हाताशी आलेल्या विजयला इंग्लंडने लगाम लावत भारतीय महिलांना पहिल्यांदा विश्व-विजेते होण्यापासून केवळ नऊ धावांनी मागे ठेवत मिथाली राज व कंपनीला पराभवाचा धक्का दिला. लॉर्ड्सचं ऐतिहासिक क्रिकेट मैदान, भारत विरुद्ध इंग्लंड, विश्वचषक फायनल, अटीतटीचा सामना आणि ४९ व्या षटकात इंग्लंड ९ धावांनी विजयी. यापेक्षा महिला विश्वचषक अंतिम सामना रोमांचक कधीच झाला नव्हता. आतापर्यंत झालेल्या ११ महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला २००५ नंतर तब्बल १२ वर्षांनी अंतिम सामन्यात दाखल झाल्या खऱ्या परंतु इंग्लंडच्या अनुभवी माऱ्यासमोर नांगी टाकत भारताचे जेतेपदावर नाव कोरण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. मिथाली राज व झूलन गोस्वामी यांना विजयासोबत ‘सेंट ऑफ’ देण्याच्या भारतीय महिलांच्या आशेवर पाणी फेरले. इंग्लंडची कर्णधार हेदर नाईटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सावध सुरुवात केल्यानंतर बाराव्या षटकात गायकवाडने लॉरेन विनफिल्डला (२४) बोल्ड करीत भारताला पहिला बळी मिळवून दिला. लगेच पंधराव्या षटकात पूनम यादवने बिमोन्टला (२३) बाद करीत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. ठराविक अंतरावर गडी बाद होत गेले आणि इंग्लंडचा रन-रेट ढासळत गेला. अनुभवी सारा टेलर (४५) व युवा नातालीय स्किवर (५१) यांचा अपवाद वगळता इतर ब्रिटिश महिलांना विशेष कामगिरी करता आली नाही. भारतातर्फे झूलन गोस्वामी (३) व पूनम यादव (२) यांच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला भारताने ५० षटकांत २२८ धावांवर रोखले. पहिले दोन सामने वगळता उर्वरित सहा सामन्यांत आपली छाप सोडण्यात अपयशी ठरलेली स्मृती मंदना आजही अपयशी ठरली. श्रुबसोलने सामान्याच्या दुसऱ्याच षटकात तिला भोपळाही न फोडता त्रिफळाचित करीत भारताला पहिला धक्का दिला. मिथाली राज व पूनम राऊत यांनी सावध व संयमी फलंदाजी करीत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला परंतु सोपी धाव घेण्याच्या नादात मिथाली शेवटचे ४-५ यार्डचे अंतर पूर्ण करण्यास कमी पडली आणि सोपा धावचीत देत तंबूत परतली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात हिरो ठरलेली हरमनप्रीत कौरने पूनम राऊतसोबत चौथ्या गद्यासाठी ९५ धावा जमवल्या आणि भारत आव्हान सहजपणे पार करेल असे चित्र आणले. कौर (५१) बाद झाल्यानंतर पूनम राऊत व वेद कृष्णामूर्थी यांनी पुन्हा एकदा ५३ धावांची भागीदारी रचित भारताला सुस्थितीत आणले. परंतु नियतीने आज काही वेगळेच ठरवले असल्यामुळे भारतीय क्रीडारसिकांचा रविवारच्या गटारीचा शेवट हवा तसा झाला नाही ४३ व्या षटकात १९१ वर चौथा गडी बाद झाला आणि २१९ धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. म्हणजेच २८ धावांच्या मोबदल्यात भारताने आपले तब्बल ७ गडी गमावले आणि परिणामी विश्वचषकही. इंग्लंडच्या अन्या श्रुबसोलने ४६ धावा देत भारताचे तब्बल ६ गडी बाद करीत भारतीय फलंदाजीचा कणाच मोडला. याच विजयाबरोबर इंग्लंड महिलांनी अकरापैकी चार विश्वचषक आपल्या नवे केले. ऑस्ट्रेलिया (६) व न्यूझीलंड (१) यांनी इंग्लडबरोबर विश्वविजेते पदावर आपले नाव कोरले आहे.]]>