पराभव. याच पराभवामुळे भारताचे सलग १० सामने जिंकण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण. बंगळुरू: २५ व्या षटकात विराट कोहली बाद झाल्यानंतर सातच्या सरासरीने भारताला धावा करायच्या होत्या. अश्या वेळेला भारताचे दोन हार्ड हिटर हार्दिक पांड्या व केदार जाधव यांनी चेंडूमागे एक धाव या गतीने भारताची गाडी ढकलायला सुरुवात केली आणि भारताला विजयाकडे झुकवले काहीसा स्थिर झालेल्या पांड्याने स्पिनर ऍडम झम्पाला मिड-ऑनला षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे चुकलेल्या पांड्याने लॉंग-ऑफला सोपा झेल देत चिन्नास्वामी स्टेडियमवरील उपस्थित प्रेक्षकांना धक्का दिला. ३३५ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारतीय संघाने आजच्या सामन्यात तीन बदल केले. कुलदीप यादवच्या जागी अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा व भुवनेश्वर कुमारच्या जागी अनुक्रमे उमेश यादव व मोहम्मद शमी यांना संधी दिली. गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ल्यानंतर मुंबईची अनुभवी सलामी जोडी अजिंक्य रहाणे व रोहित शर्मा यांनी भारताला पुन्हा एकदा दमदार व आक्रमक सुरुवात करून दिली. रहाणे (५३) बाद होण्यापूर्वी या दोघांनी भारताला ११० चेंडूंत १०८ धावांची सलामी भागीदारी करून दिली. विराट कोहलीनेही (२१) शंभरच्या स्ट्राईक रेटने धावा करीत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. रोहित चांगला सेट झालेला दिसत असताना कोहलीच्या एका फटाक्यावर दोघांमध्ये ताळमेळ कोलंडला आणि रोहित धावबाद झाला. रोहितने ५५ चेंडूंत एक चौकार व पाच खणखणीत षटकारांसह ६५ धावा केल्या. तीन गडी तंबूत परतल्यानंतर केदार जाधवने आपल्या परीने पूरेपूर प्रयत्न केला खरा परंतु त्याच्या प्रयत्नांनाही म्हणावे तसे यश आले नाही. परिणामी भारत विजयापासून २१ धावांनी मागे राहिला. केदारने ६९ चेंडूंत एक षटकार व सात चौकार खेचत ६७ धावा केल्या. मनीष पांडे (३३) याचा केविलवाणा प्रयत्नही कामी आला नाही. महेंद्र सिंग धोनी (१३) यालाही शेवटची काही षटके शिल्लक असताना खेळण्याची संधी मिळाली. परिणामी १२ च्या सरासरीने पाहिजे असलेल्या धावा करण्यात तोही अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (१-५९), कुल्टर-नाइल (२-५६) व रिचर्डसन (३-५८) यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर आज ऑस्ट्रेलिया वरचढ ठरला. दरम्यान स्टीवन स्मिथने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागच्या सामान्याप्रमाणे याही सामन्यात सलामी जोडी डेव्हिड वॉर्नर व ऍरॉन फिंचने भारतीय गोलंदाजांची पिटाई करीत आणखी एक शतकीय भागीदारी केली. या वेळेस तर या जोडीने दोनशेची सलामी भागीदारी रचली. आपला शंभरावा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने सुरुवातीपासूनच आक्रमक रूप घेतले. एकदिवसीय सामन्यातील १४ वे शतक झळकावत वॉर्नर शंभराव्या सामन्यात शतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. भारताच्या प्रमुख गोलंदाजांना गडी बाद करण्यात अपयश आल्यामुळे नेहमीप्रमाणे पार्ट-टायमर केदार जाधवला पाचारण करण्यात आले आणि अपेक्षेप्रमाणे त्याने वॉर्नरला बाद करीत भारताला पहिले यश मिळवून दिले. वॉर्नर (१२४) बाद झाल्यानंतर लगेचच फिंचही उमेश यादवच्या स्लोवर चेंडूचा शिकार बनला आणि आपल्या आणखी एका शतकापासून केवळ सहा धावांनी मागे राहिला. ट्रेव्हिस हेड (२९), स्मिथ (३), पीटर हॅन्ड्सकोंब (४३) यांनी पाहुण्यांचा डाव ३३४ पर्यंत पोहोचवला. भारतातर्फे उमेश यादवने सर्वाधिक चार गडी तर केदार जाधवला एक गडी बाद करता आला.]]>