दिव्यांगांनो न्युनगंड हटवा, सक्षम व्हा- ना. गिरीष महाजन या कार्यक्रमात बोलतांना ना. गिरीष महाजन यांनी सांगितले की, दिव्यांगांनी आपल्या अपंगत्वाबद्दलचा न्यूनगंड मनातून काढुन टाका. आज त्यांना देण्यात येणारे सहसाहित्य हे त्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी आहे. त्याचा वापर करा. मनात जिद्द ठेवा आणि सक्षम व्हा. शासन आपल्या पाठीशी आहे, अशी साद ना. गिरीष महाजन यांनी उपस्थित दिव्यांगाना घातली. ते म्हणाले की, केंद्र शासन, राज्य शासन आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सर्व दिव्यांगांना मदत करण्यात येत आहे. अशाच प्रकारचे शिबीर हे धुळे व नंदुरबार येथेही येत्या सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही ना. महाजन यांनी यावेळी दिली. स्पीच थेरपीसाठी सुविधा हवी- ना. गुलाबराव पाटील सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलतांना, जिल्ह्यातील मुक बधीरांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक स्पीच थेरपीसाठी आवश्यक उपकरणे शासनामार्फत उपलब्ध करण्यात यावीत. तसेच दिव्यांगांना घरपोच स्वस्त धान्य पोहोचविण्याच्या योजनेचीही अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी मांडली. यावेळी खासदार ए.टी. नाना पाटील, खा. रक्षाताई खडसे, तसेच अपंग संघाच्या मीनाक्षी निकम यांचीही समयोचित भाषणे झाली व त्यांनी या उपक्रमाचे कौतूक केले. या कार्यक्रमात ८० वेळा रक्तदान करणारे दिव्यांग मुकूंद गोसावी, कळसूबाईचे शिखर सर करणारे सुशिल शिंपी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच एम्पथी या संस्थेतर्फे पाळधी ता. जामनेर येथील प्राथमिक शाळेच्या बांधकामासाठी एक कोटी रुपयांचा धनादेश सरपंच कमलाकर पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्ह्यातील दिव्यांग आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल साळुंखे यांनी तर आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी केले. एल्मिको आणि दिव्यांगांसाठीचे सहाय्यक उपकरणे यावेळी वाटप करण्यात आलेले सहाय्यक उपकरण हे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्रा लयाच्या अंतर्गत भारत कृत्रिम अवयव निर्मिती (एलिम्को) मार्फत तयार करण्यात येतात. या प्रकल्पांतर्गत दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी सायकल (बॅटरीवाली किंवा हाताची), कुबड्या, हाताने बसून चालवायची दुचाकी (व्हीलचेअर), आधार काठी, कृत्रिम हात-पाय, बधीर व्यक्तींना श्रवण यंत्रे, अंध व्यक्तिंना लेझर सेंन्सर उपकरणे, ब्रेल लिपीतील मोबाईल व इतर किट, गतीमंद व्यक्तिंना आधुनिक किट दिले जाते. ही संस्था गेल्या ४५ वर्षांपासून भारतातील दिव्यांग व्यक्तींना वापरता येतील अशी उपकरणे तयार करीत असून आतापर्यंत ४० लाख दिव्यांगांना अशा प्रकारे उपकरण वाटप झाले आहे. आज जळगाव जिल्ह्यातील २३०१ लाभार्थ्यांना १९ प्रकारातील ४०८२ उपकरणे वाटप करण्यात आली. यात बॅटरीवरील तीनचाकी ७, साधी तीन चाकी १०३८, मुले-प्रौढास व्हीलचेअर १०२, विशेष व्हीलचेअर ९, कुबड्या १३५२, विशेष आधार काठी ३५०, श्रवणयंत्रे ८१०, श्रवणयंत्र बॅटरी ४८६०, अंधांसाठी मोबाईल, विशेष किट, साऊंड प्लेअर १५० आदी साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले.]]>