मुंबई / प्रकाश गवळी: प्रवाशांच्या अभुतपूर्व प्रतिसादामुळे एसटी महामंडळाने मुंबई-रत्नागिरी मार्गावर सुरू केलेली वातानुकुलीत “शिवशाही” बस पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल झाली. प्रवाशांच्या या उदंड प्रतिसादाबद्दल मा.परिवहन व खारभुमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी प्रवाशांचे आभार मानले आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना माफक तिकिट दरात वातानुकुलीत बसमधून प्रवास करता यावा या उद्देशाने एसटी महामंडळाकडून “शिवशाही” या बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला. अत्याधुनिक सोई-सुविधांनी सुसज्ज अशी वातानुकुलीत “शिवशाही” एसटी बस काल रात्री ९:४५ वाजता मुंबई सेंट्रल बस स्थानकातून रत्नागिरीसाठी रवाना झाली. यावेळी एसटीचे महाववस्थापक कँप्टन विनोद रत्नपारखी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन व साखर-पेढे वाटून स्वागत केले व दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रवाशांकडे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विषेश म्हणजे, या बसची सर्व ४५ आसने बस सुटण्यापुर्वीच आरक्षित झाली. तसेच रविवारी रत्नागिरीहून सुटणाऱ्या या बसची देखील सर्व आसने एक दिवस अगोदरच आरक्षित झाली आहेत. “शिवशाही” बसला प्रवाशांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, भविष्यात ही सेवा लोकप्रिय होईल असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष रणजीत सिंह देओल यांनी व्यक्त केला.]]>