परशुराम भोपी / कळंबोली: जिओ इंडिया नावाने बोगस फायनान्स कंपनी चालवून करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. कळंबोलीतील पंचतारांकीत देवांशी हॉटेलवर अचानक धाड टाकून सुधीर पाटील, निलेश ढवले, कष्णा पाटील, संतोष सुदाम पाटील यांच्यासह १७ जणांना करोडो रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कळंबोली, कामोठे, पनवेल पोलिस ठाण्यात कलम ४२०, ४०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या मे महिन्यात जीओ इंडिया या नावाने झटपट करोडपती होण्याचा मार्ग दाखविणाऱ्या ऑनलाईन फायनान्स कंपनीची स्थापना करण्यात आली होती. झटपट पैसा मिळविण्याच्या नादात या कंपनीत पनवेल, नवी मुंबई परीसरातील शेकडो नागरिकांकडून करोडो रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. ही कंपनी बोगस असून नागरिकांची फसवणूक केली जात आहे, याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच त्यानी १९ ऑगस्ट २०१७ रोजी या कंपनीची मिटींग व पैसे भरण्याचे व्यवहार चालू असताना देवांशी हॉटेलवर धाड टाकून मुद्देमालासह अटक केली. या कंपनीचे खाते असलेल्या बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, अभ्युदय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, देना बँक, आंध्र बँक, एक्सेस बँक, कँनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीय बँकेत ग्राहकांनी ऑनलाईन पैसे जमा केले आहेत. १ लाखाला ग्राहकाला ७००० रुपये आठवड्याला तर महिना २८००० हजार रुपये मिळतात, या लालसेने नागरिकांनी सोने गहाण ठेवून, जमीनी व प्लॉट विकून या योजनेत गुंतवणूक करून घराची राखरांगोळी झाली असल्याने मनस्ताप करत आहेत. हजारो नागरिकांसह करोडो रुपयांना गंडा घालणाऱ्या जीओ इंडीया कंपनीच्या रॅकेटला पकडण्यात नवी मुंबई आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे.]]>