कुलदीपच्या फिरकीसमोर कांगारूंचा दांडिया

युवा कुलदीप यादवच्या हॅट-ट्रिकच्या जोरावर भारताने केला ऑस्ट्रेलियाचा ५० धावांनी पराभव. कोलकाता: २३ व्या षटकात एक बाद १२१ अश्या दमदार अवस्थेत असतानाही शेवटच्या चेंडूत भारत २५२ धावा करून बाद झाला. कोलकाताच्या खेळपट्टीवर तगड्या ऑसिज समोर या धावा पहिल्या तर कमीच होत्या. परंतु भारताच्या युवा गोलंदाजांनी केलेली चतुर गोलंदाजी पाच सामान्यांच्या मालिकेत भारताला २-० ने पुढे आणले. आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे कुलदीप यादवची हॅट-ट्रिक. कोहलीने आज पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मागच्या सामन्यातील संघ कायम ठेवत मुंबईकर जोडी रोहित शर्मा व अजिंक्य राहणे यांनी डावाची सावध सुरुवात केली. एकदिवसीय संघात आत बाहेर असलेल्या रहाणेला आजच्या सामन्यात खेळ दाखवणे आवश्यक होते. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर दमदार रेकॉर्ड असलेल्या रोहित शर्माने (७) प्रेक्षकांना आज निराश केले. सहाव्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटने कडा घेत गोलंदाज कुल्टर नाइलने सोपा झेल घेतला. मागच्या सामन्यात भोपळाही न फोडता आलेल्या कोहलीने तिसऱ्या गड्यासाठी राहणेसोबत शतकीय भागीदारी रचित भारताचा डाव सावरला. मागील दोन-तीन दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे खेळपट्टी व मैदानही फलंदाजांना साथ देत न्हवत. अश्या परिस्थितीही कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा भरपूर समाचार घेतला. राहणेनेही अर्धशतक झळकावत कोहलीला उत्तम साथ दिली. राहणे (५५) बाद झाल्यानंतर भारताच्या डावाला जणू उतरती कळा आली. मनीष पांडे (३), केदार जाधव (२४) या मधल्या फळीतील खेळाडूंना धावा जमवता आल्या नाही तर कोहलीची ९२ धावा करून तंबूत परतला. आपल्या ३१ व्या शतकापासून तो केवळ आठ धावांनी मागे राहिला. धोनीही (५) धावा करून बाद झाला आणि भारताची अवस्था ४० व्या षटकात सहा बाद २०४ अशी झाली. हार्दिक पांड्या (२०) व भुवनेश्वर कुमार (२०) यांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारताने कसाबसा २५० धावांचा पल्ला गाठला. आपला शंभरावा सामना खेळणाऱ्या स्मिथच्या संघाची सुरुवात फारच अडखळत झाली. भुवनेश्वर कुमारने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (१) व हिल्टन कार्टराईट (१) यांना पाचव्याच षटकात चालते करीत ऑस्ट्रेलियाची अवस्था दोन वाद नऊ अशी केली. स्मिथने मग ट्रेव्हिस हेडच्या साथीने मोर्चा सांभाळत पन्नास धावांची भागीदारी रचली. चौथ्या गड्यासाठी हि जोडी घातक दिसत असताना चहलने हेडला (३९) बाद करीत भारताला महत्वाचा बळी मिळवून दिला. चहलने लगेच विस्फोटक मॅक्सवेलला (१४) बाद करीत पाहुण्यांची अवस्था २३ व्या षटकात चार बाद १०६ अशी केली. दरम्यान स्मिथने आपले अर्धशतक पूर्ण केले. स्मिथ एका हाताने किल्ला लढवेल असे वाटत होते. परंतु त्याला इतर खेळाडूंनी पाहिजे तशी साथ दिली नाही. पांडयाच्या एका बाउंसरला मोठा फटका मारण्याच्या नादात स्मिथ हुकला आणि बदली रवींद्र जडेजाकडे झेलबाद देत तंबूत परतला ऑस्ट्रेलियाच्या डावाला खरी खिंडार पडली ती युवा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने. मॅथ्यू वेड (२), अगर (०), पॅट कमिन्स (०) यांना ३३ व्या षटकाच्या अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर बाद करीत आपल्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये पहिली हॅट-ट्रिक नोंदवली. एकदिवसीय सामन्यांत चेतन शर्मा (१९८७), कपिल देव (१९९१) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. मार्क्स स्टोयनीसने (ना. ६२) तळाच्या फलंदाजांना घेत केविलवाणा प्रयत्न केला खरा पण त्याला इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ २०२ धावांत बाद झाला. भुवनेश्वर कुमारने ६.१ षटकांत दोन निर्धाव षटके टाकत केवळ नऊ धावा देत चमकदार कामगिरी केली. संक्षिप्त धावफलक: भारत २५२(कोहली ९२, राहणे ५५, कुल्टर नाइल ३-५१, रिचर्डसन ३-५५) ऑस्ट्रेलिया २०२ (स्टोयनीस ६२*, स्मिथ ५९, भुवनेश्वर ३-९, कुलदीप ३-५४) भारत ५० धावांनी विजयी]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *